नागपूर- येथील ननमुदा या संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलतांना केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी कोई जो करेगा जात की, बात उसको मारुंगा कसकर लात हे सांगतांना मंत्री पद नसेल तर मी काय मरतो काय ? अशा शब्दात ज्या भावना व्यक्त केल्या याचा रोख कोणाकडे आहे. याचा विचार करू तेंव्हा हा रोख दिल्लीकडे आहे. जात पात धर्म यापेक्षा वेगळे जीवन जगलेल्या नितीन गडकरी यांनी मी माझ्या तत्वांशी तडजोड करणार नाही असे सांगितले.सोबत या कार्यक्रता त्यांनी जास्तीत जास्त मुस्लीम युवक-युवतीने आयएएस, आयपीएस व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून भारतात जातीयतेचे विष पसरविणाऱ्यांना चांगलीच चपराक दिली आहे.
महाराष्ट्रात आरएसएसचे भक्त नेते नितीन गडकरी यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी पंतप्रधान बनविण्यासाठी बोलावले होते. पण मी त्यांना नकार दिला. कारण आरएसएस मला दुसऱ्या पक्षात काम करण्याचे आदेश देणार नाही हे मला माहित आहे आणि त्यांच्या आदेशाशिवाय मी तो भाग स्विकारू शकत नव्हतो. म्हणून मी विरोधी पक्षांना नकार दिला होता असे व्यक्तव्य खुद नितिन गडकरी यांनी निवडणुकीनंतर केले होते. वाचकांसाठी आम्ही पार्श्र्वभूमी पण मांडू इच्छीतो. नितीन गडकरी यांना लोकसभा 2024 मध्ये उमेदवारीच दिली जाणार नव्हती आणि मला उमेदवारी द्यावी यासाठी त्यांनी कोणा पुढे गोंडा घातला नाही. अखेर त्यांना उमेदवारी मिळाली अर्थात देण्यात आली. तरी पण त्यांचा पराभव व्हावा म्हणून त्यांच्याच स्वकीयांनी मोठी फिल्डींग लावली. ते पथक नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी रात्र दिवस झटू लागले तेंव्हा मात्र नितीन गडकरी कुटूंबासह रस्त्यावर उतरले आणि मतदारांना विजयी करण्याचे आवाहन केले. मतदारांनी त्यांना पाठींबा दिला आणि सव्वा लाख मताधिक्य घेवून ते विजयी झाले. यापुर्वी त्यांच्याकडे असणारे अनेक मंत्रालय कमी करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदार संघात कोणी मोठा नेता आला नाही. एकच सभा नरेंद्र मोदी यांची झाली. अशा अनेक त्रासांना सहन करत काम करत राहिलेले नितीन गडकरी विरोधी पक्षांचे प्रिय नेते आहेत. छत्तीसगडमध्ये कॉंगे्रस सरकारचे मुख्यमंत्री भुपेश बघेल असतांना त्यांनी त्या ठिकाणी रस्त्यांची जी कामे केली. त्यासाठी भुपेश बघेल ने त्यांचा सन्मान केला तेंव्हा ते म्हणाले माझ्यासाठी बुके आणत जाऊ नका. माझ्यासाठी कामाची कागदे आणत जा. मी भारतीय जनता पार्टीचा मंत्री नाही. तर मी भारताचा मंत्री आहे आणि ज्या ठिकाणी कामाची गरज आहे. त्या ठिकाणी मी सदैव तयार आहे. त्या ठिकाणी कॉंगे्रस पक्षाचे सरकार असेल तरी मला काही देणे-घेणे नाही. अशा आपल्या विशेष तत्वांवर चालणाऱ्या नितीन गडकरी यांना भरपूर आव्हाने असतांना सुध्दा त्यांनी भारताच्या हितासाठी काम केले आहे. लोकसभेत भाषण करतांना नितीन गडकरी यांनी मी रस्ते चांगले बनवले पण रस्त्यावर होणारे अपघात मी रोखू शकलो नाही याचे मला दु:ख वाटते अशी कबुली देणारा आज पर्यंतचा हा एकच मंत्री 2014 नंतर दिसला. अशा प्रकारे आपली चुक कबुल करण्यात सुध्दा ते कधी मागे राहिले नाहीत. आज जम्मू काश्मिरमध्ये 370 कलम रद्द करण्यात आले आहे. तरी पण तेथे 70 दहशतवादी लपलेले आहेत असा सरकारचा अहवाल आहे. पण सरकारने 370 कलम रद्द करून सुध्दा दहशतवाद्यांची वाढ होत आहे याचे उत्तर दिले नाही.
