अहमदाबाद विमान अपघात”ब्लॅक बॉक्स सांगेल सत्य; पण माध्यमांनी आधी संयम पाळावा

अहमदाबादजवळ एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत २५० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. मात्र, या भीषण घटनेच्या पार्श्वभूमीवर काही मीडियातील अँकर आणि पत्रकार यावर “घातपात झाला का?” असा प्रश्न उपस्थित करत आहेत. अजून चौकशी सुरू असताना अशा तर्कांचे वातावरण तयार करणे, ही पत्रकारितेची नवी दिशा मानली जावी का?

विमानातील ब्लॅक बॉक्स हे अपघाताचे खरे कारण समोर आणू शकते. सामान्य नागरिकांनाही आता हे माहीत आहे की ब्लॅक बॉक्समधूनच खरी माहिती बाहेर येते. मग अशा परिस्थितीत काही अँकर अपघाताचा मुद्दा बाजूला ठेवून त्यावर राजकीय-राष्ट्रवादी रंग चढवण्याचा प्रयत्न का करत आहेत?

आजच्या मोबाईल युगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. अपघात दिसताच अनेकजण व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करतात. मात्र, आजच्या भीषण घटनेत अपघातातील मृतदेह अजूनही रुग्णालयात पोहोचले नसतानाच काहीजण या घटनेवर राजकीय भाष्य करत आहेत — हे अतिशय दुर्दैवी आहे.

एअर इंडियाची विमाने तांत्रिकदृष्ट्या कितपत सुरक्षित आहेत, याबाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आजच्या दुर्घटनेने हे प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत. पण काही अँकर आणि माध्यम प्रतिनिधी अपघाताचे स्वरूप बाजूला ठेवून सरकारचे बचावकर्ते बनले आहेत. हेच लोक जर एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सन्मानित केले गेले, तर त्याला विडंबन म्हणूनच पाहावं लागेल.

माध्यमांकडून ही दुर्घटना “गोदी मीडिया कट” असल्याचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न होत आहे. एखादा कट जर सरकारच्या विरोधात उघड झाला, तर तो देशद्रोह ठरतो; पण जर कोणी सरकारकडून प्रश्न विचारले, तर ते देशविरोधी ठरवले जातात – याला दुहेरी भूमिका म्हणावं की पत्रकारितेचं पतन?

 

ड्रीमलँडर कंपनीच्या विमानांविषयी अमेरिका आणि इतर देशांत अनेक वेळा गंभीर शंका व्यक्त झाल्या आहेत. अमेरिकेच्या एव्हिएशन सुरक्षा संस्थांनी त्यांच्यावर चौकशी केल्या आहेत. एवढं असूनही आपला देश त्यांच्यावरच विश्वास का ठेवतो आहे? एका इंजिनियरने स्वतः अमेरिकन सरकारकडे निवेदन देऊन या कंपनीचं उत्पादन थांबवावं, असं सांगितलं होतं. त्याने थेट म्हटलं होतं — “लोकांचे प्राण अधिक महत्त्वाचे आहेत!”

या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आणि एअर इंडियाने आपल्या निर्णयपद्धतीचा आणि सुरक्षेच्या निकषांचा पुनर्विचार करावा, ही काळाची गरज आहे.

या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. या अत्यंत दु:खद प्रसंगी राजकारण न करता, प्रथम सर्व मृतांचा सन्मानाने अंत्यविधी होऊ द्या. त्यांच्या चितांस अग्नी देण्याआधी, राजकीय भाष्य करणं हे मानवतेच्या विरोधातच आहे.

अंततः, अहमदाबाद विमान दुर्घटनेतील सर्व मृतांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती गाढ संवेदना व्यक्त करतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!