नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड शहरातील नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन (एनटीसी)च्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली सुमारे १५ दुकाने आज महापालिका, पोलीस आणि एनटीसीच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त कारवाईत हटवण्यात आली. या कारवाईत काही दुकानदारांनी आधीच अतिक्रमण हटवले, तर काहींनी शेवटच्या क्षणी स्वतःहून आपले शेड्स व साहित्य काढून घेतल्यामुळे त्यांचे साहित्य बचावले.एनटीसी मिलचे अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.
एनटीसीने काही अतिक्रमणधारकांना पूर्वीच नोटीस बजावली होती. मात्र, त्यांनी अतिक्रमण हटवले नव्हते. त्यामुळे कारवाई अनिवार्य झाली. यावेळी अतिक्रमणधारकांची नावे आणि दुकानांची क्रमवारी घेत हटवण्यात आले. काही अतिक्रमणधारकांनी परिस्थिती ओळखून स्वतःच आपले साहित्य हलवले.
जमिनीवर वाढत चाललेले अतिक्रमण – प्रशासनाची चिंता
नांदेड जिल्ह्यातील एनटीसीची एकूण 132 एकर जागा सचखंड गुरुद्वारा बोर्डाकडून ९९ वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आली आहे. तसेच, आणखी ३२ एकर जमीन एका धार्मिक संस्थानाच्या नावावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही जमिनींवर अतिक्रमण करून दुकाने, शेड्स आणि अन्य बांधकामे करून अतिक्रमणधारकांनी आपली मक्तेदारी निर्माण केली होती.एनटीसी मिल बंद पडल्यामुळे येथे कर्मचारी संख्याही अत्यल्प आहे. सध्या एक प्रशासकीय अधिकारी (गोरे) आणि काही मोजकेच कर्मचारी येथे कार्यरत आहेत. या अतिक्रमणांविरोधात एनटीसी चे अधिकारी गोरे यांनी महापालिका व पोलीस विभागाकडे लेखी अर्ज करून कारवाईची मागणी केली होती.
दुपारच्या सुमारास कारवाईला सुरुवात
या अर्जानंतर आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास महापालिका व पोलिसांचा मोठा फौजफाटा एनटीसीच्या जागेवर पोहोचला. अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली. काही ठिकाणी बांधकामे पाडण्यात आली, तर काही अतिक्रमणधारकांना थोडा वेळ देण्यात आला. त्यावेळी त्यांनी स्वतःहून आपले अतिक्रमण हटवले. या दरम्यान काही गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
या गोंधळात अनेक व्यक्तींनी विविध प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करताना “आम्ही अतिक्रमण केले आहे” हे कबूल न करता उलट प्रशासनालाच दोष देण्याचा प्रयत्न केला. परंतु, बेकायदेशीर अतिक्रमण कधी ना कधी हटवले जाणे अटळच असते.
जमिनी वाचवण्यासाठीची कारवाई – प्रशासनाची भूमिका स्पष्ट
आजची कारवाई ही एनटीसीच्या मालकीच्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी करण्यात आली, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठीही उपाययोजना करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