छत्रपती शिवाजी राजांच्या काळात स्वराज्याची स्थापना कोण्या एका जाती-धर्माने केली नाही. त्यांच्याकडे सर्व जाती धर्माची मंडळी होती आणि त्यावरच तो कारभार चालत होता. छत्रपती शिवाजी राजांचे वडील सन्माननिय शहाजी राजे भोसले यांच्याकडून त्यांना मिळालेले बालकडू त्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्षात आणले. निझामाच्या मृत्यूनंतर निझामाच्या पत्नीने शहाजी राजे भोसले यांना सांगितले सरदार आता छोट्या निझामाची देखरेख तुमच्याकडे आहे. तेंव्हा त्या छोट्या निझामाची राजकीय प्रक्रिया पुर्ण करतांना छत्रपती शहाजी राजे भोसले आपल्या मांडीवर निझामाला बसवून ती प्रक्रिया पुर्ण करून घेतली होती. या स्वराज्यातील तत्वांप्रमाणे नितीन गडकरींची दृष्टी सुध्दा जातीभेद, लिंगभेद, धर्मभेद मानत नाही. एकदा असे घडले होते की, काही ब्राम्हण लोकांनी उत्तर प्रदेशमध्ये ब्राम्हण संम्मेलनासाठी त्यांना निमंत्रण देण्यासाठी आले तेंव्हा नितीन गडकरी म्हणाले होते. मी ब्राम्हण नेता आहे काय? माझ्या पेक्षा विद्वान अशा अनुसूचित जातीच्या व्यक्तीला बोलवा तर या ब्राम्हण संम्मेलनाचा मान वाढेल. यावरून नितीन गडकरी यांच्या मनातील तत्वांचा बौध होतो. अमरावतीजवळील मेळघाटामध्ये अत्यंत कुपोषण असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र सरकारकडे आल्या. तेंव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी होते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री नितीन गडकरी होते. मेळघाट हा वनविभाग आहे. त्या ठिकाणी रस्ते नसल्यामुळे कोणी वैद्यकीय अधिकारी तेथे पोहचू शकत नाही, वैद्यकीय मदत तेथे जाऊ शकत नाही. अशा तक्रारी आल्या. तेंव्हा मनोहर जोशी यांनी नितीन गडकरी यांच्याकडे पाहिले तेंव्हा नितीन गडकरी यांनी एका सेकंदात सांगितले की, मी रस्ते तयार करून देईल. यावेळी जोशी म्हणाले वनविभागाचा केंद्रीय कायदा वेगळाअसतो आणि राज्य कायदा वेगळा आहे या दोघातून मार्ग काढणे अवघड आहे. तेंव्हा नितीन गडकरी म्हणाले होते की, मी हे करेलच आणि त्यांनी करून दाखवले. यानंतर त्या ठिकाणी राज्यपालांनी भेट दिली होती. ते रस्ते पाहुन राज्यपालांनी नितीन गडकरी यांची केलेली प्रशंसा अभिलेखावर उपलब्ध आहे. आता त्यावेळी त्यांना काय अडचणी आल्या असतील आणि त्या अडचणी त्यांनी कशा सोडवल्या असतील हे फक्त आणि फक्त नितीन गडकरीच जाणतात. असाच किस्सा मुंबई हायवेचा आहे. धिरुभाई अंबांनींना ही निविदा मिळावी यासाठी सन्माननिय बाळासाहेब ठाकरे आग्रही होते. पण त्यांना सुध्दा नितीन गडकरी यांनी सांगितले की, निविदेपेक्षा कमी किंमतीत आपण हा रस्ता तयार करू. आपलेच पैसे, आपले अभियंते वापरून नितीन गडकरी यांनी मुंबई एक्सप्रेस तयार केला. तेंव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सुध्दा नितीन गडकरी यांची प्रशंसा केली होती. त्यावेळी धिरुभाई अंबांनी म्हणाले होते नितीन गडकरींसारखे दोन-चार मंत्री भारतात तयार झाले तर भारत पुन्हा एकदा सोने की चिडीया बनेल.
