नेते जनतेेचे बाप नसतात तर सेवक असतात; जनतेने मालक होणे शिकावे

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या जीवनात प्रवर्तन निदेशालय(ई.डी.) ची भेट होवू नये म्हणून नांदेडचे खा.अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीत गेले तेंव्हा त्यांनी आपल्या नैतिकता आणि मुल्यांना सोडून टाकले होते. नांदेड हे कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांचे आहे. तसेच नांदेड जनतेचे आहे. नेता हा काही आपला बाप नाही तर हा आपला सेवक आहे त्यामुळे व्यक्तीपुजेचे वेड पाळून नका हीच मोठी लोकशाहीतील चुक असल्याचे प्रतिपादन पत्रकार अशोक वानखेडे यांनी केले.
नांदेडमध्ये प.पू.स्वामी रामातिर्थ व्याख्यानमालेत पहिले पुष्पगुंफण्यासाठी अशोक वानखेडे यांना निमंत्रण देण्यात आले होते. सर्व प्रथम स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महेश देशमुख तरोडेकर आणि प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांनी केले. हे व्याख्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संपन्न झाले.
पत्रकार अशोक वानखेडे यांच्यासाठी भारतीय लोकशाहीचे भवितव्य हा विषय होता. नांदेड येथील खा.अशोक चव्हाण यांना पक्षाने राज्यमंत्री ते मुख्यमंत्री असे वरवर पोहचवले. परंतू त्यांनी ई.डी.ची भेट होईल या भितीने आपल्या नैतिक मुल्यांना वाऱ्यावर सोडले आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या मुलीला सुध्दा निवडूण आणले आणि जनतेने अर्थात मतदारांनी त्यांना निवडून दिले ही या लोकशाहीची दुर्देव असल्याचे पत्रकार अशोक वानखेडे यांनी सांगितले. नांदेड अशोक चव्हाणचे नाही तर कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांचे आहे आणि आमचे याचा अर्थ नागरीकांचे आहे. तुम्ही व्यक्तीपुजेत न अडकता प्रश्न विचारण्याची हिम्मत ठेवा असे वानखेडे म्हणाले. नांदेडचे खा. प्रा.रविंद्र चव्हाण हे या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांच्याकडे पाहुनच वानखेडे म्हणाले की, तुम्ही तसे नाहीत, मृदूभाषी आहात. पण मोदीच्या नियोजनामध्ये काही तरी नक्कीच चुक झाली असेल म्हणूनच तुम्ही निवडूण आला आहात असे सांगितले तेंव्हा सभागृहात हास्या पिकला.
भारतीय लोकशाहीचे भविष्य अत्यंत उज्वल आहे. परंतू मतदारांना मालक बनता आले पाहिजे. याचे उदाहरण सांगतांना त्यांनी हरीयाणाचे माजी मुख्यमंत्री हुडा यांच्या घरी गेल्याची एक घटना सांगितली. त्यांच्या घरात बसायला जागा नव्हती. एवढे लोक होते आणि ते सर्व लोक हुक्का पित होते. अखेर मला आणि हुडा यांना बाथरुममध्ये उभे राहुन बोलावे लागले. याचे विश्लेषण करतांना अशोक वानखेडे म्हणाले की, त्या ठिकाणी आलेल्या मतदारांची ही अपेक्षा आहे की, आम्ही तुझ्या घरी आलो आहोत आमच्या खाण्या-पिण्या-राहण्याची सोय कर. हरीयाणा ते दिल्ली जाणे हे दुचाकीवर जाणारा प्रवास आहे. याबद्दल प्रा.रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाहुन पुन्हा अशोक वानखेडे म्हणाले की, तुमच्याकडे दिल्लीला येण्यासाठी नांदेडकरांना भरपूर त्रासातून जावे लागेल. म्हणून तुम्ही सुखी आहात.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला अशोक वानखेडे यांनी प्रेतांच्या या देशामध्ये नांदेडमध्ये जीवंत श्रोते आहेत हे पाहुन मला आनंद वाटत असल्याचे सांगितले. संयोजकांनी त्यांचा सत्कार केला तेंव्हा त्यांना एक लिफाफा दिला. लिफाफ्याबद्दल ते सांगत होते. लिफाफे पाहुन भिती वाटते. म्हणूनच मी सर्व श्रोत्यांसमोर तो लिफाफा उघडला आणि त्यांनी पुस्तक सुध्दा आपल्याला दाखवले. भारताच्या 77 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर आज भारतीय लोकशाहीच्या भवितव्यावर चर्चा होत आहे. हाच मुळात मोठा गंभीर आणि चिंतादायक प्रश्न आहे. विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की, संविधान चांगले किंवा वाईट नसते. पण ते कोणाच्या हातात आहे हे महत्वाचे आहे. मागील दहा वर्षापासून संविधानासोबत खेळच होत आहे. आपल्या भाषणात मराठी लोकांना हिंदीपासून वैर नाही हे सांगतांना त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारीजी वाजपेयी यांचा उल्लेख केला. अटलबिहारीजी म्हणाले होते की,मराठी भाषणा बोलण्यात खूप साधी आणि सोपी आहे. परंतू तिला समजूर घेणे अत्यंत अवघड आहे. हे सांगतांना त्यांनी वरचा मजला खाली आहे. या वाक्याचे विश्लेषण केले आणि आपले भाषण हिंदीतूनच केले होते.
