कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना जलसमाधी

उमरी तालुक्यातील भायेगाव येथील घटना
उमरी(प्रतिनिधी)- तालुक्यातील भायेगाव येथील एक महिला व दोन मुली गोदावरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. पण नदीतील पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. 7 जुन रोजी दुपारी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे भायेगाव येथे शोककळा पसरली असून. गावातील पाणी टंचाईमुळे एका महिलेसह दोन मुलींचा मृत्यू झाल्याने ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरी तालुक्यातील भायेगाव येथील दलित वस्तीमध्ये स्वतंत्र बोरवेल असून घरोघरी पाण्याची चांगली सुविधा होती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गावातील महिला गोदावरी नदीकाठावर कपडे धुण्यास जात नसत. मात्र मागील पंधरा दिवसांपासून बोरवेलची मोटार जळाल्यामुळे संपूर्ण वस्तीला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे शनिवारी दि.7 जुन रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सौ. महानंदा भगवान हनुमंते (वय 30), कु. पायल भगवान हनुमंते (वय 13) आणि कु. ऐश्वर्या मालू हनुमंते (वय 13) या तिघी कपडे धुण्यासाठी गोदावरी नदीकाठावर गेल्या. मात्र, नदीपात्रात गाळ आणि चिखलाचे प्रमाण अधिक असल्याने त्यांचा तोल जाऊन तिघीही पाण्यात बुडाल्या.
काही वेळातच त्या दिसेनाशा झाल्याने गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. अखेर स्थानिकांच्या मदतीने गळ टाकून तिघींचे मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर मयत एका महिलेसह दोन मुलींचे मृतदेह उत्तरीय तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय उमरी येथे पाठवण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकाच कुटुंबातील तिघींचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. यातील मयत पायल आणि ऐश्वर्या या दोघीही सातवी इयत्तेत शिकत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!