पहलगाम येथे बैसारन घाटीत अतिरेक्यांनी निर्दोष पर्यटकांवर हल्ला करून 28 जणांचा जिव घेतला. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्ताविरुध्द कडक पाऊले उचलत पाकिस्तानच्या सर्व लोकांचे व्हिसा रद्द करून त्यांना परत पाठविण्याची (डीपोर्ट) तयारी सुरू केली. परंतू आमच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, त्यातील एक महिला शमीम अख्तर यांना परत पाठवू नका कारण त्या महिलेने जन्म दिलेल्या एका वाघाने 2022 मध्ये अतिरेक्यांशी झुंज देवून देशासाठी स्वत: चे बलिदान दिले होते. त्याच्या मृत्यूनंतर भारत सरकारने शौर्य चक्र प्रदान करून त्याच्या कामाची प्रशंसा केली होती. ती महिला मागील 40 वर्षापासून भारतात राहत आहे आणि ती पाकिस्तानची नाही तर पीओकेमधील आहे. पीओके हा भाग आमचाच आहे. मग आमच्याच भागातील महिलेला पाकिस्तानला पाठवून काय साध्य होणार. तिच्या लेकरामुळे ज्या अतिरेक्यांचा अंत झाला त्यांची नातलग मंडळी पण पाकिस्तानमध्येच आहेत ना. म्हणून या महिलेला पाकिस्तानला पाठवू नका अशी आमची विनंती सरकारला आहे.

पहलगाम येथे हल्ला झाल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आणि व्हिसावर भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांना शोधून त्यांना परत पाठवायचा निर्णय घेतला आज त्याचा शेवटचा दिवस आहे. या सर्वांना आज वाघा बॉर्डरवरून परत पाठविले जाणार आहे. त्यात श्रीनगरमधील महिला शमीम अख्तर यांचा सुध्दा समावेश आहे. आमच्या मते त्या महिलेला पाठविल्यामुळे आमचा देश हिट होणार आहे. आम्हाला त्रास होणार आहे. वाचकांना वाटत असेल की आम्ही असे का म्हणत आहोत. त्यासाठी आम्ही वाचकांना जुना घटनाक्रम सांगतो. 22 मे 2022 रोजी अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरूंवर हल्ला होणार असल्याची माहिती जम्मु-काश्मिर पोलीसंाना मिळाली. जम्मू -काश्मिर पोलीसांचे विशेष पथक त्या भागात अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक गाडीची तपासणी करत होते. पोलीसांना एका गाडीवर शंका आली आणि पोलीस तिकडे जात असतांना गाडीत बसलेल्या तीन अतिरेक्यांनी बेछुट गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यावेळी जम्मू-काश्मिर पोलीसांचा शिपाई शेख मुद्दसिर अहेमद हा त्या गाडीवर झेपावला. तीन पैकी एका अतिरेक्याला त्याने बाहेर खेचून आणले. त्याला माहित नसेल काय की, मी एकाला खेचेल तर इतर दोन माझ्यावर गोळीबार करतील पण तो जिगरबाज शिपाई मृत्यूला घाबरला नाही आणि एका अतिरेक्याला बाहेर खेचतांना इतर दोघांना त्या वाघावर केलेल्या गोळीबाराने त्याच्या शरिराची चाळणी झाली. तो जवान जम्मू-काश्मिरमधील सर्वसामान्य नागरीकांच्या ओळखीचा होता. त्याला लोक बिनधास्त भाई असे म्हणत होते. त्याच्या मुळ नावाने त्याला कोणीच आवाज देत नव्हते. अशी ख्याती असलेला वाघ या परत पाठविलेल्या जाणाऱ्या शमीम अख्तर या महिलेचा पुत्र होता. त्याच्या इतर सहकाऱ्यांनी नंतर तिन्ही अतिरेक्यांना कंठस्नान घातले. पण त्यांनी आपला एक वाघासारखा सारखा साथीदार गमावला होता. पुढे 74 व्या गणतंत्र दिनी भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी शेख मुद्दसिर अहेमदला भारताच्या मानाचे तिसऱ्या क्रमांकावर असणारे शौर्य पदक प्रदान केले. शेख मुद्दसिर अहेमदचे वडील शेख मकसुद अहेमद सुध्दा जम्मू-काश्मिर विभागातून पोलीस उपनिरिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते.

