हदगाव (प्रतिनिधी)-तालुक्यातील वरवट गावाजवळ असलेल्या नाल्याला अचानक आलेल्या पुरात पुतणी व मुलीसह एक महिला शेतातून गावाकडे जात असतांना तिघीही जणी वाहून गेल्या. या तिघींचेही मृतदेह घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सापडले. ही हृदयद्रावक घटना आज दि. 27 मे रोजी मंगळवारी एक वाजताच्या दरम्यान मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
वरवट येथील अत्यंत गरीब घरातील असलेल्या व शेतात मजुरीचे काम करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबातील सौ. अरुणा बळवंत शक्करगे (वय 25 वर्षे) ही महिला आपली मुलगी दुर्गा बळवंत शक्करगे (वय 04 वर्षे) व पुतणी अंकिता विजय शक्करगे वय 08 वर्षे यांना घेऊन शेतामध्ये कामानिमित्त गेलेल्या होत्या. हदगांव तालुक्यात अवकाळी पावसाने बामणी फाटा, मनाठा, वरवट परिसरात कहर केला आहे. आज 27 मे रोजी मंगळवारी एक वाजताच्या दरम्यान मनाठा वरवट परिसरामध्ये अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे शेतातील कामे बंद पडली. सकाळी आपल्या घरातील दोन लेकरांना घेऊन शेतात कामाला गेलेल्या त्या तिघी जणी पावसात आपल्या घराकडे जाऊ लागल्या. गावा लगत असलेल्या पुलावरून आपल्या घराकडे जात असतांना अचानक आलेल्या पुराने ती तिनही मायलेकरे त्या पुरात वाहून गेले. यातील दुर्गा बळवंत शक्करगे हीचा मृतदेह अडीच वाजता सापडला असून अरुणा शक्करगे व अंकिता शक्करगे यांचा शोध पाच वाजेपर्यंत लागला नव्हता. पडत्या पावसात शोध मोहीम युद्ध पातळीवर राबविण्यात आली. शेवटी पथक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने साडेपाच वाजता अंकिता व अरुणा यांचे मृतदेह शोधण्यात यश मिळवले. या घटनेमुळे वरवट परिसरामध्ये दुःखाचे सावट पसरले आहे.
या घटनेची माहिती मिळताच हदगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे, मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे, मंडळ अधिकारी अरुण गिते, तलाठी हनुमंत बेंबरकर आपल्या टिमला घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लगेच तहसीलदार सुरेखा नांदे यांनी नांदेड येथून अग्निशामक दलाला व आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला पाचारण केले. वरवट ते कळमनुरी तालुक्यातील चुंचा, चिखली, फुटाणा, आणि कयाधू नदीच्या परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली.
दुर्गा बळवंत शकरगे वय चार वर्षे ही शिक्षणाचा श्री गणेशा गिरण्याच्या पूर्वतयारीसाठी अंगणवाडीत जाते. तर अंकिता ही आठ वर्षाची मुलगी तिसऱ्या वर्गात शिकत आहे. दुर्गा बळवंत शक्करगे या मुलीचा मृतदेह सापडला असून उर्वरित दोघींचा सायंकाळपर्यंत शोध लागला नव्हता. वृत्त लिहिताना मिळालेल्या ताज्या माहितीनुसार अरुणा बळवंत शक्करगे व तिची पुतणी अंकिता विजय शक्करगे या दोघींचेही मृतदेह घटनेच्या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सापडले असल्याचे पोलिसांकडून समजले.
नाल्याला आलेल्या पुरात आईसह चिमुकली आणि पुतणीचाही अंत; वरवट येथील घटना
