नांदेड (प्रतिनिधी)- देगलूर नाका भागात बरकत कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या कुलर गोडाऊनला दुपारी १ वाजता अचानक आग लागली. त्यात कुलरसह इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने २५ ते ३० लाखांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाने पाण्याने भरलेली तीन वाहने पाठवली होती. तब्बल तीन तासानंतर अग्निशमन दलाला या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
शहरातील देगलूर नाका परिसरात बरकत कॉम्प्लेक्स आहे. त्याच्या नजीक एकबाल अहमद खान यांचे कूल प्रॉडक्ट अँड मार्केटिंग नावाचे कुलर व फ्रिज चे दुकान आहे. या दुकानाच्या दुसऱ्या माळ्यावर कुलर, फ्रिज, एलईडी टीव्ही, मिक्सर, वाशिंग मशीन आदींचे गोडाऊन आहे. दुपारी एक वाजून बारा वाजता या कुलरच्या गोडाऊनला अचानक आग लागली. माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी रवाना झाली. त्यांनी आग विझवण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु आगीने भीषण रूप धारण केले होते.
त्यामुळे अग्निशमन दलाने दुसरीही गाडी घटनास्थळाकडे रवाना केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन्ही गाड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात येत नसल्यामुळे अग्निशमन दलाने १४ हजार लिटर क्षमतेचे वॉटर ब्राउझर घटनास्थळी रवाना केले. इमारतीच्या तिन्हीही बाजूने अग्निशमन दलाने डिलिव्हरी होज साह्याने पाण्याचा मारा केला. तब्बल तीन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश प्राप्त झाले. या आगीमध्ये दुसऱ्या माळ्यावरील कुलर व इतर साहित्याचे अंदाजे २५ ते ३० लाखांचे नुकसान झाल्याचे समजते. आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कुलर सहित इतर साहित्य वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.