“भारत देशात लवकरच असा समाज निर्माण होईल की इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल,” असे वक्तव्य करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतली आहे. आजपर्यंत धर्म व जातीच्या नावावर समाजाचे विभाजन करून मतांचा ओघ वाढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता भाषेच्या आधारावर जनतेमध्ये फूट पाडण्याचे नवे शस्त्र उचलले आहे.
अमित शहा यांना हे वक्तव्य करताना सर्वप्रथम स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची परिस्थिती पाहायला हवी होती. त्यांचा मुलगा जय शहा जेव्हा इंग्रजी बोलतो, तेव्हा तो इंग्रजी माध्यमातील पहिलीच्या विद्यार्थ्यालाही हसू येईल अशा थरावर पोचतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही इंग्रजी बोलण्याचं कौशल्य अशाच प्रकारचं आहे. ‘अपॉर्च्युनिटी’सारखे सामान्य शब्दही ते नीट उच्चारू शकत नाहीत. ‘इन्वेस्टीगेशन ऑफ द गर्ल चाइल्ड’ म्हणत ते स्वतःचं हसू करून घेतात. मग अशा पायाभूत परिस्थितीत इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल असा समाज तयार होईल, असे सांगून ते काय साध्य करू पाहत आहेत?अमित शहा यांचं वक्तव्य हे प्रत्यक्षात त्यांच्या स्वतःच्या निकृष्ट इंग्रजी कौशल्यावरून उद्भवलेल्या न्यूनगंडातूनच आलेलं आहे का, हा प्रश्न उभा राहतो. जय शहा जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर इंग्रजीत बोलतात, तेव्हा संपूर्ण देशाला लाज वाटते. नरेंद्र मोदींचं इंग्रजी बोलणं हे अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर विनोदाचा विषय ठरतं. मोदी इंग्रजीत सुरुवात करून पुन्हा हिंदीवर येतात, हे त्यांच्या असुरक्षिततेचे लक्षण नाही का?
भारत ही बहुभाषिक संस्कृती आहे. इथे सुमारे अडीचशे भाषांमध्ये संवाद होतो. प्रत्येकाला आपली मातृभाषा आणि बोलीभाषेचा अभिमान असतो. मात्र त्याच वेळी इंग्रजी ही जागतिक व्यवहारांची आवश्यकता बनलेली आहे. इंग्रजी येणे ही लाज वाटण्याची बाब नाही, तर ती एक ताकद आहे. भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकर उत्कृष्ट इंग्रजी बोलतात, त्यांच्या पत्नी जपानी आहेत, घरात इंग्रजीचा वापर होतो. त्यांना लाज वाटावी, असे वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्याच सहकाऱ्यांचा अपमान नाही का?केंद्रातील मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, वित्त मंत्री निर्मला सीतारामन ह्या सुद्धा उत्तम इंग्रजी वक्ता आहेत. केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांची मुलं परदेशातील विद्यापीठांत शिकतात. मग त्यांनाही लाज वाटायला हवी का?
याप्रसंगी आम्ही पंडित नेहरू, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांचा उल्लेख करणे टाळतो, कारण भाजपला ते नाव कधी रुचलेच नाहीत. पण अटल बिहारी वाजपेयींसारख्या नेत्याने जागतिक व्यासपीठावरही हिंदीचा ठाम आग्रह धरला, मात्र कधी कोणाच्या भाषेचा अपमान केला नाही. हीच खरी हिंदुत्वाची, भारतीयत्वाची ओळख होती.प्रश्न भाषेचा नाही प्रश्न आहे मानसिकतेचा. भाषा ही ज्ञानाची दारे उघडते, त्यातून वांशिक किंवा भाषिक अभिमान तयार करणं योग्यच; परंतु दुसऱ्या भाषेचा अपमान करून स्वतःचा सन्मान साधणे ही प्रवृत्ती घातक आहे.
अमित शहा यांचे वक्तव्य, त्यामागची मानसिकता आणि त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेतले, तर ही समाजात भाषेच्या आधारावर नवीन फूट पाडण्याचा डाव वाटतो. इंग्रजीचे महत्त्व नाकारून भारत ‘विश्वगुरू’ बनू शकतो, हा विचार हास्यास्पद आहे. जग एका ‘ग्लोबल व्हिलेज’सारखे झाले असताना इंग्रजी हा संपर्काचा दुवा आहे, हे वास्तव आहे. देशभरातील बीपीओ, आयटी सेवा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या सर्व क्षेत्रांमध्ये इंग्रजी आवश्यक आहे.अमित शहा यांचे वक्तव्य काही चुकीच्या इंग्रजीवर हसणाऱ्या विरोधकांना उत्तर देण्यासाठी होते, असा प्रचार सुरू झाला आहे. पण प्रश्न असा आहे की, अशा उत्तरासाठी संपूर्ण देशातील इंग्रजी बोलणाऱ्या वर्गाचा अपमान करणे गरजेचे होते का?भाजपच्या प्रचार तंत्राची हीच जुनी पद्धत आहे. एक गट उंचावण्यासाठी दुसऱ्याचा अपमान करा. आधी धर्माच्या नावावर फूट, आता भाषेच्या नावावर. पण समाज हा अशा बळजबरीने न घडता समजुतीने, समतेने आणि सहविचाराने घडतो.
निष्कर्ष
भारताचा ‘विश्वगुरू’ होण्याचा मार्ग इंग्रजी, हिंदी, मराठी वा तामिळ यापैकी कोणत्याही एकाच भाषेतून जाणार नाही. तो जाणार आहे सर्व भाषांचा सन्मान राखत, सर्व नागरिकांच्या ज्ञानाच्या संधी वाढवतत् . अमित शहा यांचे वक्तव्य हे या मूलगामी तत्त्वाशी विसंगत आहे आणि म्हणूनच ते फेटाळले गेले पाहिजे.