हरित क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

  नांदेड- हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

नांदेड शहरातील कै. वसंतराव नाईक चौक येथे पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार अशोक चव्हाण,  आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुसिंग महाराज राठोड, आमदार बाबुराव कदम, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी उपस्थित होते.

प्रारंभी मंचावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर श्री. शाह यांनी कळ दाबुन पुतळ्याचे अनावरण केले. तसेच त्यांच्या हस्ते नामफलकाचेही अनावरण करण्यात आले. याप्रसंगी बंजारा समाजाच्यावतीने श्री. शाह व श्री. फडणवीस यांचा पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे नागरिक उपस्थित होते.

हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने नांदेड शहरातील कै. वसंतराव नाईक चौक परिसरात उभारला आहे. नऊ फूट उंचीच्या या पुतळ्याचे वजन सुमारे 700 किलो आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी रुपये 13 लक्ष 99 हजार एवढा खर्च आला आहे. 232.60 चौ.मी. जागेत या पुतळ्याची उभारणी करण्यात आलेली आहे. सुशोभिकरणाचे अंदाजे 69 लाख रुपयांची कामे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!