शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पध्दतीवर 80 हजार 750 रुपयांची दरमहा नवीन नोकरी देण्याचा शासनाचा निर्णय

नांदेड(प्रतिनिधीस)-शासकीय आणि निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सेवा करार पध्दतीने नोकरी मिळणार आहे. जास्तीत जास्त 80 हजार 750 रुपये असे पारिश्रमिक या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हा शासन निर्णय जारी केला असून यावर सहसचिव सुचिता महाडीक यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
शासकीय आणि निमशासकीय सेवामधून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना सेवाकरार पध्दतीने विवक्षीत कामांसाठी पुन्हा कार्यरत करून घेण्याबाबत 17 डिसेंबर 2016 रोजी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला होता. पुढे या निर्णयातील तरतुदीमुळे वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या.त्यानुसार अधिकाऱ्यांच्या सेवाविषय निहाय एमपॅनलमेंटकडून विवक्षीत कामासाठी करार पध्दतीने त्यांची निवड केली जाणार आहे.
या निवड प्रक्रियेमध्ये विवक्षीत कामांसाठी पात्र सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून अर्ज घेण्यात येतील. जाहीरातीमध्ये नामिका सुचित नियुक्त करायच्या एकूण व्यक्तींची संख्या असेल, विवक्षीत कामांचे स्वरुप असेल, कालावधीचा उल्लेख असेल आणि देय मासिक पारिश्रमिकाचा उल्लेख असेल. या नामामिका सुचितील व्यक्तीमधूनच करार पध्दतीने नियुक्ती करण्यात येईल. या नियुक्तीची वैधता जास्तीत जास्त तिन वर्ष असेल. काही कामांमध्ये कालावधी सुनिश्चित करण्याचा अधिकार संबंधीत सक्षम प्राधिकाऱ्याला असेल. करार पध्दतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तींना सेवेसंदर्भाने आणि इतर कोणतेही हक्क मागणी करता येणार नाहीत. करार पध्दतीने नियुक्ती देतांना कार्यालयातील आस्थापनेवर एकूण मंजुर पदसंख्येच्या जास्तीत जास्त 10 टक्के इतक्या अधिकाऱ्यांना करार पध्दतीने नियुक्ती देता येईल. नियुक्ती करण्याचे प्रस्ताव तयार करतांना कामाचे स्वरुप, आकस्मिकता, सार्वजनिक हित ईत्यादी बाबी विचारात घेतल्या जातील. सुरूवातीला करार एक वर्षाचा असेल, परंतू नियुक्तीच्या आवश्यकतेनुसार वाढीव कालावधीकरीता नुतनीकरण करता येईल. परंतू एकूण कालावधी 3 वर्षांपेक्षा अधिक असणार नाही. करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेला अधिकारी वयाच्या 65 वर्षापर्यंतच कार्यरत राहू शकेल. काही विशेष परिस्थितीमध्ये वय 70 वर्ष मानले जाईल. या कराराच्या नियुक्त्या सेवानिवृत्ती वेतनासाठी नाहीत. इतर भत्ते एकत्रित करून शासनाने त्याची रक्कम ठरवली आहे. करार पध्दतीने काम करणारा व्यक्ती सोपवलेल्या सेवा पार पाडतांना त्यात व्यथ्य येईल असे कोणतेही काम करू शकणार नाही. त्यांना दिलेले काम निश्चित वेळेत पुर्ण करणे ही त्यांची जबाबदारी असते.
करार पध्दतीत नियुक्त होणाऱ्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना ज्या दिवशी ते सेवानिवृत्त झाले. त्या दिवशीचे मुळ वेतन मिळेल. सोबतच 16 हजार 388 रुपये मुळ वेतनात महागाई भत्ता जोडला जाईल. इतर भत्यांमध्ये निवासी भत्ता, प्रवास भत्ता, दुरध्वनी भत्ता यासाठी दरमहा जास्तीत जास्त 16 हजार 150 रुपये मिळतील. या सर्व आकड्यांची बेरीज केल्यानंतर मिळणारे पारिश्रमिक जास्तीत जास्त 80 हजार 750 रुपये असेल. राज्य शासनाने आपला हा शासन निर्णय संकेतांक 202506101253359107 प्रमाणे शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!