जैस ए मोहम्मदचा दुसरा कमांडर तथा मौलाना अजहर मसुदचा भाऊ रऊफ अजगर हा मरण पावल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या. परंतू सायंकाळी पुन्हा एकदा विदेश सचिव विक्रम मिसीर, कर्नल सौफिया कुरेशी आणि विंगकमांडर व्योमिकासिंह यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितलेल्या माहितीत मात्र रऊफ अजगरचा मृत्यू झाला ही माहिती नव्हती. गोदी मिडीयाने तर गाजामध्ये झालेल्या हल्यांचे व्हिडीओ दाखवून भारताने पाकिस्तानवर हल्या केल्याच्या खोट्याच बातम्या दाखवल्या. भारतीय जनता पार्टीने ऑपरेशन सिंदुरची मार्केटींग सुध्दा सुरू केली. आज देशात असलेल्या परिस्थितीनुसार भारतातील सर्वच पत्रकार तथा जगातील पत्रकारांची ही जबाबदारी आहे की, युध्दाच्या बातम्या सत्यता आणि पारदर्शकता यावरच आधारीत असाव्यात. पण गोदी मिडीयाला कोण सांगणार. काही युट्युब चॅनल सरकारने बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू केला. यापेक्षा सर्वात भारी भारतात मोटार शेलिंगमुळे 15 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर बोलावण्यात आलेल्या सर्व पक्षीय बैठकीत पंतप्रधान आले नाहीत. बैठकीनंतर विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी आणि कॉंगे्रस अध्यक्ष खा. मल्लीकार्जुन खरगे यांनी मात्र आज देशाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे इतर कोणत्याही प्रकारच्या चर्चा आज करायच्या नाहीत असे सांगून आम्ही आमचा पाठींबा सरकारला दिल्याचे सांगितले.

पाकिस्तानच्या आतकंवादी ठिकाण्यांवर भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही विभागांनी संयुक्त कार्यवाही करून दाखवलेला बाणा महत्वपुर्ण आहे. त्याच्या प्रतिक्रियेत पाकिस्तानने भारतीय नागरीकांवर हल्ला करून चायना टाऊन सिनेमातील जगीराच्या शब्दातील कमिनापन दाखवलाच. त्यांनी गुरुद्वारावर हल्ला केला. सर्वसामान्य नागरीकांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानसोबतच्या भुमिकेसाठी सर्व पक्षांची बैठक बोलावण्यात आली. या सर्व पक्षांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर नव्हतेच. पहिल्या ही बैठकीत ते हजर नव्हते. बैठक संपल्यानंतर खा.राहुल गांधी यांनी सांगितले की, आजच्या देशाच्या परिस्थिती अनुरुप कोणत्याही इतर विषयावर चर्चा करायची नाही. आम्ही आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी सरकारला पाठींबा दिला आहे. खा.मल्लीकार्जुन खरगे म्हणाले. पंतप्रधान हजर नव्हते हे खरे आहे. त्याबद्दल जेंव्हा बोलता येईल त्यावेळी नक्कीच बोलू. परंतू आज तो विषय आणून चर्चेला वेगळे वळण द्यायचे नाही. याच प्रसंगी खा.असदोद्दीन ओवेसी यांनी सांगितले की, ज्या पाकिस्तानकडे खाण्यासाठी भाकर नाही त्यांनी भारताशी पंगा घ्यावा काय? एकीकडे असे सुरू असतांना दुसरीकडे मात्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ऑपरेशन सिंदुरचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी मोठ-मोठे बॅनर झळकवले आहेत. एका बॅनवर सैन्य अधिकाऱ्याच्या गणवेशात पंतप्रधान नरेंद्र मोदीचा फोटो आहे तर दुसऱ्या बॅनरवर गृहमंत्री अमित शाह आणि उर्वरक मंत्री जे.पी.नड्डा यांचा फोटो आहे. वाचकांनो अजून ऑपरेशन सिंदुर संपलेले नाही. या बॅनरवर फक्त सैन्याचे नाव आहे. यापुर्वी आवकाशात गेलेल्या चंद्रयान या यशाचे श्रेय सुध्दा भारतीय जनता पार्टीने वैज्ञानिकांना वगळून फक्त नरेंद्र मोदीला दिले होते. त्याही वेळेस तसे बॅनर प्रसारीत करण्यात आले होते.
काल रात्री पाकिस्तान सैन्याने ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून भारतातील 10 शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. परंतू कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असलेल्या सैन्याने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला उलटून लावला.

