गुरूद्वारा हिराघाट साहिबच्या पाठीमागे दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा

नांदेड (प्रतिनिधी)- गुरूद्वारा हिराघाट साहिबच्या पाठीमागे असलेल्या गोदावरी नदीपात्रातून राजरोसपणे या भागातील वाळूमाफिया सेक्शन पंप लाऊन बळजबरीचा वाळू उपसा करत आहे. मागच्या महिन्याच्या गुन्हे परिषदेमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलाला प्रश्न विचारला होता की,बंद झालेली वाळू पुन्हा कशी सुरू झाली. पण याचे काहीच उत्तर दिले नाही.


आज प्राप्त झालेल्या फोटो आणि व्हिडीओप्रमाणे गुरूद्वारा हिराघाट साहिबच्या पाठीमागे असलेल्या गोदावरी नदीपात्रात सेक्शन पंप लाऊन बोटीच्या माध्यमातून दिवसाढवळ्या अवैधपणे वाळू उपसा होत आहे. अशा प्रकारे वाळू उपसा होणे म्हणजे शासनाच्या महसूलला फटका बसतो. मुळात नदीपात्रातून वाळू उपसा करायचा नाही तर रेतीघाटावरून वाळू उपसा करायचा असतो, हा महसूल कायद्याचा नियम आहे. पण कायदेच सगळे मानतील असे या भारतात अवघडच आहे. आणि नांदेडला सुद्धा तेच होत आहे. पोलीस विभाग तर सहजपणे सांगते की, वाळूचा आणि आमचा काही एक संबंध नाही. पण त्या वाळुमूळेच पोलीस दलात एक-दुसऱ्याविरूद्ध सुरू असलेल्या गुप्त कारवाया लपलेल्या थोड्याच आहेत. कोणी कोणाला बोलाविले, कोणी कोणाला कोठे पाठवले, कोण मध्यस्थी आहे या सर्व बाबी जनतेला माहित झालेल्या आहेत. महसूल विभाग तर आमच्या एवढ्या कामामधून आम्ही वाळूकडे लक्ष द्यावे ही अपेक्षा चुकीची आहे, असे सांगते. मग त्यापेक्षा या अवैधपणे उपसा होणाऱ्या वाळूचा कायदेशीर करून टाकावे. कोण्या अधिकाऱ्याला वाटेलच तर त्याने त्या वाळूची गाडी तपासली तर तोच दंड लाऊन तो महसूल उत्पन्नात जमा करावा. पण वाळू वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्या बिनानोंदणी क्रमाकांच्या असतात. त्यांच्याकडे विमा नसतो. त्यांच्याकडे प्रदूषण प्रमाणपत्र नसते, त्यांच्याकडे फिटनेस सर्टिफिकेट नसते. म्हणजे अशा गाड्या वाळू वाहतुकीवरच चालविल्या जातात, याचा अर्थ या व्यवसायाकडे अनेकांचे लक्ष आहे, अनेकांना त्यातून श्रीमंत व्हायचे आहे, त्यात जनताही आली आणि सरकारी अधिकारी-कर्मचारीही आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!