नांदेड(प्रतिनिधी)-बाभुळगाव पोस्ट हाडोळी ता.कंधार येथील शेतकरी आपल्या सर्व कुटूंबासह 13 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. मंडळाधिकाऱ्याने केलेला पंचनामा त्यांना मान्य नाही आणि त्यांच्या शेजारी असलेल्या त्यांच्या भावकितील लोकांनी बैनामा नसतांना त्यांची जमीन 7/12 वर कशी लावली याची चौकशी व्हावी म्हणून हा आमरण उपोषण कार्यक्रम होणार आहे.
मौजे बाभुळगाव पोस्ट हाडोळी ता.कंधार येथील विठ्ठल गंगाधर जायभाये यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अर्जाप्रमाणे मौजे बाभुळगाव येथे शेत सर्व्हे नंबर 1/12 येथे आपल्या शेतात पौळ घालू दिले नाही. त्यानंतर मंडळाधिकारी शेखने आमचीच 3 ते 4 फुट जागा सोडून आमच्याच जागेत पौळ पाडण्यास भाग पाडले. त्या संदर्भाने संबंधीतांवर कार्यवाही व्हावी असा अर्ज दिल्यानंतर सुध्दा कार्यवाही झालेली नाही आणि म्हणून जायभाये कुटूंबियांसह उपोषण करणार असल्याचे निवेदनात लिहिले आहे.
यापुर्वी जिल्हाधिकाऱ्यांना एप्रिल महिन्यात, उपविभागीय अधिकारी कंधार यांना एप्रिल महिन्यात आणि तहसीलदार कंधार यांना सुध्दा एप्रिल महिन्यात अर्ज दिले होते. याचा संदर्भ सुध्दा या अर्जात जोडला आहे.
विठ्ठल गंगाधर जायभाये आणि दत्ता गंगाधर जायभाये हे दोघे भाऊ बाभुळगावचे रहिवासी आहेत. माझ्या वारंवार तक्रारी पाहुन 7 एप्रिल 2025 रोजी तहसीलदार कंधार यांनी पौळ घालण्यासाठी आदेश दिला होता. तेंव्हा मंडळाधिकारी महाजन होते. पण पुढे शेख आले. शेख यांनी महाजनचा पंचनामा मान्य केला नाही आणि नवीन पंचनामा करून आमच्यावर अन्याय केला. त्यामुळे 16 मे 2024 च्या पंचनाम्याप्रमाणे कार्यवाही व्हावी तसेच बाभुळगाव येथील ज्ञानोबा धोंडीबा मुंडे, धोंडीबा ज्ञानोबा मुंडे, तिरुपती ज्ञानोबा मुंडे, बालाजी धोंडीबा मुंडे या सर्वांकडे 16 गुंठे जमीन आहे. त्याचा शेत सर्व्हे नंबर 1/10 आहे. त्यांच्याकडे विक्री खत नाही तरी पण महसुल अधिकाऱ्यांना हाताशी धरुन त्यांनी ती जमीन 7/12 वर लावून घेतली आहे. आपल्या उपोषणाच्या कारणामध्ये तहसील कार्यालयातील लिपीक तिरुपती मंगरे आणि पोलीस ठाणे माळाकोळी येथील नामदेव राठोड हे पैसे घेवून काम करतात. आम्हाला खोटी माहिती सांगतात म्हणून या दोघांची बदली करावी अशीही मागणी आहे.
शेतीतील पौळ बांधण्यात बळजबरी करणाऱ्या मंडळाधिकाऱ्याविरुध्द कार्यवाहीसाठी 13 आगस्टपासून सहकुटूंब आमरण उपोषण
