नांदेड(प्रतिनिधी)-विधान परिषदेमध्ये दलित वस्त्यांमधील वाढलेल्या अर्बन नक्षलवादाबद्दल बोलल्यानंतर आ.हेमंत पाटील यांच्याविरुध्द वंचित बहुजन आघाडी युवा महानगराध्यक्ष राहुल सोनसळे यांच्या नेतृत्वात हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. आजच्या लोकशाहीमध्ये राक्षस जन्मले आहेत असे विचार वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र सदस्य अक्षय बनसोडे यांनी व्यक्त केले.

विधान परिषदेत अर्बन नक्षलवाद दलित वस्त्यांमध्ये वाढलेला आहे. याचा उल्लेख करतांना आ.हेमंत पाटील यांनी बोंढार जि.नांदेड येथे झालेले अक्षय भालेरावचे खून प्रकरण आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचे मृत्यू प्रकरणाबद्दल बोलतांना सवर्ण लोकांवर खोटे ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होतात. त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे असा उल्लेख केला. याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज आयटीआय चौकातील महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर आ.हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन केले.
या प्रसंगी अक्षय बनसोडे हे म्हणाले आ.हेमंत पाटील हा व्यक्ती जातीयवादीच आहे. सरड्यासारखे रंग बदलतात. बोंढार येथे आणि परभणी येथे ज्या आईचे लेकरांचे मृत्यू झाले. त्यांच्या विषयी बोलण्याऐवजी ते पोलीसांबद्दल बोलत आहेत. निलंबित झालेल्या पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांची भेट आपल्याच शेतात हेमंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत करून दिली होती. सभागृहात खोटे बोलून त्यांनी काय लपविण्याचा प्रयत्न केला हा त्यांचा प्रश्न आहे. खरे तर या प्रकरणात पोलीसांची सुध्दा बदनामी होत आहे. त्यामुळे जशास तसे उत्तर देण्यासाठी आंबेडकरी युवक नेहमीच तयार आहेत असे अक्षय बनसोडे म्हणाले.
या आंदोलनात वंचित नेते इंजि.प्रशांत इंगोले, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष आकाश जोंधळे, युवा आघाडी महानगराध्यक्ष राहुल सोनसळे, उपाध्यक्ष विशाल एडके, कुलदीप राक्षसमारे, रितेश गुळवे यांच्यासह अनेक युवकांचा सहभाग होता.
