BSF जवानांनी बनवली खरी Reel, उघड झाली रेल्वे मंत्रालयाची Real अवस्था!
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी १२ कोटी रुपयांची मर्सिडीज कार आणि ८४०० कोटी रुपयांची दोन लक्झरी विमाने उपलब्ध आहेत. ही व्यवस्था त्यांच्या सुरक्षिततेसाठी गरजेची असू शकते. पण, त्याच भारतात, देशाची सुरक्षा सांभाळणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांना दिली जाणारी ट्रेन इतकी घाणेरडी, मोडकळीला आलेली, आणि जीवघेणी कशी असू शकते?

नुकताच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी जात असलेल्या १२०० बीएसएफ जवानांना दिली गेलेली ट्रेन पाहून मन सुन्न होतं. डब्यांची अवस्था इतकी खराब होती की, त्या ट्रेनमध्ये माणसांनाही नेता येणार नाही ,जनावरांना सुद्धा नेणे अशक्य वाटावे, अशी दुर्दशा होती. शौचालयांना दरवाजे नव्हते, खिडक्यांना काच नव्हत्या, लोखंडी सांगाडे उघडे पडले होते, डबे धूळ, घाण आणि गंधाने भरलेले होते. काही ठिकाणी छत देखील कोसळलेले होते.

जवानांनी याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला. अनेक वृत्तवाहिन्यांनी तो दाखवला, आणि अखेर रेल्वे मंत्रालयाला जाग आली. काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले, पण ही फक्त तात्पुरती कारवाई आहे. १२ कोटींची गाडी पंतप्रधानांसाठी योग्य असेल, पण देशासाठी झटणाऱ्या जवानांसाठी काय?

या जवानांसाठी रेल्वे मंत्रालयाने आगोदरच पैसे घेतले होते. म्हणजे सेवा मोफत नव्हती, तर पैसे घेऊनही अशा परिस्थितीतली ट्रेन देण्यात आली. ही केवळ व्यवस्थेतील हलगर्जी नाही, तर एक प्रकारची अपमानास्पद वागणूक आहे.
या घटनेने मागील अनेक घटना आठवतात – पुलवामा हल्ला, जिथे विमान मागूनही मंजुरी चार महिने अडकून राहिली, आणि अखेर त्या हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले. सरकारने अजूनही त्या हल्ल्याची जबाबदारी निश्चित केलेली नाही.

बीएसएफ जवानांनी केलेली ही रिळ अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी खरी स्थिती जगासमोर आणली आहे. जर सामान्य नागरिक असे व्हिडिओ बनवले असते, तर त्याकडे दुर्लक्षच झाले असते. पण जवान पत्रकार झाले, आणि खरं दर्शन घडवलं – त्यांचं खरंच अभिनंदन करावं लागेल.
या देशात पंतप्रधानांच्या भेटीसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरु होते, रेड कार्पेट अंथरले जाते, पण जवानांसाठी तुटलेली, वापरात नसावी अशी भंगार ट्रेन दिली जाते, हे केवळ लाजिरवाणं नाही, तर संवेदनाहीनता दर्शवणारं आहे.

यातून काही प्रश्न निर्माण होतात: १२०० जवानांसाठी अशी ट्रेन दिली जाते, तिचं नियोजन कोणी केलं?
ट्रेनची तपासणी कोणी केली?
त्यांच्या सुरक्षा उपकरणांचं काय? तोटा झाला असता तर जबाबदार कोण?
जवानांना आपली हत्यारे आणि दारुगोळा या ट्रेन मध्ये सोबत घेऊन जायचा होता त्याच्या सुरक्षेचे काय
या देशात फक्त दिखावा चालतो का? देशसेवेचं खरं मूल्य केवळ भाषणात, की प्रत्यक्ष कृतीत असावं?
ही घटना केवळ ट्रेनपुरती मर्यादित नाही. ही व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेची आणि ढिसाळतेची लाजिरवाणी झलक आहे.
बीएसएफ जवानांनी यावर आवाज उठवला, हीच खरी देशसेवा आहे. रेल्वे मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, आणि सर्व रेल्वे गाड्यांची नियमित तपासणी करावी हीच देशाच्या जवानांसाठी खरा सॅल्यूट ठरेल.

