नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका मुरुम वाहतुकदाराला 15 हजार रुपये खंडणी द्या नाही तर माझ्या घरी पाच मुरूमाचे हायवा टाका अशी धमकी देणाऱ्या पत्रकाराविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
देवराव उर्फ देवानंद शिवाजी कांबळे रा.निमगाव ता.अर्धापूर यांनी 19 मार्च रोजी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडे हायवा गाड्या आहेत आणि मुरूम कंत्राटदार विखार सिद्दीकी यांच्याकडे त्यांच्या गाड्या मुरूमाची वाहतुक करतात. या गाड्या सायलवाडी येथून मुरूम भरतात आणि वसमत फाटा येथे कॅनॉलचे काम चालू आहे. तेथे टाकतात. या गाड्यांवर त्यांचा पुतण्या भिकाजी बहादुरे हा चालक आहे. तर सहाय्यक संदीप दामोदर सोनकांबळे आहे. दि.15 मार्च रोजी डॉ.मोहम्मद आमेर खान पठाण हे संपादक असलेल्या नांदेड चौफेरमध्ये एक बातमी आली. त्यानंतर 18 मार्च 2025 रोजी वाचकमंच या वृत्तपत्रात माझ्याविरुध्द बातमी आली. यापुर्वी माझ्या पुतण्या व चुलत भावास दि.21 जानेवारी 2025 रोजी शेख शकीलने सांगितले हायवा मालक देवराव कांबळे परभणी येथील स्कायलाईन कंपनीमध्ये मुरूम कंत्राटदाराच्या मार्फत मुरूम वाहतुक करतो आणि लाखो रुपये कमावतो. मला 15 हजार रुपये द्या किंवा माझ्या घरी पाच मुरूमाने भरलेले हायवा गाड्या रिकाम्या करा. नाही तर तुमची मुरुममाफीया म्हणून बातमी लावून बदनामी करतो. मी माझ्या पुतण्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. परंतू 15 व 18 मार्च रोजी पैसे आणि मुरूम दिला नाही हा राग मनात धरुन माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने शेख शकीलने बातम्या लावल्या. त्याच्याविरुध्द योग्य कार्यवाही व्हावी.
अर्धापूरचे पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या आदेशानंतर अर्धापूर पोलीस ठाण्यात शेख शकील या पत्रकाविरुध्द गुन्हा क्रमांक 160/2025 भारतीय न्याय संहितेच्या कलम 356(1), 356(3) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार नरवाडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
15 हजारांची खंडणी मागणाऱ्या पत्रकाराविरुध्द गुन्हा दाखल
