नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेवर येथील डॉक्टरांनी चुकीचे उपचार आणि चुकीची शस्त्रक्रिया केल्यामुळे त्या महिलेचा जिव वाचविण्यासाठी 31 लाख रुपये खर्च झाला. या संदर्भाने देण्यात आलेल्या तक्रारीनंतर डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.बी.देशमुख यांनी अंकुर हॉस्पीटच्या डॉक्टरांना चौकशी समितीच्या निर्णयानुसार क्लिनचिट दिली आहे आणि तसे पत्र पोलीस ठाणे शिवाजीनगर यांना पाठवून दिले आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्याविरुध्द आलेल्या तक्रारी चौकशी त्यांना क्लिनचिटच देते हे सिध्द झाले आहे. या चौकशी समितीमध्ये सहा डॉक्टरांचा समावेश होता.
शुभांगी पंकज आढाव यांचे पती पंकज आढाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 जुलै 2024 रोजी अंकुर हॉस्पीटल, अण्णाभाऊ साठे चौक येथे शुभांगी यांची सोनोग्राफी करण्यात आली आणि त्यांना गर्भपाताचा सल्ला देण्यात आला. या दवाखान्यात दुसरे आपत्य होण्यासाठी शुभांगी यांना बरेच उपचार देण्यात आले. आणि त्यावेळी सुध्दा दुसरीकडेच गर्भ वाढत आहे, गर्भायात वाढत नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना नांदेडला अभ्युदय लाईफ केअर हॉस्पीटल येथे डॉ.श्रीवल्भ कार्लेकर यांनी सुध्दा उपचार दिला. पुढे त्यांना डॉ.विक्रांत मान्नीकर यांनी सुध्दा उपचार दिला. कोणतेही उपचार घेत असतांना डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांच्या स्वाक्षऱ्या घेत असतात. त्या प्रपत्रावर काय लिहिले आहे. ते कोणीच वाचत नाही, त्याला आपला रुग्ण वाचविण्याची घाई असते. अनेक वेळेस कोऱ्या कागदांवर सुध्दा स्वाक्षऱ्या घेतल्या जातात आणि कोणी विचारल तर ते आम्ही नंतर भरू असे सांगितले जाते. असे या प्रकरणात झाले होते अशी माहिती पंकज आढाव यांनी वास्तव न्युज लाईव्हला दिली.
त्यानंतर त्यांनी हैद्राबाद येथील अपोलो हॉस्पीटमध्ये आपल्या पत्नीला उपचार दिला आणि त्यासाठी त्यांना 31 लाख रुपये खर्च आला. त्यांचे पुर्वीचे एक आपत्य आई-विना त्रासले, कुटूंब त्रासले आणि आर्थिक खर्च तर एवढा मोठा झाला. तेंव्हा पंकज आढाव यांनी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे तक्रार दिली. ती तक्रार पोलीसांनी चौकशीसाठी डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे पाठविली. अल्का जाधव, डॉ.ऋषीकेश देशपांडे, डॉ.शिरीष दुलेवाड, डॉ.सचिन तोटावाड, डॉ.ओबेद खान आणि डॉ.शिवानंद देवसरकर यांनी या प्रकरणाची चौकशी केली. ज्यामध्ये पंकज आढाव यांचे म्हणणे आहे, उपचार देणारे डॉ.श्रीवल्भ कार्लेकर व डॉ.विक्र्रांत मान्नीकर यांनी काय केले. याचे विवरण आहे आणि चौकशी समितीतील प्रत्येकाने आपला अभिप्राय लिहिला आहे आणि चौकशी समितीने लिहिलेले उपचार प्रक्रिया ही रुग्ण व रुग्ण नातेवाईक यांची वेळोवेळी संम्मती घेवूनच करण्यात आलेली असून सम्मतीविना कोणतीही प्रक्रिया पार पाडली नाही असे सकृतदर्शनी दिसून येत असल्यामुळे या प्रकरणी डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारची चुकीची उपचार पध्दती अवलंबली नाही त्यामुळे या प्रकरणी कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा अथवा हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत नाही असे सांगत या 32 पानी अहवालाचा शेवट करत अंकुर हॉस्पीटच्या डॉक्टरांना क्लिनचिट दिली आहे.
या संदर्भाने पंकज आढाव सांगत होते मी भोगलेला त्रास इतरांना कसे समजेल. माझी किंवा इतर नातेवाईकांची स्वाक्षरी घेतली याला आम्ही नाकारत नाही. पण डॉक्टरांनी सत्य सांगावे की, ते सर्व प्रपत्र स्वाक्षरी घेतांना भरलेले होते काय, ते प्रपत्रक कशाचे आहेत आम्हाला सांगितले काय? म्हणजे पंकज आढाव यांच्या सांगण्याप्रमाणे डॉक्टरांच्या विरुध्द डॉक्टरच ते सुध्दा स्थानिक तपासणी करणार तर त्यातून कधीच काय चुक निघणारच नाही.
अंकुर हॉस्पीटलच्या डॉक्टरांना डॉक्टरांच्या समितीने दिली क्लिनचिट
