नांदेड(प्रतिनिधी)-शेतात काम करणाऱ्या एका विवाहितेवर बळजबरी अत्याचार करणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर.व्ही. कोकरे यांनी 10 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस ठाणे तामसाच्या हद्दीत राहणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ते आणि तिचे पती 20 डिसेंबर 2021 रोजी शेतात काम करण्यासाठी गेले. शेतातील मेथीची भाजी उपटून तिच्या जुड्या तयार करून ती भाजी विक्रेत्याला शेतातच विक्री केली. त्यानंतर त्या महिलेचे पती दुष्काळाचे पैसे जमा झाले की, नाही हे पाहण्यासाठी आपल्या बॅंकेत गेले. त्यानंतर ती महिला आपल्या शेतातील कुटार घेवून जनावरांना टाकत होती. तेंव्हा त्यांच्या गावातच राहणारा संजय गोविंदराव गाडगे(35) हा पाठीमागून आला आणि महिलेला पकडून तिच्यासोबत अश्लिल वर्तन करू लागला. ती विरोध करत होती तेंव्हा तीला बळजबरीने तुरीच्या ओळीत खाली पाडून त्याने तिच्यावर अत्याचार केलाच. घडलेली घटना परत आलेल्या त्या महिलेच्या नवऱ्याने पण पाहिली. तेंव्हा तो संजय गोविंद गाडगे हा पळून गेला. यानंतर अनेक नातलगांशी चर्चा करून 21 डिसेंबर 2021 रोजी याबाबतची तक्रार पोलीस ठाणे तामसा येथे देण्यात आली. तामसा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 212/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 376 नुसार दाखल केली. सहाय्यक पोलीस निरिक्षक बी.एच.किरवले यांनी संजय गाडगेला पकडले आणि तपास करून त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात हे प्रकरण सत्र खटला क्रमांक 212/2021 प्रमाणे चालले. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. सौ.एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी सादरीकरण करतांना घडलेल्या घटनाक्रमाबद्दल कायदेशीर दृष्टीकोणातून काय आवश्यक आहे हे सांगितले.
या प्रकरणात एकूण 9 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. उपलब्ध पुराव्या आधारे न्यायाधीश आर.व्ही. कोकरे यांनी संजय गोविंदराव गाडगेला दहा वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष सानप यांच्या मार्गदर्शनात तामसाचे पोलीस अंमलदार संतोष गोंदगे यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका बजावली.
विवाहितेवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्ष सक्तमजुरी
