नांदेड(प्रतिनिधी)-काही दिवसांत नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचा प्रभार सहाय्यक पोलीस निरिक्षकांकडे येणार असल्याचा प्रचार खुद्द एक सहाय्यक पोलीस निरिक्षक जनतेकडे करत आहे. बहुदा स्थानिक गुन्हा शाखेच्या नियुक्तीची प्रक्रिया त्यांना माहित नसावी किंवा त्यांच्यातील दम एवढा असेल की, ते ही नियुक्ती करून घेवू शकतात.
वरिष्ठ वर्दीधारी अधिकाऱ्यांच्या बदल्या, जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पोलीस अंमलदारांच्या बदल्या यामध्ये हातखंडा असलेले बदल्यांचे केंद्र बदलून छत्रपती संभाजीनगर येथे गेल्यानंतर सुध्दा नांदेड जिल्ह्याचा कारभार त्यांच्याच हातात असल्याची अनेक उदाहरणे दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी रहाटी या वाळू धक्यावर गावकऱ्यांनी रात्रीला जवळपास 40 अवैध वाळू गाड्या रोखून धरल्या. त्यानंतर त्या रहाटी वाळू ठेक्याचा ठेकेदार आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक तेथे गेले आणि गावकऱ्यांना वेगवेगळ्यापध्दतीने विनंत्या करून त्यांना पटवले आणि त्या गाड्या सोडायला लावल्या. यामध्ये सुध्दा मोदक प्रसाद जोडलेलाच आहे. पण तो मोदक प्रसाद एका मंदिरातील कार्यक्रमासाठी होता असे सांगण्यात आले.
याच गावातील काही लोक त्या दिवशी त्यांना भेटल्यानंतर तुमची तर बदली झाली तुम्ही कसे काय आले अशी विचारणा केली असता सहाय्यक पोलीस निरिक्षक सांगत होते की, मी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचा पोलीस निरिक्षक होणार आहे. अद्याप सहाय्यक पोलीस निरिक्षकच आहेत. स्थानिक गुन्हा शाखेत पोलीस निरिक्षक होण्यासाठी अगोदर पोलीस निरिक्षक हे पद मिळावे लागते. त्यानंतर पोलीस विभागात अ श्रेणीचे तीन पोलीस ठाणे येथे आपली सेवा द्यावी लागते आणि त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीसाठी स्पर्धेत उतरता येते. ही बाब सहाय्यक पोलीस निरिक्षकांना माहित असेल तरी जाणून बुजून हा प्रचार ते करत आहेत. बहुदा कुंभमेळ्याच्या दर्शनाने त्यांना एवढी ताकत आली असेल की, पोलीस निरिक्षकाच्या पदावर सहाय्यक पोलीस निरिक्षक सुध्दा बसविता येतात. त्यांना मिळालेल्या ताकतीचा योग्य उपयोग व्हावा आणि सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी त्यांनी काम करावे नाही तरी तयार होणाऱ्या महामार्गांवर पोते टाकून त्यावर पाणी टाकण्याचे काम उपलब्ध आहेच .
या सहाय्यक पोलीस निरिक्षकांना नांदेडचाच एवढा मोह का असेल याचे उत्तर मात्र अत्यंत कठीण आहे. काही आम्हीच जिल्हा चालवितो असे दाखविणारे नेते आहेत. त्यांना कोठे तरी मध्यस्थी लागते. ती मध्यस्थी सुध्दा यांच्याकडेच असल्याची खात्रीलायक माहिती आहे. शासकीय नोकरीच्या जीवनात बदली हा भाग तेवढाच महत्वपुर्ण आहे. जेवढे त्यांच्या कामाचे महत्व आहे. पण का हवे आपले प्रस्थ नांदेड जिल्ह्यातच. याचा शोध सुध्दा होण्याची गरज आहे. त्यापेक्षा या सहाय्यक पोलीस निरिक्षकांना कोण-कोणत्या राजकीय नेत्यांना, पत्रकारांचा आशिर्वाद आहे याचा शोध लागला तर बऱ्याच बाबी उघड होतील.
स्थानिक गुन्हा शाखेचा प्रभारी होणार आता सहाय्यक पोलीस निरिक्षक?
