हदगाव (प्रतिनिधी)-नांदेड नागपूर या राष्ट्रीय महामार्गासाठी मुरूम नेल्यामुळे तयार झालेल्या खदानीत नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पाणी साचले. या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या निखिल वाढवे (15) रा. गारगव्हाण व संघर्ष पडघणे (16) रा. नेवरी या दोन शाळकरी मुलांचा आज दुपारी खदानीत बुडून मृत्यू झाला.
नांदेड नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे परंतु वारंगा ते महागांव यादरम्यानचे काम सुमारे पाच वर्षाच्या विश्रांतीनंतर मागील वर्षी सुरु झाले. या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरुमाची गरज असल्याने व गारगव्हाण भागातील शिवारात स्वस्तात मुरूम शेतकरी देत असल्यामुळे या महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे नजरा या भागाकडे वळल्या. गारगव्हाण येथील शेतकरी पुंडलिक वाढवे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. स्वतःच्या शेतात काम करण्यासोबतच ते शेतमजुरी करून आपली उपजीविका चालवतात. मागील वर्षी बरडशेवाळा येथील एका मध्यस्ताच्या मार्फत त्याला शेतातील मुरूम विकण्यासाठी ऑफर आली. त्यामुळे पुंडलिक वाढवे यांनी आपल्या शेतातून मुरुम देण्याचा करार केला. याबाबतीत रोडचे काम करणाऱ्या कंपनीने सर्व खर्च करायचा, रॉयल्टी भरायची, शासनाची परवानगी काढायची व खोदकाम करून मुरूम भरून न्यायचा. या बदल्यात प्रति ट्रीप दीडशे रुपये (सहा ब्रास मुरूम भरलेला एक हायवा) असा करार होता. याच प्रकारे गारगव्हाण शिवारातून आणखी दोन-तीन ठिकाणातून व शासकीय गायरान जमिनीतून मुरूम काढून नेला. अधिक स्वस्त मिळत असल्यामुळे या कंपनीने एकाच ठिकाणाहून आठ ते दहा मीटर खोल खोदकाम करत मुरूम काढून नेला त्या ठिकाणी छोटेसे तळेच तयार झाले. या शिवारात काही ठिकाणी मोठे दगड निघतात. असे एस्केव्हेटर (जेसीबी) मशीनला न उचलणारे मोठे दगड त्याच ठिकाणी ठेवून बाकीचा मुरूम व लहान-मोठे दगड राष्ट्रीय महामार्गासाठी व उड्डानपुलासाठी नेले.
आज दिनांक 29 मे रोजी गुरुवारी गारगव्हाण येथे मयत संघर्ष पडघने याच्या नात्यातील लग्न होते. या लग्नासाठी नेवरी येथून संघर्ष बाळू पडघने वय वर्षे हा आपल्या आजोळी आला होता. आणि निखिल पुंडलिक वाढवे वय पंधरा वर्षे हा हे दोघेही लहानपणापासूनचे मित्र आहेत संघर्ष नेहमी आजोळी यायचा त्यावेळी हे दोघे एकत्र खेळत असत. त्याप्रमाणेच हे दोघेही आज दुपारी बारा वाजता दरम्यान पोहण्यासाठी खदानीकडे गेले. या दोघांसोबत निखिलचा भाऊ सुमेध वाढवे हा सुद्धा गेला होता. सुमेध लहान असल्यामुळे तो पाण्यात उतरला नाही. परंतु संघर्ष आणि निखिल हे दोघेजण पोहण्यासाठी उतरले. परंतु ठिकठिकाणी खड्डे व काही ठिकाणी कमी पाणी असल्यामुळे खोल पाण्याचा अंदाज लागला नाही. ते गटांगळ्या खात होते. हे पाहून सुमेध गावाकडे ओरडत पळत सुटला. थोड्याच वेळात गावकरी घटनास्थळी पोहोचले. मनाठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांना कोणीतरी भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यांनी सुद्धा तातडीने आपले कर्मचारी घटनास्थळी पाठवले. तोपर्यंत गावकऱ्यांनी दोघांनाही खदानीतून काढून उपचारासाठी म्हणून हदगांव येथील उपजिल्हा रुग्णालयात गेले होते. तेथे डॉक्टरांनी दोघांचाही रुग्णालयात येण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. निखिल पुंडलिक वाढवे वर्षे हा गारगव्हाण येथील रहिवासी असून त्याला आणखी दोन भाऊ आहेत. तो मागील मार्च महिन्यात दिलेल्या परीक्षेत नववी पास झाला. तो तीन भावंडापैकी सर्वात मोठा होता. संघर्ष बाळू पडघणे वय वर्षे हा नेवरी तालुका हदगांव येथील रहिवाशी असून अत्यंत गरीब घरातील आहे. त्याचे आजोळ म्हणजे गारगव्हानच आहे. तो नुकतेच दहावी अर्थात एसएससीची परीक्षा पास झाला होता. त्याला आणखी एक भाऊ आहे. तो दोघा भावांपैकी मोठा होता. त्याचे वडील म्हणजेच बाळू पडघाने देखील दोन वर्षांपूर्वीच अचानक मरण पावला होता. त्याच्या वडिलांचे छत्र दोन वर्षांपूर्वीच हरवल्यामुळे रोज मजुरी करून त्याची आई दोघा भावांचा सांभाळ करते.
लग्नासाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा खदानीत बुडून मृत्यू
