प्रख्यात की कुख्यात माहित नाही टीव्ही पत्रकार अर्णव गोस्वामी हे त्यांच्या बातम्यांतील आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. बातम्या सादर करताना त्यांचे ओरडणे हा त्यांच्या पत्रकारितेतील एक वेगळाच विशेष गुण मानला जातो. त्यांनी काँग्रेस पक्षाला “देशाचा शत्रू” असे म्हटल्यामुळे त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

हा त्यांच्या विरोधात दाखल झालेला पहिला खटला नाही. त्यांच्या विरोधात कोठेही खटला दाखल झाला, तरी सर्वोच्च न्यायालय नेहमीच त्यांच्यासाठी आपले दरवाजे खुले करते आणि त्यांना जामीन दिला जातो.काँग्रेसचे प्रवक्ते आणि पक्षाच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात, एका थेट प्रसारणा दरम्यान अर्णव यांनी काँग्रेसला “देशाचा शत्रू” म्हटले होते. हे विधान ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते, जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला होता.
न्यायमूर्ती पुष्पेंद्र कुमार कौरव यांनी सोमवारी या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी केली. त्यावेळी सांगण्यात आले की, अर्णव गोस्वामी यांनी म्हटले होते की, “काँग्रेस पक्ष सध्या शत्रूंच्या बाजूने आहे. जे कोणी काँग्रेसचे मतदार आहेत, ते राष्ट्राचे शत्रू आहेत.” या विधानामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.न्यायालयाने नमूद केले की पवन खेडा यांनी हा खटला वैयक्तिक हक्कात दाखल केला असला, तरी अर्णव गोस्वामी यांचे विधान काँग्रेस पक्षाविरुद्ध होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना याचिकेत सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे. पवन खेडा यांनी यास सहमती दर्शवली असून, ते सुधारित याचिका लवकरच दाखल करणार आहेत.

गोस्वामी यांचे वकील महेश जेठमलानी यांनी सांगितले की, अद्याप त्यांना याचिकेची प्रत मिळालेली नाही. यावर न्यायमूर्ती कौरव यांनी स्पष्ट केले की, “आम्ही अद्याप आपल्याला कोणतीही नोटीस पाठवलेली नाही. प्रत मिळाल्यानंतरच पुढील सुनावणी होईल.”अर्णव गोस्वामी यांच्यावर याआधीही अनेक खटले दाखल झाले आहेत. 2020 मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. तसेच, त्यांच्या काही प्रसारणांमध्ये भडकाऊ भाषा वापरल्याचा आरोपही झाला होता.अर्णव गोस्वामी यांना काहीजण आक्रमक आणि पक्षपाती पत्रकार मानतात, तर काहीजण त्यांना निर्भीड आणि स्पष्टवक्ते पत्रकार मानतात. त्यांच्या पत्रकारितेने अनेकदा चर्चेला उधाण आणले आहे.
त्यांचा काँग्रेस पक्षाशी जुना वाद आहे. अर्णव यांनी एनडीटीव्हीमध्ये आपली पत्रकारिता सुरू केली होती. त्यांचे वडील सैन्यात होते. सुरुवातीला ते भाजपविरोधी भूमिका घेत असत. त्यांनी योगी आदित्यनाथ आणि इतर भाजप नेत्यांवर टीका केली होती. मात्र नंतर त्यांनी भूमिका बदलली. एका उद्योजकाच्या मदतीने त्यांनी स्वतःचे रिपब्लिक टीव्ही चॅनल सुरू केले.मुंबईत कार्यालय सुरू करताना त्यांनी एका पती-पत्नीला इंटीरियर डिझाईनचे काम दिले, पण त्यांचे पैसे न दिल्याने त्या दोघांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी अर्णव गोस्वामी यांना जबाबदार ठरवले होते. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. उच्च न्यायालयाने खटल्याचा निकाल एक आठवड्यात लावण्याचे आदेश दिले, पण गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांना तिथे जामीन मिळाला.
सोनिया गांधी यांच्यावरही अर्णव गोस्वामी यांनी गंभीर आरोप केले होते, जेव्हा पालघरमध्ये दोन साधूंना मारण्यात आले होते. त्यांनी आरोप केला की सोनिया गांधी यांना हे कृत्य आवडले असेल.सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही अर्णव यांनी एकतर्फी भूमिका घेतली होती. कर्नाटकातही काँग्रेसने त्यांच्यावर खटला दाखल केला होता, जिथे त्यांना हायकोर्टाकडून जामीन मिळाला.
पवन खेडा यांनी दाखल केलेल्या नवीन खटल्यात काय निष्पन्न होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला पाकिस्तानशी संबंधित ठरवणे चुकीचे आहे. काँग्रेसला मतदान करणारे मतदार पाकिस्तानला मदत करत आहेत, असा अर्थ निघतो, हे विधान अत्यंत गंभीर आणि पक्षाच्या प्रतिमेला डाग लावणारे आहे.
2014 नंतर काही मीडियाने पत्रकारितेचा व्यासपीठ राजकीय प्रचारासाठी वापरल्याचे अनेक उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत मीडियाविरोधात कारवाई करण्याचे दोन मार्ग आहेत. कायदेशीर उपाय किंवा न्यायालयीन मार्ग. याच मार्गाने पत्रकारितेचा खरा चेहरा समोर येऊ शकतो.
