तुम्हाला विचारलं गेलं, की तुम्ही जीवनात काय बनू इच्छिता? किंवा तुमच्या मुलांना काय बनवू इच्छिता? उत्तर लगेच येतं – डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील, वैज्ञानिक, लेखक, सामाजिक कार्यकर्ता, पर्यावरणतज्ज्ञ, शेतकरी, पर्वतारोही,पण आम्ही तुम्हाला एक वेगळा विचार मांडतो.या सर्वांपैकी काहीही बनण्याची गरज नाही.बनायचंच असेल, तर ‘ठेकेदार’ बना ‘कंत्राटदार’ म्हणा किंवा ‘गुत्तेदार’ म्हणा.मराठीत नाव जड वाटत असेल, तर इंग्रजीत ‘Contractor’ म्हणा.‘डॉक्टर’, ‘शास्त्रज्ञ’ हे शब्द जरी आदरणीय वाटत असले, तरी ‘ठेकेदार’ या शब्दात एक वेगळंच वजन आहे – कमीत कमी आजच्या काळात.शेक्सपियर म्हणाला होता – “All that glitters is not gold” (प्रत्येक झळकणारी वस्तू सोनं नसते).पण जर तो इंदोरच्या अनुप अग्रवाल यांना भेटला असता, तर त्याचं मत बदललं असतं.वेनिसचं नाव बदलून “इंदोर” ठेवलं असतं!कारण इथे “प्रत्येक पिवळी वस्तू ही फक्त आणि फक्त सोनंच असतं.”
आम्ही वाचकांसमोर एक विश्लेषण सादर करतो आहोत – ‘सोन्याचा महाल’.इंस्टाग्रामवरील क्रिएटर प्रियम सारस्वत यांनी तयार केलेला एक तासाचा व्हिडिओ पाहून कोणाच्याही डोळ्यांत चकाकी येईल.धीरूभाईचे पुत्र, अंबानी, अदानी यांचे बंगल्यांची चर्चा होते – पण अनुप अग्रवाल यांचे निवासस्थान म्हणजे वास्तवात सोन्याचं मंदिर!हा बंगला म्हणजे एखादं 24 कॅरेट सोन्याचं स्वप्न.भिंती, फर्निचर, बाथरूममधील नळ, विद्युत बटणं सगळंच सोन्यानं मढवलेलं!
होय, इथली विद्युत बटणंसुद्धा सोन्याची आहेत. एकदा खराब झाली, तर ती ‘इलेक्ट्रीशियन’ दुरुस्त करेल की सोनार, असा प्रश्न पडावा!
पण असा विचार करणे मूर्खपणाचं ठरेल, कारण शुद्ध सोने तापल्यावर वितळतं – आणि विद्युत प्रवाहात ते धोकादायक ठरू शकतं.
पण ‘सुरक्षे’ची चिंता या झगमगाटासमोर दुय्यम ठरते. इतिहासात रावणाने सोन्याची लंका उभारली, आणि आज इंदोरमध्ये एक आधुनिक रावण – ठेकेदार अग्रवाल – यांनी तीच गोष्ट प्रत्यक्षात आणली.या महालात प्रवेश करताना वाटतं, जणू आपण एखाद्या राजप्रासादात जातो आहोत.गाड्यांचा असा ताफा आहे की कोणत्याही महापालिकेला लाज वाटावी.1936 ची विंटेज मर्सिडीज, BMW, Jaguar, Lexus – आणि काही इतक्या दुर्मिळ की Googleला सुद्धा त्यांची ओळख पटायला वेळ लागेल.अग्रवाल सांगतात ,”इंदोरमध्ये एखादी पहिली आलिशान गाडी आली, तर ती सर्वात आधी माझ्या घरात येते.”पण प्रश्न उरतो – एवढा पैसा कुठून आला? कोणतं पीएचडी? कोणती पदवी?कवी, लेखक, पायलट, वैज्ञानिक बनून हा पैसा आला का? उत्तर स्पष्ट आहे – हा पैसा ‘ठेकेदारी’मधून आला आहे. आणि ‘इमानदारीने’.”इमानदारीने मिळवलेलं 24 कॅरेट सोने”, असं अग्रवाल अभिमानाने सांगतात.जर बेईमानीने पैसा मिळवला असता, तर इथे सोन्याच्या कचराकुंड्या दिसल्या असत्या!
आता ‘शिक्षण’ हे हाताचा मळ असल्याचा सिद्धांत बदलतो आहे.
इथे ‘शिक्षणापासून जितके दूर, तितके सोने जवळ’ हे नवसिद्धांत आहे.व्हिडिओमध्ये एक क्षणही ‘शिक्षण’ यावर खर्च केला नाही.कारण इथं शिक्षण नाही – इथं ठेकेदारी आहे.एवढंच नव्हे – इथं एक गोरक्षण गोशाळाही आहे.गायीमुळे घरात सकारात्मकता येते, पण हे न सांगता राहिलं की कुटुंब सोन्याच्या वाटीत गोमूत्र पितं का?घरात एक सोन्याचं मंदिरसुद्धा आहे.प्रवेश करताना हात जोडावे लागतात. कारण हे ‘घर’ नाही – महाल आहे.
2014 मध्ये गाणं होतं – “ये दुनिया पितल दी” – पण या घराकडे पाहिल्यावर वाटतं – “ये दुनिया सोनेरी.”हे सोनं आलं कुठून?तर ते फक्त आणि फक्त ‘इमानदार ठेकेदारी’मधून आलं आहे.म्हणूनच ठरवा – तुमच्या मुलांना तुम्ही काय बनवणार?डॉक्टर? लेखक? सामाजिक कार्यकर्ता?नाही! त्यांना फक्त ‘ठेकेदार’ बनवा.आजच्या युगात जो इमानदारीवर प्रेम करतो, तो ठेकेदारीला नाही म्हणूच शकत नाही आणि शेवटी, सर्वात महत्त्वाचं –जेव्हा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी खर्च झाल्यावर गदारोळ होतो,तेव्हा इथल्या सोन्याच्या महालावर कोणीही काहीच का बोलत नाही?याचा विचार होणं आवश्यक आहे.हे केवळ बंगळ्याचं विश्लेषण नाही, ही यशाच्या नव्या व्याख्येची केस स्टडी आहे – ‘ठेकेदारी = इमानदारी = सोनं’.काय तुम्ही तयार आहात ही नवी समिकरण स्वीकारायला?