आज लोकशाही आहे काय? या प्रश्नाचे विश्लेषण करतांना अशोक वानखेडे म्हणाले पत्रकारांमध्ये पत्रावळ्या मांडणारे जास्त झाले आहेत. पत्रकारीतेच्या माध्यमातून दलाली करणारे जास्त झाले आहेत. यामुळेच लोकशाही आहे काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण पत्रकारांनी सत्तेला प्रश्नच विचारले पाहिजे. सत्तेने चांगले केले तर त्याची प्रशंसापण केली पाहिजे. पण चुकले तर एका क्षणाचाही विलंब न लावता. त्यावर प्रहारपण केला पाहिजे. ज्यांच्याकडे नैतिकता असते. त्याच्या माणसासारखा ताकतवान दुसरा कोणी नसतो. अशी नियती पत्रकारांची असायला हवी. पैसा आहे म्हणजे समृध्दी नसते हे पत्रकारांनी समजून घेतले पाहिजे. या संदर्भाने त्यांनी एका शायरचे शब्द उल्लेखीत केले. “तुम्हारे सोच के साचे में ढल नही सकता, जबान काटलो लहजा बदल नही सकता’ असा त्यांचा विचार पत्रकारांबद्दल आहे. पत्रकारांनी नेहमी विरोधकांचे मित्र असले पाहिजे असे अशोक वानखेडे म्हणाले. सभागृहात बसलेल्या एका पत्रकाराकडे पाहुन अशोक वानखेडे म्हणाले की, पुढच्या निवडणुकीमध्ये नेत्यांनी दाखल केलेले त्या निवडणुकीचे शपथपत्र आणि पुर्वीच्या निवडणुकांचे शपथपत्र एकदा तु छाप. पण येथे अशोक वानखेडे यांची निवड सुध्दा चुकली असे आमचे मत आहे. रात्री 3 वाजताची घटना न छापणारे पत्रकार अशोक वानखेडे यांच्या पत्रकारांच्या उल्लेखातील पहिल्याच वाक्यातील पत्रकार आहेत.
आजच नव्हे तर मागील दहा वर्षापासून जनतेला स्वप्नांची विक्री होत आहे आणि ती स्वप्ने तुम्ही खरेदी करत आहात ही दुर्देवी बाब आहे आणि अशा स्वप्नांच्या विक्री करणाऱ्यांना तुम्ही निवडूण देत आहात. खरे तर सर्वसामान्य नागरीक मुंबई किंवा दिल्लीला जावू शकत नाही म्हणून तो आमदार आणि खासदार निवडूण देतो. पण हे जावून तेथे काय करत आहेत. तर ते जाऊन अधिकाऱ्यांच्या बदल्यांची दलाली करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, विरोधी पक्षांनी संविधान बदलण्याचे खोटे सांगून प्रचार केला. खरे तर संविधान बदलणे हाच देशद्रोह व्हायला हवा. संविधान तुमच्यात आणि माझ्यात ओसंडून वाहत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रअध्यक्ष बराक ओबामा यांना माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंघ यांनी भारतीय संविधानाची प्रत भेट दिली होती. त्यावर लिहिले होते की, सर्वात जुन्या आणि मोठ्या लोकशाहीकडून सर्वात ताकतवान लोकशाहीला भेट यावर ओबांनी आक्षेप घेतला होता. तेंव्हा डॉ.मनमोहनसिंघ यांनी सांगितले होते की, आमच्या संविधानात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागसवर्गीय, महिला या सर्वांना एकदाच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानांचा अधिकार दिला होता. आमच्यानंतर आपल्या देशात सहा वर्षांनी काळ्या रंगाच्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला होता. तेंव्हा ओबामा यांनी ते मान्य केले होते.
