उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश ; ऍड. प्रकाश आंबेडकरांनी मांडली होती बाजू
नांदेड(प्रतिनिधी)-आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणात दिलेला अंतरीम निकाल एवढा महत्वपुर्ण आहे की, हाच निकाल अंतिम निकालात नोंदवला गेला तर यापुढे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील कोणताही पोलीस अधिकारी कोठडीत असलेल्या आरोपीसोबत दुरव्यवहार करण्याची हिम्मतच करणार नाही. जवळपास तीन खंडी संख्यपेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांवर एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहेत. ही माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाच ते सहा महिन्यापुर्वी परभणी येथील विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. त्या संदर्भाने रोष व्यक्त झाला आणि या दोषानंतर परभणी पोलीसांनी अत्यंत दुरदम्यपणे अनुसूचित जातीच्या युवकांना मारहाण केली. महिलांना मारहाण केली. पोलीसांसह इतर समाजाच्या युवकांनी मारहाण केली. त्यात विधी शाखेचा एक विद्यार्थी सोमनाथ सुर्यवंशी पण होता. त्यांना अटक झाली आणि पुढे न्यायालयीन कोठडी मिळाली. यानंतर परभणीसह महाराष्ट्रभर या घटनेचे पडसाद दिसले आणि अटकेच्या 48 तासात सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू झाला. त्यावेळी ते न्यायालयीन कोठडीत होते. ऍड. प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेल्या माहितीनुसार देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा असे घडले आहे की, सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू हा न्यायालयाच्या कोठडीत झाला हे मान्य झाले. त्यामुळे न्यायालयाने एका आठवड्यात तीन खंडीपेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. सोबतच न्यायालयाने आपल्या अंतरीम आदेशात पोलीस अधिक्षक परभणी, इतर पोलीस अधिकारी यांच्या ताब्यातील सर्व कागदपत्र पोलीस उपअधिक्षकांच्या स्वाधीन करण्याचे आदेश दिले आहेत. ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या मते न्यायालयाला पोलीस अधिक्षक परभणी यांच्यावर विश्र्वास नाही म्हणूच पोलीस उपअधिक्षकांकडे कागदपत्र देण्यास सांगितले आहे.
भारताच्या 70 वर्षापेक्षा जास्तच्या स्वातंत्र्य ईतिहासात सोमनाथ सुर्यवंशी यांच्यासारखा मृत्यू कोठडीतील मृत्यू आहे हे मान्यच केले नाही. पण या प्रकरणात न्यायालयाने हे मान्य केले आहे. ऍड. प्रकाश आंबेडकर सांगतात सरकार, परभणी पोलीस सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला हे जे सांगत होते त्याला अमान्य केले आहे. कारण सहा डॉक्टरांच्या पथकाने सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूचे विश्लेषण करतांना त्यांना झालेल्या मारहाणीच्या जखमांमुळे हा मृत्यू घडल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
ऍड. प्रकाश आंबेडकर सांगत होते की, 30 जुलै रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. त्यात सोमनाथ सुर्यवंशी यांच्यावतीने आणि सरकार किंवा परभणी पोलीस यांच्यावतीने अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्याची मुभा न्यायालयाने खुली ठेवली आहे. 30 जुलै रोजी आम्ही न्यायालयात सांगणार आहोत की, हा मृत्यू कोर्टाच्या आधीन आहे. म्हणून पोलीसांवर विश्र्वास करण्याऐवजी न्यायालयाच्या निरिक्षणात या मृत्यूची चौकशी व्हावी असे ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. मागच्या 70 वर्षापेक्षा जास्त काळात कोठडी मृत्यू प्रकरणात 2-3 टक्के लोकांना शिक्षा झालेली आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या या नियमावलीनुसार कार्यवाही झाली तर भविष्यात कोठडी मृत्यू प्रकरणात शिक्षेची टक्केवारी वाढेल असा विश्र्वास ऍड. प्रकाश आंबेडकरांना वाटतो. सोबतच फक्त महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशात कोणताही पोलीस अधिकारी आरोपीसोबत गैरवर्तन करण्याचे हिम्मत करणार नाही असेे ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. या खटल्याला शेवटपर्यंत नेण्यासाठी मी प्रत्येक तारखेला या सुनावणीचा पाठपुरावा करेल आणि माझ्या लेकराच्या मृत्यू बाबत न्याय मिळवेल असे ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले सोमनाथ सुर्यवंशीच्या आईच्या निवेदनाला आधार माणून गुन्हा दाखल व्हायला हवे असे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाने आपल्या निकालात काही लोकांची नावे नमुद केली आहेत. ज्यांनी सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटूंबाला काही प्रलोभने दाखवली. ती प्रलोभने नोकरी, पैसे, जमीन अशी होती. परंतू कोठडीतील मृत्यू प्रकरणात सोमनाथ सुर्यवंशीच्या आईने घेतलेली भुमिका महत्वपुर्ण आहे. त्यांनी माझ्या मुलाच्या मृत्यूचा न्याय हवा असेच सांगितले. अशीच भुमिका कोठडीतील मृत्यू प्रकरणात ठेवण्यात आली तर नक्कीच शिक्षेच्या प्रमाणात वाढ होईल.
अखेर ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: आपले वकीलपत्र दाखल करून न्यायालयात केलेल्या सादरीकरणाला आलेले हे सर्वात मोठे यश आहे. याबद्दल विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून समाधान व्यक्त होत आहे.
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात 70 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांविरुध्द आठ दिवसात गुन्हा दाखल होणार
