नांदेड, (प्रतिनिधी)-बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीच्या आंदोलनाने देशभर जोर धरला आहे. नांदेड येथे २५ मार्च रोजी भव्य मुक्ती आंदोलन महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी लाखोंच्या संख्येने या महामोर्चात सहभागी होणार आहेत. शुभ्र वस्त्र परिधान केलेले मोर्चेकरी शिस्त आणि शांततेने महामोर्चात सामील होऊन मोर्चा यशस्वी करतील, अशी माहिती महामोर्चाचे संयोजक बौद्ध भिक्खू समितीने आज पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला महामोर्चा आयोजक बौद्ध भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महामोर्चाच्या आयोजनाबाबत भूमिका विषद करताना भिक्खू संघातर्फे बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ असल्याचे सांगण्यात आले. महाबोधी महाविहार हे जगाला शांतीचा संदेश आणि समतेचा उपदेश देणाऱ्या तथागत भगवान बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीचे पवित्र ठिकाण आहे.
भारतीयच नव्हे तर जगाच्या पाठीवर असणाऱ्या समस्त बौद्ध अनुयायींसाठी महाबोधी महाविहार हे श्रद्धेचे स्थळ आहे. भारतातच नाही तर इतर सर्वच देशांमध्ये कोणत्याही धर्माचे श्रद्धा स्थळ असो तेथे त्या त्या धर्मीयांचा ताबा असल्याचे आढळून येतो. त्या त्या धर्माच्या अनुसार तेथे पूजाअर्चा, साधना, ध्यानधारणा केली जाते. परंतु महाबोधी महाविहार येथे हिंदू धर्मीयांचा ताबा असल्याने तेथे कर्मकांड केले जात आहेत. त्यामुळे भगवान बुद्धांच्या विचारांना हरताळ फासण्यात येत आहे. या संदर्भातील टेम्पल ॲक्ट १९४९ तात्काळ रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी नांदेड येथील महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
नांदेड येथे २५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता नवा मोठा मैदान येथे बौद्ध अनुयायी महामोर्चासाठी जमा होणार आहेत. महात्मा फुले पुतळा मार्गे शिवाजीनगर, वजीराबाद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. शुभ्र वस्त्र परिधान केलेले अनुयायी शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चात सहभागी होतील. मोर्चाची व्यापकता लक्षात घेता उपासक उपासिकांनी शांततेने मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संयोजकांनी केले आहे.