भारताचा निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीला जिंकून देण्यासाठी वेगवेगळे खेळ करतो आणि आम्ही काही करू शकत नाही आणि आम्ही काही करू शकत नाही. महाराष्ट्राच्या निवडणूकीमध्ये मतदानाची वेळ संपल्यानंतर झालेले 8 टक्के मतदान म्हणजे लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार आहे. कारण मागील सहा निवडणुकींचा अभ्यास केला तर सर्वाधिक असे मतदान 1.8 टक्के झालेले आहे. अशाच प्रकारे सध्या बिहारमध्ये 20 टक्के मतदार कमी करण्याचा खेळ सुरू आहे. बिहारच्या निवडणुक आयोगाने मागितलेले मतदारांचे 11 पुरावे कसे देता येतील. पावसाळ्यामध्ये अर्धे बिहार राज्य पाण्याखाली असते. लोक कसे भेटतील आणि कसे सर्व होईल. केंद्र सरकारने अब्जावधी रुपये खर्च करून आधार कार्ड बनवले. त्याला का निवडणूक आयोग मानत नाही. मुख्य निवडणूक आयुक्त सरकारच्या दरबारात मुजरा करतो. याचे विश्लेषण करतांना अशोक वानखेडे यांनी दारुतीच पण बाटली बदलली अशा शब्दात उल्लेख केला.
हिंदु-मुस्लिम या दोन समाजामध्ये विष पसरविण्याचे काम ज्या पध्दतीने होत आहे. त्या पध्दतीचे विश्लेषण करतांना गंगेच्या काठावर हिंदुत्वाचे दलाल कोठून आले असा प्रश्न उपस्थित केला. गंगा कधीच विचारत नाही की, माझ्या पाण्याचा वापर करणारा हिंदु आहे की, मुस्लिम ? जोपर्यंत निवडणुक आयुक्त पारदर्शक होणार नाही. तो पर्यंत लोकशाहीला जिवंत ठेवणे ही मतदारांची जबाबदारी असल्याचे सांगितले. भारतात मनुस्मृतीला आणून भारताचे संविधान बदलण्याची तयारी करणाऱ्या केंद्र सरकारचा मी निषेध करतो असे वानखेडे म्हणाले. मी सुध्दा हिंदु आहे. उपनिषदातील वाक्य उल्लेखीत करून त्यांनी सांगितले की, यात कोठेही मंदिर सांगितलेले नाही. ज्या ठिकाणी उभे राहुन तुम्ही देवाची आरधना करताल ती आरधना देव मान्यच करतो. त्यामुळे धर्मवाद पसरवू नका.
एकेकाळी अजित पवारला चक्की पिसिंग असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस आज एकाच चक्कीचा आटा खात आहेत. हे सांगितले. लाडक्या बहिणींनी लाच घेवून आपले मतदान विकले असा उल्लेख अशोक वानखेडे यांनी केेला. राजकारणात काय चालते. हे सांगतांना किरिट सोमय्याचा उल्लेख त्यांनी केला आणि त्यांच्या प्रमाणेच बोलत मला वरून सांगितले जाते आणि मग तेच सेल्टलमेंट करतात हे सुध्दा सांगितले. भारताच्या लोकशाहीला दोन गुजरात्यांचे ग्रहण लागलेले आहे. हा संक्रमण काळ आहे. संक्रमण काळात आम्हाला संघर्षच करावा लागतो. पण ग्रहण कधी तरी सुटतेच म्हणूनच मी आपल्याकडे दे दान सुटे ग्राहाण अशी मागणी करतोय. हे दान मी मतदानाच्या माध्यमाने अशी मागणी करत आहे.
भगवान हनुमंताला सुध्दा त्यांच्या शक्तीची जाणिव नव्हती. म्हणूनच जामुवंतांनी त्यांना ती जाणिव करून दिली. त्यांच्यासमोर हनुमान चालीसा वाचल्यानंतर त्यांना आपल्या शक्तीची जाणिव झाली होती आणि ते मग श्रीलंकेत पोहचले होते. त्याचप्रमाणे मी आपल्यासमोर लोकशाही चालिसा वाचतो आहे. त्यामुळे मतदारांना आपल्या शक्तीची जाणिव होईल. नवीन सरकार आले तरी 20-25 वर्ष पुन्हा पुर्ववत होण्यासाठी लागतील. आपल्या वेदनांना मी शब्द देतो. म्हणून आपण सुध्दा संघर्षात सहभागी व्हा. प्रसंगी रस्त्यावर उतरा. भारताच्या लोकशाहीचे भवितव्य अत्यंत उज्वल असल्याचे पत्रकार अशोक वानखेडे म्हणाले.
