नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय गुणवत्ता परिषदेने केलेल्या मुल्यमापनानंतर नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालय राज्यात द्वितीय क्रमांक मिळणारे ठरले आहे. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम राज्य सरकारच्यावतीने आखण्यात आली होती. त्यात हे द्वितीय पारितोषीक नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयाने मिळवले आहे.
7 जानेवारी 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय कार्यालयानांना कार्यालयीन सुधारणा करण्यासाठी 100 दिवसांचा 7 कलमी सुधारणा कार्यक्रम आखुन दिला होता. या कार्यक्रमांतर्गत कार्यालयासाठी संकेतस्थळ, कार्यालयीन सुधारणा, नागरीकांसाठी पुरविणाऱ्या सेवांचे सुलभीकरण, जुन्या अभिलेखांचे निंदनीकरण, निरलेखन, कालाबाह्य वस्तु व वाहनांची विल्हेवाट, कार्यालयाने राबविलेल्या नाविन्यपुर्ण योजना इत्यादी विषयांवर काम करायचे होते.
वरील कार्यक्रम पुर्ण करण्यासाठी ठरवून दिलेली 100 दिवसांची मुदत 16 एप्रिल रोजी संपली. परिक्षेत्रीय कार्यालयाने केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन प्रथमत: पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आले. पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील तीन पोलीस महानिरिक्षक/ पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयांची निवड केली होती. त्यात नांदेड पोलीस परिक्षेत्रीय कार्यालयाचा समावेश होता.
दि.24 एप्रिल 2025 रोजी भारतीय गुणवत्ता परिषदेने नांदेड कार्यालयाची पाहणी करून कार्यालयाने केलेल्या सुधारणा, परिक्षेत्रीय कार्यालयापासून थेट पोलीस ठाण्यांपर्यंत सुरु केलेली ई-टपाल व्यवस्था, गुन्हे अभिलेखांचे संगणीकरण, तपासावर देखरेख ठेवण्यासाठी सुरू केलेली ईगलआय, क्राईम इन्व्हेस्टीगेशन मॉनिटरींग प्रणाली, विविध प्रकरणात नागरीकांना शिघ्रतेने सेवा देण्यासाठी सुरू केलेली कालबध्द निर्गती मोहिम, ग्राम पातळीवर लोकांच्या सहभागातून सुरू केलेले व्यसनमुक्त गावा मोहिम, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पातळीवर सुरू केलेले तक्रार निवारण केंद्र, पोलीस ठाणे पातळीवर राबविलेले तक्रार निवारण बिल इत्यादी कामांची भारतीय गुणवत्ता परिषदेने दखल घेतली. महाराष्ट्र दिनी भारतीय गुणवत्ता परिषदेने हा निकाल जाहीर केला. त्यात नांदेड पोलीस परिक्षेत्रीय कार्यालय राज्यातून द्वितीय क्रमांक मिळवणारे ठरले.
कार्यालयातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांनी अहोरात्र घेतलेल्या परिश्रमामुळेच हे यश शक्य झाले. या यशात परिक्षेत्रातील प्रत्येक अधिकारी व अंमलदारांचा मोठा वाटा आहे असे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना वाटते.
नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालय 100 दिवसांच्या कार्यक्रमात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
