नांदेड (प्रतिनिधी)- अर्धापूर शनि पार्डी जाणाऱ्या रस्त्यावर एका 25 वर्षीय शेतकऱ्याला अडवून चार जणांनी त्याच्या खिशातील 50 हजार रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे. मौ. बारड येथे एक बिअर बार फोडून 99 हजार 300 रूपयांची दारू चोरून नेली आहे. कौठा बसस्थानकात एका महिलेचे 4 तोळे 4 ग्रॅम वजनाचे 70 हजार 400 रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
शनि पार्डी ता. अर्धापूर येथील शेतकरी प्रदीप सुभाष खांडरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 13 मे रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ते गावाकडे येत असताना अर्धापूर ते शनि रस्त्यावर त्यांना अडवून, धाक दाखवून त्यांच्या खिशातील 50 हजार रूपये रोख रक्कम जळजबरीने चोरून नेली आहे. अर्धापूर पोलिसांनी ही घटना 287/2025 नुसार दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भोसले करत आहेत.
बारड येथील गजानन आबासाहेब देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बारड शहरातील दुधनगाव रस्त्यावर त्यांचे श्लोक बार आहे. 12 मेच्या रात्री 11.30 ते 13 मेच्या पहाटे 9 वाजेदरम्यान कोणीतरी चोरट्यांनी हॉटेलच्या दरवाज्याच्या कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला आणि त्यातील 99 हजार 300 रूपये किंमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्या आहेत. बारड पोलिसांनी ही घटना गुन्हा क्र. 59/2025 नुसार दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष केदासे अधिक तपास करीत आहेत.
निर्मलकुमार स्वामी जंगम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 मे रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास नांदेड ते उदगीर बसमध्ये प्रवास सुरू करण्याअगोदर त्यांच्या पर्समधील 4 तोळे 4 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत 70 हजार 400 रूपये असा ऐवज कोणीतरी चोरट्याने चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी ही घटना 457/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार मोरे अधिक तपास करीत आहेत.
