नांदेड,(प्रतिनिधि)- छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू असतानाच, ९ जून रोजी सकाळी ११ वाजता माओवाद्यांनी भूसुरुंगाचा भीषण स्फोट घडवून आणला. या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राच्या मातीतून घडलेले, नागपूरचे सुपुत्र आणि सुकमा जिल्ह्यातील कोंटा विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे (वय ४६) शहीद झाले.
या हल्ल्यात इतर काही अधिकारी आणि जवानही जखमी झाले आहेत.
माओवाद्यांचा उच्चपदस्थ नेता आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशव राव ऊर्फ बसवा राजू याला २१ मे रोजी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ठार मारले होते. त्या कारवाईत एकूण २७ माओवादी मारले गेले होते. याच्या निषेधार्थ आणि बसवा राजूच्या स्मरणार्थ, माओवादी केंद्रीय समितीचे सदस्य भूपती ऊर्फ अभय याने १० जून रोजी बंदचे आवाहन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर, ९ जून रोजी सुकमा जिल्ह्यात माओवादविरोधी विशेष मोहीम राबवली जात होती.
या मोहिमेचा भाग म्हणून, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गिरीपुंजे स्वतः जवानांसोबत पायदळ गस्तीसाठी रस्त्यावर उतरले होते. कोंटा-एर्राबोर मार्गावरील डोंड्रा गावाजवळ माओवाद्यांनी आधीच सापळा रचलेला होता. रस्त्याच्या खोल भागात लपवलेले स्फोटक अचानक उडवण्यात आले. स्फोट इतका तीव्र होता की गिरीपुंजे यांना वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. कोंटाचे ठाणेप्रमुख आणि इतर काही जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
“मी पुढे चाललोय…” म्हणणारे गिरीपुंजे खरेच पुढे निघून गेले
गस्ती दरम्यान, गिरीपुंजे जवानांना नेहमीच प्रेरणा देत असत – “मी पुढे चाललोय, तुम्ही मागे उभे राहू नका.” आज मात्र, हेच शब्द त्यांच्यासोबत असलेल्या जवानांच्या मनात घर करून गेले… कारण ते खरंच पुढे – कायमच्यासाठी – निघून गेले. त्यांच्या मृतदेहाला उचलताना जवानांचे डोळे पाणावले. “आम्ही त्यांना डोळ्यात अश्रू ठेवून निरोप दिला,” असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
माओवाद्यांनी बदललेली रणनिती?
सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या नक्षलवादी स्फोटके दोन फूट अथवा त्याहून अधिक खोलीवर रस्त्याखाली लपवत आहेत. त्यामुळे आधुनिक डिटेक्टर उपकरणांनीही ती ओळखली जात नाहीत.
माओवादविरोधी कारवाईपूर्वी रस्त्याची तपासणी केली जाते, परंतु या स्फोटकांचा पत्ता लागलेला नाही. याआधी बिजापूरमध्येही अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. त्यामुळे “माओवाद्यांनी तंत्र बदलले का?” असा गंभीर प्रश्न आता सुरक्षा यंत्रणांपुढे उभा राहिला आहे.
अनेक धाडसी मोहिमांचे नेतृत्व करणारे अधिकारी आकाश राव गिरीपुंजे हे विदर्भातील सुपुत्र होते. नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या गिरीपुंजे यांनी अपार मेहनतीने आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी छत्तीसगडमध्ये अनेक माओवादविरोधी मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. शिस्तप्रिय, मनमिळावू आणि लोकाभिमुख असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या शहादतीने संपूर्ण पोलिस दल शोकाकुल झाले आहे.
