नांदेड–जागतिक जलदिनाचे औचित्य साधून गोदावरी नदीच्या सौंदर्य, संस्कृती आणि पर्यावरणीय महत्त्वाचा शोध घेणाऱ्या ‘ गोदावरी इन फोकस ‘ या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत नांदेडचे हौशी छायाचित्रकार आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अरुण मान्नीकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.या स्पर्धेत त्यांनी सादर केलेले छायाचित्र गोदावरी नदीच्या परिसंस्थेचे सौंदर्य आणि तिच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे यथार्थ दर्शन घडविणारे ठरले. त्यांच्या या छायाचित्रात नदीच्या जलसंपत्तीमुळे मानवी जीवन आणि वन्यजीव यांच्यातील पर्यावरणीय समतोल अधोरेखित झाला आहे. हे छायाचित्र गोदावरी नदीच्या मानव आणि वन्यजीवांच्या उपजीविकेसाठी असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे दर्शन घडविते. तसेच, पर्यावरणीय शाश्वतता आणि समुदायाच्या उपजीविकेच्या संतुलित परिसंस्थेतील दृष्टीकोनातून पर्यावरणीय वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.
जागतिक जल दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेचा उद्देश गोदावरी नदीच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा होता. विजेत्या छायाचित्राने गोदावरीच्या महत्त्वावर प्रकाश टाकत पर्यावरणीय शाश्वततेचा संदेश दिला आहे.
ही स्पर्धा ‘गोदावरी इनिशिएटिव्ह’ तर्फे आयोजित करण्यात आली होती. ७ मार्च २०२५ रोजी स्पर्धेची अंतिम मुदत होती, तर विजेत्यांची घोषणा २२ मार्च २०२५ रोजी करण्यात आली. या स्पर्धेत निसर्ग आणि वन्यजीवन, जलसंधारण, समुदायाचा प्रभाव, गोदावरीच्या काठावरील प्रदेशाचे लँडस्केप, वारसा आणि संस्कृती, नदीतील प्रतिबिंबे, नदीचा प्रवास आणि संध्याकाळी किंवा पहाटेची गोदावरी असे आठ महत्त्वाचे विषय समाविष्ट होते.फोटोग्राफी स्पर्धेसाठी २०० हून अधिक नामांकने आणि ५०० पेक्षा जास्त अविस्मरणीय छायाचित्रे प्राप्त झाली होती.प्रत्येक छायाचित्र जलसंस्कृतीचे पुनर्जीवन, संस्कृती आणि नदीच्या अद्वितीय आत्म्याची गोष्ट सांगते.
डॉ.अरूण मान्नीकर यांनी जलसंधारण आणि पर्यावरणीय संतुलन यासंदर्भात माहिती अधोरेखित करणारे छायाचित्र सादर केले होते. त्यांच्या छायाचित्राने गोदावरी नदीतील जलस्तराच्या संवर्धनाची गरज, जैवविविधतेचे महत्त्व आणि मानवी हस्तक्षेपाचा निसर्गावर होणारा परिणाम प्रभावीपणे दर्शविला. या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ₹१५,००० चे प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.
गोदावरी नदीच्या संवर्धनाच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची ठरली असून, यामधून नद्यांच्या जतनाविषयी जनजागृती करण्याचा उद्देश साध्य झाल्याचे आयोजकांनी सांगितले. डॉ. अरुण मान्नीकर यांच्या या यशाबद्दल नांदेड शहरातील पर्यावरण चळवळीमधील नागरिक आणि छायाचित्रकार मंडळींकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.