बिनधास्त भाई अर्थात शेख मुद्दसिर अहेमद हा अगोदरच चालक होता. परंतू आपल्या वडीलांच्या वर्जीदाला पाहुन त्याला सुध्दा पोलीस होण्याची जिद्द तयार झाली आणि तो जम्मू-काश्मिरच्या पोलीस दलात सामिल झाला. शालेय जीवनात एसएससीचा तो टॉपर होता. शेख मुद्दसिरच्या मृत्यूनंतर मारोपुरा कश्मिर पुर्णपणे दु:खात बुडले होते. कोणत्याही धर्माचा नागरीक त्याच्या घरी जाऊन त्याला आपली श्रध्दा सुमने अर्पण केला नसेल असा नव्हताच. भारताचे गृहमंत्री अमित शाह सुध्दा त्यांच्या आई-वडीलांना भेटायला गेले होते. सोबतच जम्मू-काश्मिरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा हे त्यांना दोनवेळा त्यांना भेटले. पुढे त्या वाघाला शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.

यात एक अडचण अशी आहे की, बिनधास्त भाई उर्फ शेख मुद्दसिरच्या मातोश्री शमीम अख्तर या पीओकेच्या राहणाऱ्या आहेत. 40 वर्षापुर्वी त्यांनी शेख मकसुद अहेमद यांच्यासोबत लग्न केले आणि भारतासाठी आपल्या जीव देणारा सुपूत्र शेख मुद्दसिर अहेमदला जन्म दिला. भारत सरकारने शोधलेले पाकिस्तानी श्रीनगर-36, बारामुल्ला-9, कुपवाड-9, बडगाम-4 आणि शेपीया-2 असे आहेत आणि या 60 मध्ये शमीम अख्तरचा सुध्दा क्रमांक आहे. शेख मुद्दसिरचे काका सांगतात माझी वहिनी शमीम अख्तर ही पीओकेची आहे आणि पीओके हा भाग तर भारताचा आहे. भारत सरकारने जम्मू-काश्मिर विधानसभा आणि लोकसभेत पीओकेसाठी एक-एक जागा आरक्षीत ठेवलेली आहे. आज त्या ठिकाणी आम्हाला निवडणुक घेता येत नाही. परंतू कधी तरी पीओके आमचाच करायचा आहे. मग शमीम अख्तर यांना परत पाठवून काय साध्य होणार. शमीम अख्तर यांचा मुलगा शेख मुद्दसिर याने 2022 मध्ये अमरनाथ यात्रेवर होणारा हल्ला थांबवला. त्यावेळी मिळालेला शस्त्रसाठा एवढा भयंकर होतो की, तो पाहुनच अंगावर काटे उभे राहतात. महाराष्ट्राच्या भुमिवर तुकाराम ओंबळे यांनी 26/11 मधील कसाब या अतिरेक्याला पकडतांना ज्या पध्दतीचे काम केले. जवळपास तेच काम शेख मुद्दसिरने केले आहे आणि त्याने केलेल्या हिम्मतीनंतरच त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते.
ज्या शमीम अख्तरला तिच्या मुलाच्या बलिदानासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते भारताचा सन्मान असलेले शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. आज तिला पाकिस्तान परत पाठविल्यानंतर ती काय विचार करेल. ज्या पाकिस्तानी अतिरेक्यांवर तिचा राग आहे की, त्यांच्यामुळेच माझा मुलगा मरण पावला. आज त्याच पाकिस्तान्यांच्या ताब्यात तुम्ही तिला देवून काय साध्य करणार आहात. माझ्या मुलाच्या बलिदानाचा मला अभिमान आहे. असे सांगणारे शेख मकसुद आता काय विचार करतील की, ज्या महिलेने त्या वाघाला जन्म दिला. सरकारने त्याला शौर्य चक्र्र देवून सन्मान केला. त्याच्याच आईला परत पाठविले जात आहे. या घटनाक्रमातून भारताच्या युवकांसमोर काय संदेश जाईल. शेख मुद्दसिर आमचा पण भाऊ होता म्हणून आमची सुध्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, शमीम अख्तरला पर पाठवू नका. शेख मुद्दसिरमुळे ज्या अतिरेक्यांना कंठस्नान घातले गेले त्यांचे नातलग, त्यांचे हॅन्डलर पाकिस्तानमध्येच आहेत. मग आमच्या वाघाच्या आईसोबत ते काय व्यवहार करतील याचा तरी विचार व्हावा आणि त्यांना डिपोर्ट करण्यात येवू नये अशी आमची विनंती आहे.
