नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील काही पोलीस अंमलदारांच्या दहा-दहा मिनिटात बदल्या नवीन जागी करून देण्यात आल्या आहेत. आज एक खाजगी व्यक्ती पाहिला आणि त्याच्यासोबत पोलीस सुरक्षा रक्षक पाहुन आश्चर्य वाटले. कोणीही या आणि गनर घेवून जा असाच हा प्रकार वाटला.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने काही राजकीय लोकांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांना पाहिजे तेथे करून घेतल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी सांगितली आहे. अनेक आमदारांच्या स्वियसहाय्यक असलेल्या एकाने तर बाजारच मांडला होता असे लोक सांगत आहेत. काही जणांना काल दहा मिनिटात नवीन बदली मिळाली. त्यात काही जणांना त्यांनी केलेल्या ठिकाणीच दुसऱ्यांदा बदली मिळाली. या अगोदरही असे अनेकदा घडले आहे. आजचे नवीन नाही. परंतू माऊलीची वारी सुरू असतांना माऊली कुठे आहेत हे भक्त शोधत आहेत.
आज एक खाजगी माणुस दिसला. त्याच्याविरुध्द मागे महिला विषयक गुन्हा दाखल होता आणि त्याच्यासोबत पोलीस गनर पाहिला तर असे वाटले की, कोणीही या आणि गनर घेवून जा अशी काही विशेष योजना नांदेड जिल्ह्यात सध्या सुरू आहे काय ? असा प्रश्न आमच्याच मनात उपस्थित झाला. गनर देण्यासाठी काही शब्दगुंडांनी सुध्दा शिफारशी केल्याची चर्चा ऐकायला मिळाली. ज्यांना खरेच गरज आहे त्यांना मिळालेही पाहिजे परंतू काही तर गनर घेवून त्याचा उपयोग काय करतात. याच्यावर कोणाचा वचक असल्याची कोणतीही प्रक्रिया अस्तित्वात असल्याचे दिसत नाही.
शहरातील विसावानगर भागात एका गडगंज श्रीमंत माणसाच्या घरात एक कार्यालय आहे. या कार्यालयात नांदेड जिल्ह्यात कार्यरत नसलेले पोलीस अधिकारी बसतात आणि तेथूनच सर्व यंत्रणा हलते असे विसावानगर भागातील काही लोक सांगत होते. त्यामुळेच कोणाला तरी असे वाटले असेल की, आजच्या युगात कधी देव सुध्दा मरतो. काही त्याची मानसिकता चुकीची नाही. दोन पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यात त्या जागा मालकाला आरोपीच्या सदरात ठेवण्यात आले. त्या संदर्भाने सुध्दा एक पोलीस अंमलदार भारीच काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झाला दुसऱ्या पोलीस ठाण्यात आणि पोलीस अंमलदार आहे तिसऱ्या पोलीस ठाण्याचा आणि तो त्या कामात दखल देत आहे. त्याची बदली नांदेड ग्रामीणमधून कसुरी अहवालावरून झालेली आहे असा हा खेळ नांदेड जिल्हा पोलीस दलात सुरू आहे. अनेक आमदारांचा स्विय सहाय्यक असलेला आताचा स्वियसहाय्यक याच्याकडे तर 50 पोलीस अंमलदारांच्या बदली करण्याची यादी तयार असल्याचे खात्रीलायक सुत्र सांगत आहेत. पण तो त्या बदल्या कधी करील याची काही माहिती प्राप्त झालेली नाही. पण पोलीस अधिक्षकांनी काढलेले पोलीस अंमलदारांचे बदल्यांचे आदेश एक-एक आहेत. याचा काय अर्थ? याच्यावर पोलीस दलातच चर्चा सुरू आहे. नांदेड जिल्ह्याचे नशिब चांगले की या पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप हे आहेत नाही तर नांदेड जिल्ह्याचे काय झाले असते याचा अंदाज लावणे तर अवघडच आहे. कारण काल-परवाच आरबीआयचा अहवाल जाहीर झाला. त्याप्रमाणे भारताच्या प्रत्येक नागरीकावर 4 लाख 80 रुपयांचे कर्ज आहे. नांदेड जिल्ह्यातील 25 लाख जनतेचे काय झाले असते याचा विचारच केला तर अंगावर काटा येतो.
एक-एक पोलीस अंमलदारांच्या हळूहळू पुन्हा झाल्या बदल्या ; स्वियसहाय्यकाचा मोठा हातभार; विसावानगरमध्ये गुप्त कार्यालय
