प्रज्ञावान विचारवंत : प्रा. मा. म. देशमुख

भारताच्या इतिहासाला पडलेले सोनेरी स्वप्न म्हणजे सत्यशोधक इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख हे होय ! बहुजन समाजातील महात्मा जोतिराव फुले यांचा सत्यशोधक वारसा जोपासत संशोधक प्रवृत्तीचे खरे इतिहासतज्ञ, प्रज्ञावान लेखक, विचारवंत व परखड व्याख्याते म्हणून प्रा. मारोती महादेव देशमुख उर्फ प्रा. मा. म. देशमुख यांनी अल्पावधीतच आपले नाव कमावले.

बहुजन मसिहा मान्यवर साहेब कांशीरामजी यांचा सहवास लाभल्यानंतर प्रा. देशमुख यांना प्रबोधनाचे व्यापक क्षेत्र मिळाले. बहुजन समाजात मिसळणे, त्यांचे प्रबोधन करणे, त्यांचे संघटन करणे व त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणे हे व्यापक कार्य कांशीरामजी करीत होते. त्यांच्या सहवासात आल्यानंतर कांशीराम साहेबांचे कांही गुण मा. म. देशमुख यांच्या अंगात भिनले. कांशीरामजी यांच्या समाज प्रबोधन चळवळीला गतीमान करणारे सुरुवातीच्या काळापासूनचे एक खंदे समर्थक व सहकारी म्हणून प्रा. देशमुख सरांनी मान सन्मान व प्रबोधनकार म्हणून बहुमान मिळविला. त्यांनी बुधवार दि. १९ मार्च २०२५ रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कार्याचा आढावा घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे.

महादेवराव आणि सखुबाई या सामान्य मराठा शेतकरी दांपत्याच्या पोटी देशमुख सरांचा जन्म ११ जुलै १९३६ रोजी इसापूर येथे झाला. घरची हलाखीची परिस्थिती असून सुद्धा मेहनत, चिकाटी, जिद्द, शिक्षणाची जबरदस्त आवड यामुळे अध्ययन काळात आर्थिक प्रतिकूलतेवर त्यांनी मात केली. प्रियुनिव्हर्सिटी परीक्षेत ते मेरिटमध्ये उत्तीर्ण झाले. इतिहास हा त्यांच्या खास आवडीचा प्रांत. साधनसामुग्री, संदर्भ, पुरावे यांच्या आधारे इतिहासाची चिकित्सा, इतिहासाची सत्यता सिद्ध करण्याची वृत्ती आणि दृष्टी त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच जोपासली होती. १९६३ मध्ये इतिहास या विषयात एम. ए. परीक्षेत त्यांनी गौरवास्पद यश मिळवले.

१९५४ ते १९६३ पर्यंत ते नागपूर महानगर पालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर जि. बुलडाणा येथे प्राध्यापक म्हणून एक वर्ष कार्य केले. १९६४ साली ते काँग्रेस नगर, नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेज मध्ये इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले, तिथे ते इतिहास प्रमुख म्हणून राहिले आणि तेथेच १ ऑगस्ट १९९६ ला सेवानिवृत्त झाले.

प्रा. देशमुख यांनी १९६८ मध्ये लिहिलेल्या *मध्ययुगीन भारताचा इतिहास* ह्या ऐतिहासिक पुस्तकावरुन देशभरात वादळ उठले होते. याबाबत प्रतिगामी सवर्णांनी त्यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढून नागपूर विद्यापीठासमोर त्या ग्रंथाची होळी केली होती आणि न्यायालयातून त्या ग्रंथावर बंदी तसेच जप्ती देखील आणली होती; परंतु बहुजन समाजातील विद्यार्थी आणि तरुणांनी २७ जानेवारी १९६९ रोजी प्रा. देशमुख यांची प्रेम यात्रा (गौरव मिरवणूक) काढून प्रस्थापित ब्राह्मणांना वमनूवाद्यांना जशास तसे सडेतोड उत्तर दिले होते.

मान. मा. म. देशमुख हे बसपा संस्थापक मान्यवर कांशीरामजींच्या संपर्कात आले. १४ एप्रिल १९८४ रोजी बसपाची स्थापना झाल्यावर त्यांना गंगाधर फडणवीसांच्या विरोधात नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातून बसपाची उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर १९८९ ला रामटेक लोकसभा मतदार संघातून त्यांनी हत्तीवर स्वारी केली होती. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे त्यांनी चांगले कार्य केले होते.

