नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील दोन वाहतूक शाखांनी मिळून एकूण 3 लाख 85 हजार 200 रूपयांची दंडात्मक कार्यवाही करून मोटार वाहन अधिनियमांचे उल्लंघन करणे महागात पडते, असा संदेश दिला आहे.
शहरात ट्रिपल सिल गाडी चालविणे, वाहन परवाना न बाळगणे, अनेक वाहन तळांवर धोकादायक परिस्थितीत गाड्या वाहनतळ करणे, एकमार्गी वाहतूक मार्गावरून उलट दिशेने जाणे असे अनेक प्रकार सहजपणे घडत असतात. दि. 2 एप्रिल रोजी वजिराबाद येथील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे त्यांचे सहकारी, दंगा नियंत्रण पथकातील पोलीस अंमलदार यांनी शहरातील रेल्वेस्थानक, महाराणा प्रताप चौक, तरोडेकर मार्केट, कलामंदिर येथे मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कार्यवाही केली. त्यात त्वरीत प्रभावाने दंड वसूल झाला अशा 53 कार्यवाह्या करण्यात आल्या, त्यात 29 हजार 900 रूपये दंड वसूल झाला. तसेच 21 जणांनी आपल्या चुकीसाठी ऑनलाईन/युपीआयद्वारे दंडाची रक्कम भरली ती रक्कम 13 हजार 600 रूपये आहे आणि 146 व्यक्ती असे आहेत ती रक्कम 2 लाख 15 हजार रूपये आहे. ट्रिपल सिट चालविण्याच्या 16 कार्यवाह्या करण्यात आल्या, त्यात 16 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. फटाका आवाज करणाऱ्या 6 बुलेट गाड्यांवर कार्यवाही झाली, त्यांच्याकडून 6 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे एकूण 242 कार्यवाही करून त्यात लाख एकूण 2 लाख 80 हजार 200 रूपये दंड आकारण्यात आला.
2 एप्रिल रोजीच वाहतूक शाखा इतवाराचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ पवार यांनी त्यांच्या शाखेतील पोलीस, इतवारा पोलीस ठाण्यातील पोलीस आणि दंगा नियंत्रण पथकातील पोलीस अंमलदारांसह देगलूर नाका, जुना मोंढा, सिडको येथील ढवळे कॉर्नर येथे कागदपत्र नसणाऱ्या 6 ऑटोंवर कार्यवाही करण्यात आली, त्यात 4 ऑटो जमा करण्यात आले आहेत. ऑटो चालकांना गणवेश परिधान करण्यासाठी सुचना दिल्या आहेत आणि अशा विविध चुकांसाठी 65 कार्यवाही करून इतवारा वाहतूक शाखेने 1 लाख 5 हजार रूपये दंड वसूल केला आहे.