नांदेड :- “AI हे सध्याच्या काळात प्रशासन, आरोग्य, शिक्षण, महसूल, नागरी सेवा आदी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरत आहे. कर्मचाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापराबाबत माहिती करून त्यांचा शासकीय कामकाजात प्रभावीपणे वापर करावा. तंत्रज्ञानाच्या मदतीने शासकीय कामकाजात आधुनिक कार्यक्षमता, अचूकता आणि पारदर्शकता येईल. गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांच्या नियोजनांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून हे प्रशिक्षण घेण्यात आले. नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज नियोजन भवन येथे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा उद्देश कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे त्यासोबतच प्रशासनाच्या कामकाजात AI चा प्रभावी वापर कसा करता येईल हे समजावणे हा आहे.
आज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, सहाय्यक जिल्हा माहिती व सूचना अधिकारी प्रदीप डुमणे, तहसिलदार विपीन पाटील, माहिती तंत्रज्ञ निलावार तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या प्रशिक्षणात सहभागी कर्मचाऱ्यांना AI म्हणजे काय, त्याची कार्यप्रणाली, विविध सरकारी विभागांतील कामकाजात वापर, डेटा विश्लेषण, डिजिटल कागदपत्रांचे व्यवस्थापन, नागरी सेवा सुधारणा अशा विविध बाबीची माहिती व सादरीकरण उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी नाविन्यपूर्ण प्रशिक्षण अंतर्गत आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून एनआयसीचे सहाय्यक जिल्हा माहिती सूचना अधिकारी प्रदीप डुमणे व संतोष निलावार यांनी विशेष मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण सत्रात प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणानंतर कर्मचाऱ्यांनीही याचा सकारात्मक अनुभव व्यक्त केला आणि भविष्यात त्यांच्या विभागातील कामात AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी दर्शवली.
AI तंत्रज्ञानाची मुलभूत माहिती, शासकीय कामकाजातील उपयोग, चार्टजीपीटी सारख्या सहाय्यक प्लॅटफार्मचा वापर, डेटा विश्लेषण आणि निर्णय या प्रक्रीयेतील मदत याबाबींवर सखोल मार्गदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले. तसेच या उपक्रमामुळे जिल्हा प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि गतिमान होईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.