भारताच्या अनेक शहरांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले होते. पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा भारतीय सैनिकांनी उध्वस्त केली. या परिस्थितीत मात्र दोन्ही मिडीयाचे पत्रकार इजराईल आणि गाजाच्या लढाईमधील व्हिडीओ दाखवून भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केल्याचे सांगत होते. भारतीय सैन्याने एलओसीवरच्या अनेक पाकिस्तानी चौक्या नेस्तनाबुत केल्या आहेत. परंतू त्यासाठी मागचे व्हिडीओ दाखवले जातात. पाकिस्तानचे एक विमान आम्ही पाडले अशा ही बातम्या दिल्या जात होत्या. परंतू सैन्याने मात्र याला दुजोरा दिलेला नाही. अहो आमची मंडळी एवढी भिकारचोट आहे की, कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर गद्दारीचे आरोप करत आहे. सोफिया कुरेशी यांचे बोलणे ज्यांनी एकले आहे. त्यांनी पुन्हा एकदा ऐकावे. त्यांच्या बोलण्यातील शब्दांवरचे वजन, शब्दांना वापरण्याची पध्दत चांगल्या-चांगल्या वांगमय् अभ्यासकांना येणार नाही अशी होती. सैन्याच्यावतीने त्यांना सादरीकरणाची जबाबदारी देण्यात आली होती. ती त्यांनी अत्यंत मोजून मापून पुर्ण केलेली आहे. आपल्या देशाच्या वाघीणीबद्दल गद्दार हा शब्द वापरणाऱ्यांना लाज कशी वाटली नसेल.

आज आयएमएफच्यावतीने पाकिस्तानला 1.3 अब्ज डॉलर निधी वितरीत करण्यावर चर्चा होणार आहे. हे आयएमएफने पाकिस्तानला दिलेले 25 वे कर्ज आहे. म्हणजे 25 वेळेस पाकिस्तानला आर्थिक संकटातून आयएमएफने वाचवले आहे. आयएमएफमध्ये सर्वात मोठा निधी अमेरिका देतो. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आहेत. त्यांच्या सांगितल्याशिवाय आयएमएफ काहीच निर्णय घेत नाही. मग डोनॉल्ड ट्रम्प त्यांना का रोखत नाहीत. ट्रम्पने पाकिस्तानमधील आपल्या दुतावासाच्या लोकांना लपून राहण्यासाठी का सांगितले. पाकिस्तान एवढा चांगला आहे ज्याला 1.3 अब्ज डॉलर कर्ज दिले जात आहे. तसेच त्यांच्यावर अगोदरच 7 अब्ज डॉलर कर्ज सुरू आहे. ज्यात दरवर्षी 1 अब्ज डॉलर दिले जातात. ट्रान्सप्रंन्सी इंटरनॅशनल या संस्थेने पाकिस्तान हा जगातील सर्वात भ्रष्ट देश असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तान विदेशी मदतीला आपल्या भ्रष्टाचाराची गॅरंटी समजतो. तरी त्यांना मदत दिली जाते हा किती वाईट प्रकार आहे. पाकिस्तानच्या ऐबटाबादमध्ये ओसामाबिन लादेनला अमेरिकेच्या नेव्हीसिलने पकडून नेले. त्याला एकट्यालाच नव्हे तर इतरही काही सदस्यांना नेले. ऐबटाबाद हा भाग पाकिस्तानच्या सैन्याचा आहे. अमेरिकेने तेथे चार हेलिकॉप्टर पाठवून ओसामाबिन लादेनला उचलले होते. त्यातील एक हेलिकॉप्टर खराब झाले होते तर ते हेलिकॉप्टर तेथेच सोडून ते निघून गेले होते. तालिबानला पाकिस्तान मदत करते. आयएसआयने तालिबानला ट्रेनिंग दिली आहे.

मार्च 2025 मध्ये सुध्दा पाकिस्तानला 1.30 अब्ज डॉलटरचे कर्ज दिले होते. ते कर्ज जलवायु बदलाव करण्यासाठी दिले होते. खरे तर पाकिस्तानला मदत करणाऱ्या आयएमएफने त्यांच्या आतकंवादी प्रकरणांचा ईतिहास पाहावा. अमेरिकेत झालेल्या ट्विन टावर हल्याचे तार सुध्दा पाकिस्तानशी जोडले गेले होते. तरी पण अमेरिका त्यांना मदत करते. भारताच्या नागरीकांना आमच्यावतीने नम्र निवेदन आहे की, अनेक खोट्या अकाऊंटवरून सामाजिक संकेतस्थळांवर खोट्या पोस्ट होत आहेत. त्या पोस्टमधील फोटाची तपासणी गुगलवर काही मिनिटात होते. आम्ही पाहिलेल्या अनेक फोटो जुनेच आहेत. परंतू आज अमृतसर जळत आहे, दिल्ली पेटली आहे असे शब्द टाकून पाकिस्तानी सैन्याला शाब्बासकी दिली जात आहे. ते पोस्ट खोट्या आहेत. वाचकांनी स्वत: त्या पोस्टमधील तपासणी गुगलवर करावी तर त्यांना सत्य कळेल. आम्ही इतर पध्दतीच्या प्रसारणावर लिहित असलो तरी भारतातील गोदी मिडीया सुध्दा असाच बराच खोटा प्रचार करत आहे. रऊफ अजगर मरण पावलेल्या बातमीला सैन्याच्या पत्रकार परिषदेत दुजोरा मिळाला नाही. तसेच गोदी मिडीयावर दाखवले जाणारे व्हिडीओ सुध्दा गाजा आणि इजराईलच्या युध्दातील आहेत. भारताचे रक्षामंत्री सुध्दा म्हणाले आहे की, 100 पेक्षा जास्त अतिरेकी मरण पावले. पण त्यांच्या या शब्दांना कोठूनच दुजोरा मिळत नाही. आमची पत्रकारांना सुध्दा विनंती आहे की, सुत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर बातम्या देवू नका. कारण आज देशावर संकटाचा विषय आहे.