नागपूरच्या नितीन गडकरी यांच्या मतदार संघात एकूण मतदार 45 लाख आहेत. त्यात 8 लाख मतदार मुस्लिम समाजाचे आहेत आणि ते सुध्दा त्यांचे मतदार आहेत. आपल्या भाषणात कधीच नितीन गडकरी यांनी हिंदुवाद, मुस्लिमवाद यावर बोलले नाहीत. नितीन गडकरी यांच्या मते कोणताही व्यक्ती जात धर्म पंथ आणि लिंग यामुळे मोठा नसतो. तो आपल्या गुणांनी मोठा होत असतो. नितीन गडकरी सांगतात मी माझ्याच पध्दतीने चालेल मला जे मत देतील ते देतील जे देणार नाहीत त्यांच्याशी मला काही दु:ख नाही. पदवीदान समारंभात बोलत असतांना नितीन गडकरी सांगत होते, जो करेगा जात की बात उसको मारुंगा कसकर लात यावेळी काही मित्रांनी सांगितले यामुळे नुकसान होईल. त्यावर नितीन गडकरी यांचे उत्तर असे आहे की, मी निवडणुक जिंकलो नाही, माझे मंत्री पद गेले तर मी मरणार आहे काय? आणि याचा विचार मी सार्वजनिकच नव्हे तर व्यक्तीगत जीवनात सुध्दा करेलच. माझ्यासमोर असलेल्या विद्यार्थ्यांनी, विद्यार्थींनीनी डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, आयपीएस मोठ्या संख्येत व्हावे अशी माझी इच्छा आहे. यामध्ये नितीन गडकरी यांचा विचार असा आहे की, मुस्लिम विद्यार्थी जास्त शिकले तर ते कट्टरवादी होणार नाहीत.
पण केंद्र सरकारला असे फुड सोल्जर हवे आहेत. कारण नारे कोण देईल. मस्जिदीवर गुलाल कोण फेकेल. नेत्यांचे मुल विदेशात शिकतात. ते कधी अशा दंग्यांमध्ये येत नाहीत. पत्रकार आणि केंद्रीय मंत्री असलेले अरुण साधू यांनी सिंहासन आणि मुंबई दिनांक अशी दोन पुस्तके लिहिली आहेत. त्यातील सिंहासन या पुस्तकावर जब्बार पटेल यांनी ब्लक ऍन्ड व्हाईट चित्रपट बनवला होता. त्या चित्रपटातील परिस्थिती आज देशात असणाऱ्या परिस्थितीशी अत्यंत मिळती जुळती आहे. आज देशात सुरू असलेल्या हिंदुत्ववादामुळे फक्त नितीन गडकरीच त्रासले नाहीत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुध्दा त्रासला आहे. म्हणूनच नितीन गडकरी यांनी मंत्री पद गेले तर मी काय मरणार आहे काय? हा रोख कोणाकडे आहे हे महत्वाचे आहे. त्यांनी ज्या ननमुदा संस्थेत पदवीदान समारंभात भाग घेतला ही संस्था मुस्लिम व्यवस्थेत वाढलेली आहे. वाचकांनी आपल्याला आजच्या परिस्थितीत काय करायला हवे. हे स्वत: सिध्द करायचे आहे.
माझे मंत्री पद गेले तर मी मरतो काय?-नितीन गडकरी; कोणासाठी आहे हे वाक्य?
