मोफत कृत्रिम अवयव मोजमाप नोंदणी शिबिराचे सप्टेंबरमध्ये आयोजन

*दिव्यांग व वयोश्री जेष्ठ नागरिकांना मिळणार साधनांचा लाभ* 

नांदेड: सामाजिक न्याय एवम अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार यांच्या एडीआयपी व वयोश्री योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) कानपूर, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधने मोजमाप नोंदणी शिबिराचे आयोजन नांदेड जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

 

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) कानपूर संस्थेचे सदस्य के.डी गोटे तसेच सर्व संबंधित विभागाचे विभागप्रमुख आदीची उपस्थिती होती. तर जिल्ह्यातील तहसिलदार, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कानेकर, गटविकास अधिकारी यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.

 

दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधने व मोजमाप नोंदणी शिबिर जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या सर्व बाबीचा पूर्व नियोजन आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच ग्रामपंचायत, नगरपरिषद, महापालिका यांनी या शिबिराच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीचे नियोजनही यावेळी करण्यात आले. शिबिराच्या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून देण्यात येणाऱ्या दिव्यांगाना युडीआयडी कार्ड, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी शिबिराच्या ठिकाणी दिव्यांगाचे व जेष्ठ नागरिक व महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, महसूल विभागाकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी दिल्या. तसेच दिव्यांग व जेष्ठ नागरिकांनी या शिबिरात सहभागासाठी त्यांचे आधारकार्ड, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (युडीआयडी), उत्पन्नाचा दाखला आदी आवश्यक कागदपत्र सोबत आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

*दिव्यांगाना या शिबिरात देण्यात येणाऱ्या साधनांचा तपशील*

सर्व प्रकारचे कृत्रिम अवयव तसेच सहाय्यभूत साधनांमध्ये अस्थिव्यंग प्रवर्गातील वयोगट 5 ते 100 यामधील दिव्यांगाना तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, कुबडी, सर्व प्रकारच्या काठ्या, रोलेटर, सीपीचेअर हे साहित्य देण्यात येणार. अस्थिव्यंग प्रवर्ग वयोगट 18 ते 40 मोटराइज ट्रायसायकल यासाठी पात्रता 80 टक्के दिव्यंगत्व असलेले प्रमाणपत्र, 12 हजार रुपये स्थानिक सहभाग राहील. मतीमंद प्रवर्गासाठी व्हिलचेअर, एमआर किट (14 वर्षापर्यत), सीपीचेअर (12 वर्षापर्यत) हे साहित्य मिळेल. कर्णबधीर प्रवर्गासाठी वय 3 ते 100 या वयोगटासाठी श्रावणयंत्र देण्यात येइल. अंध प्रवर्गातील वयोगट 5 ते 15 यामध्ये 75 टक्के वरील प्रमाणपत्रधारक यांना स्मार्ट केन, ब्रेल किट, डेसी प्लेअर तसेच अंध प्रवर्गातील वयोगट 15 ते 40 यामध्ये स्मार्ट फोन, स्मार्ट केन 75 टक्के वरील प्रमाणपत्रधारक यांना देण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागासाठी दिव्यांगानी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्राची सत्यप्रत, आधारकार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा रेशनकार्ड सत्यप्रत, पासपोर्ट साईज फोटो, शालेयअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची गरज भासणार नाही. त्याऐवजी शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक राहील.

 

तसेच या शिबिरात वयोश्री योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांना सहाय्यभुत साधनांमध्ये चालण्याची काठी, वॉकर, क्रचेस, ट्रायपॉड, क्वाडपॉड, श्रावणयंत्र, व्हिलचेअर, कृत्रिम दाताची कवळी, चष्मे यांचा समावेश आहे. यासाठी बीपीएल कार्ड, आधारकार्ड, पिवळे राशनकार्ड आवश्यक आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी दिली. यावेळी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) कानपूर संस्थेचे सदस्य के.डी गोटे यांनी शिबिराबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!