शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दूध व्यवसाय महत्त्वाचा : ॲड निलेश हेलोंडे

• उमरी तालुक्यात जिरोना येथे गायरान जमिनीत चारा लागवड प्रकल्प उद्घाटन संपन्न 

नांदेड – शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दूध व्यवसाय हा महत्त्वाचा असून यासाठी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य ही संस्था कार्यरत आहे. प्रत्येक गावात उपलब्ध असलेल्या गायरान जमिनीत सुपर नेपियर सारखा चारा उगवून तो गावातील पशुधनास मोफत मिळाला तर अल्पभूधारक शेतकऱ्यांसह भूमिहीन मजूरसुद्धा मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय करू शकतील, असे प्रतिपादन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील यांनी केले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत उमरी तालुक्यातील जिरोना येथे असणाऱ्या गायरान जमिनीत चारा लागवड प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

सततचा येणारा दुष्काळ व चाराटंचाईमुळे विदर्भ, मराठवाड्यात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दूध व्यवसाय हा महत्त्वाचा असल्याचे अनेक अभ्यासात दिसून आले आहे. शेतकऱ्यांना पिकाचा पैसा हातात येण्यासाठी किमान 120 दिवस लागतात तर दुधाचा पैसा दर दहा दिवसाला आपल्या खात्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा प्रकल्प आपला स्वतःचा समजून या प्रकल्पात योगदान द्यावे व आपल्या पशुधनासाठीचा आवश्यक चारा आपल्या गावातील गायरानातच उगवावा व दूध व्यवसायातून आर्थिक दृष्ट्या समृद्ध व्हावे, असे आवाहन ॲड निलेश हेलोंडे पाटील यांनी केले.

याच पद्धतीने गायरान जमिनीमध्ये चारा लागवड करण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 100 एकरचे उद्दिष्ट ठेवल्याचे मनरेगाचे उपजिल्हाधिकारी संजीव मोरे यांनी सांगितले.

यावेळी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे के. डी. देठे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण कुमार घुले, डॉ. रोहित धुमाळ, प्रशांत थोरात, तहसीलदार उमरी, डॉ. श्रीनिवास जिंकलोड पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती उमरी, वनविभागाचे दिनकर पाटील तसेच कृषी विभागाचे अधिकारी, जिरोना ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!