देशमुख सरांनी भारतीय इतिहासाची नवी मांडणी केली. बहुजन जागृतीसाठी त्यांनी इतिहासाचे नवीन दालन उघडले. लेख लिहून व भाषणे देऊन जनजागरण केले. सुधारकांप्रमाणे सरांना सुद्धा विरोध, शिव्याशाप, ग्रंथाच्या होळ्या, प्रेतयात्रा, ग्रंथबंदी इत्यादी प्रसंगांना तोंड द्यावे लागले; पण मा. म. देशमुख हिमालयाप्रमाणे अढळ राहिले. सरांनी खालील प्रमाणेअनेक पुस्तके/ ग्रंथ निर्मिती केली:–

१) प्राचीन भारताचा इतिहास

२) मध्ययुगीन भारताचा इतिहास

३) दिल्ली सुलतानशाहीचा इतिहास

४) मोगल कालीन भारताचा इतिहास

५) युगप्रवर्तक शिवराय आणि मराठ्यांची शौर्यगाथा

६) अभिनव अभिरुप लोकसभा नाट्य

७) शिवशाही

८) सन्मार्ग

९) राष्ट्रनिर्माते

१०) मनुवाद्यांशी लढा

११) रामदास आणि पेशवाई

१२) मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा

१३) महात्मा फुले यांचे सामाजिक प्रबोधनाचे प्रयत्न

१४) मराठ्यांचे दासीपुत्र

१५) साहित्यिकांची जबाबदारी

१६) शिवराज्य

१७) समाज प्रबोधन

१८) बहुजन समाज आणि परिवर्तन

यापैकी “मध्ययुगीन भारताचा इतिहास” या ग्रंथाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, संशोधन व साहित्यिक क्षेत्रात प्रचंड खळबळ निर्माण केली होती. यात छत्रपती शिवाजी महाराज, रामदास, पेशवे इत्यादींच्या बद्दल प्रा. मा. म. देशमुख यांनी घडविलेल्या सत्य दर्शनाने कमालीचे वादळ निर्माण झाले होते. आचार्य अत्रे यांच्यासोबत त्यांची कोर्टात जुगलबंदी झाली. ग. त्र्यं. माडखोलकर, दिवेकर शास्त्री यांनी वृत्तपत्रातून टीकात्मक लेख लिहिले. नागपूर मधील उच्चभ्रू, सनातनी व ढोंगी पुरोगामी वृत्तीच्या लोकांनी एकत्र येऊन सरांची प्रेतयात्रा काढण्याचे व आंदोलन करण्याचे ठरवले. त्यांच्या ग्रंथांच्या होळ्या करण्यात आल्या. त्यांच्या जीवाचे बरे वाईट होण्याचा क्षण आला होता. १७ जुलै १९६९ रोजी महाराष्ट्र शासनाने या ग्रंथावर ग्रंथ बंदी हुकूम जारी केला, पण सरांनी याविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टात अनुकूल – प्रतिकूल वादविवाद, साक्षी पुरावे चर्चा होऊन हायकोर्टाने ग्रंथावरील बंदी हुकूम रद्द ठरविला आणि ग्रंथ सन्मानपूर्वक बंदी हुकूमातून मुक्त केला.

अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद, बहुजन समता परिषद, नॅशनल भीम आर्मी बहुजन एकता मिशनच्या वतीने त्यांच्या कार्याला, विचारांना, स्मृतींना विनम्र अभिवादन आणि साश्रुनयनांनी आदरांजली अर्पण करतो. शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान त्यांचे जाण्याने झाले आहे. कांशिरामजी यांचे सोबत बहुजन आंदोलन

उभे करण्यात सरांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या परिवर्तनवादी पुस्तकांनी बहुजन समाजात एक प्रकारची चेतना निर्माण केली. सरांची सर्व पुस्तके मी वाचली. त्याचे असंख्य सेट विकत घेतले व बहुजनांना भेट दिले. त्यांची असंख्य व्याख्याने ऐकली. नांदेडमध्ये मी पुढाकार घेऊन सरांचे एक व्याख्यान ओबीसींसाठी आयोजित केले होते, त्यास खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सरांना मी मानधन विचारले तर ते म्हणाले कुठून देशील ? मी म्हणालो जमा करुन देईन. सर मला म्हणाले माहिती आहे. तू एक हाडाचा लढाऊ कार्यकर्ता आहेस. तुझ्याकडून मानधनाची अपेक्षा नाही. पैसे नाही तर फक्त माणसे गोळा करण्याचे काम कर. माझी धाकधूक वाढली. मानधन न घेता सर येतात की नाही ? हातात पुस्तकांचे ओझे घेऊन सर अगदी वेळेपूर्वीच नांदेडच्या बस स्थानकावर उतरले. हे पाहून मला सरांचा खूप अभिमान वाटला. ते शब्दाचे पक्के होते. व्याख्याने देऊन पैसे कमावणे हा त्यांचा उद्देश नव्हता. समाज परिवर्तनासाठी समर्पित असे ते एक भारदस्त व्यक्तीमत्व होते.

मराठा समाजात देखील पुरोगामी विचारांची पेरणी त्यांनी केली. त्यातूनच पुरुषोत्तम खेडेकर निर्माण झाले. मराठा सेवा संघ व शिवधर्माची निर्मिती होऊ शकली. त्यांच्या परखड व्याख्यानांनी मराठा व बहुजन समाजात मनूवाद्यांच्या विरोधात लढण्याची शक्ती निर्माण होऊ शकली. त्यापूर्वी देखील ते ब्राम्हणेतर चळवळीचे कार्यकर्ते होते. त्यांच्या अजरामर कार्याला करोडो तोफांची सलामी, मानाचा मुजरा..! प्रा. मा. म. देशमुख अमर रहे !!

*- इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर*

नांदेड. मो. ८५५४९९५३२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!