• जिल्हा प्रशासनाचा कामगारांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम
• वाजेगाव येथे कामगारांसाठी नोंदणी व आरोग्य शिबिर संपन्न
नांदेड :- कामगारांच्या कुटूंबियांनी शासनाच्या शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत कामगार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या विविध योजना लाभ देण्यासाठी कामगारांची नोंदणी व आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे आयोजन वाजेगाव नोबल फंक्शन हॉल येथे केले होते. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कामगार कल्याण सहाय्यक आयुक्त अनिकेत थोरात, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण मुंडे, नायब तहसिलदार सुनिल माचेवाड, संजय नागमवाड, वाजेगावचे सरपंच जमील सेठ आदीची उपस्थिती होती.
वंचित, उपेक्षित घटकांना शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, त्यांना त्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच उपक्रमाच्या माध्यमातून आज कामगारांच्या नोंदणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम असून या शिबिराच्या माध्यमातून महिला, असंघटीत कामगार यांना आरोग्य, शिक्षणासह इतर विविध सुविधांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यात येत आहे. या शिबिराचा त्यांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले.

या शिबिरात कामगारांचा नोंदणी स्टॉल, आयुष्यमान कार्ड स्टॉल, आरोग्य शिबिर स्टॉल असे विविध योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते. या शिबिरात महिलांची संख्या मोठया प्रमाणात होती. तसेच सीएससी सेंटर चालकांनी या शिबिरात नोंदणी करण्यासाठी मोठया प्रमाणात योगदान दिले आहे.
या शिबिरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी आरोग्य विषयक माहिती देवून महिलांनी आपली तपासणी करुन घ्यावी असे सांगितले. तसेच त्यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. कामगारांना मिळणाऱ्या शासनाच्या विविध योजनेची माहिती देवून कामगार आयुक्त अनिकेत थोरात यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरात महिला व पुरुष असे एकूण 491 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर रक्त तपासणी 156 रुग्णांची करण्यात येवून, 16 रुग्णांची इसीजी तपासणी करण्यात आली. 145 लोकांना आयुष्यमान कार्ड वितरीत करण्यात आले तर 225 कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यात आली. या शिबिरात एकुण 1 हजार 33 लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आले.
