बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरण ; अर्धापूर न्यायालयाने पाठविले पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एका कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव लिहुन बनावट जन्म-मृत्यू नोंदणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण एका कंत्राटी कामगार अर्थात सांग काम्या माणसाविरुध्द गुन्हा दाखल करून आरोग्य विभागाने आपल्या अधिकाऱ्यांना वाचविल्याचा हा प्रकार असावा असे या प्रकरणाची तक्रार वाचल्यानंतर कळते. अर्धापूर न्यायालयाने बनवट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र बनविणाऱ्या या कंत्राटी कामगाराला पोलीस कोठडी पाठविले आहे.
दि.29 एप्रिल 2025 रोजी निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय नांदेड डॉ.राजाभाऊ सोनाजी गुट्टे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या पत्राप्रमाणे मी आणि डॉ.संजय माणिकराव पेरके यांनी जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची तपासणी केली होती. ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे जन्म मृत्यू पोर्टलचा गैरवापर होत असल्याबाबत ही चौकशी करण्यात आली होती. चौकशीचा अहवाल तशाचा तशा लिहुन हा गुन्हा दाखल करण्याचा अर्ज देण्यात आला आहे. चौकशी अधिकारी डॉ.गुट्टे आणि डॉ.पेरके यांना crsorgi.gov.in या पोर्टलवर जन्म नोंद करतांना महाराष्ट्र सुधारीत जन्म-मृत्यू नोंदणी नियम 2000 नुसार जन्म नोंद न केल्याची अनियमितता आढळून आली आहे. सर्व जन्म मृत्यू नोंदणीची पोर्टलवर तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत पोर्टल crsorgi.gov.inवर अनाधिकृत व नियमबाह्य सन 2022 पुर्वीची जन्म प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहे. या तक्रारीत लिहिलेले आहे की, डॉ.विद्या झिने ज्या वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय अर्धापूर होत्या त्यांनी जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र रुग्णालय प्रमुख व निबंधक या नात्याने जन्म प्रमाणपत्र निर्गमित करणे आवश्यक होते. डॅ.आनंत पाटील यांची स्वाक्षरी स्कॅन करून अवैध जन्म नोंदणी प्रमाणपत्र निर्गमित झाले. याबाबत पुढील चौकशी होणे उच्चीत वाटते. अधिपरिचारिका सुरेखा अलसटवार या ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे एप्रिल 2022 पासून कार्यरत आहेत. जन्म-मृत्यू नोंदणीचे पोर्टल crsorgi.gov.in वर फक्त नवजात बालक व प्रस्तुतीदरम्यान जन्म झालेल्या बाळांचे 21 दिवसांच्या आत जन्म-मृत्यू नोंदणीचे पोर्टलवर नोंद घेण्यासाठी एहेतेशामोद्दीन यांच्या मोबाईलवर ओटीपीद्वारे पुढील प्रक्रिया पार पडत असल्यामुळे जन्म-मृत्यूची नोंदणी होणे बाबत पुढील चौकशी होणे उचीत वाटते. या प्रकरणातील एहेतेशामोद्दीन बाह्यस्त्रोतांद्वारे नियुक्ती कंत्राटी मनुष्यबळाच्या माध्यमातून ओटीपी जनरेट करून जन्म-मृत्यू नोंदणी 2000 चे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. प्रथमदर्शनी एहेतेशामोद्दीन ओटीपीचा गैरवापर करून बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचे दिसत आहे. या प्रकरणी एहेतेशामोद्दीन व इतर संबंधीतांविरुध्द माझी कायदेशीर फिर्याद आहे.
ही फिर्याद आल्यानंतर अर्धापूर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 464, 465, 466, 467, 471, 472, 473, 34 नुसार गुन्हा क्रमांक 260/2025 दाखल केला. हा बनावट नोंदणीचा प्रकार 22 एप्रिल 2022 ते 30 जुन 2024 दरम्यान घडलेला आहे. या संदर्भाची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. चौकशी समितीचा अहवाल म्हणजेच तक्रार आहे. पण आरोग्य विभागाने एका कंत्राटी अर्थात सांग काम्या माणसाकडे जन्म-मृत्यू पोर्टलचा ओटीपी कसा प्राप्त होतो हेच तक्रारीत लिहिलेले नाही. सोबतच ओटीपी हा आरोग्य विभागाच्या एखाद्या जबाबदार व्यक्तीकडे येण्याऐवजी कंत्राटी कर्मचारी एहेतेशामोद्दीनकडे कसा येतो याचाही उल्लेख केलेला नाही. याचा अर्थ असा होवू शकतो की, आपल्या आरोग्य विभागातील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय? या गुन्ह्यात आपल्या जबाबदारीवरुन आरोग्य विभागाने हात झटकलेले दिसतात. खरे तर पोलीसांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास आणि तपास करून लपलेले किंवा लपविण्यात आलेले सर्व मासे गळाला लावण्याची गरज आहे.
प्राप्त माहितीनुसार या आरोग्य विभागाच्या पोर्टलवर जवळपास 84 जन्म प्रमाणपत्र बोगस बनविण्यात आले आहेत. त्याचा जबाबदार कोण ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या गुन्ह्याचा तपास अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सुरेश भोसले हे करीत आहेत. आज पकडलेल्या एहेतेशामोद्दीनला अर्धापूर न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवून आरोग्य विभागाने फसवले कंत्राटी कर्मचाऱ्याला
