एकीकडे धुळवड, रमजान महिन्यातील जुम्मा (शुक्रवार) एकत्रित आल्यानंतर विष पसरविणाऱ्यांनी या मुद्याला चांगलीच हवा दिली होती. परंतू काही ठिकाणी विष पसरविणाऱ्यांना यश आले. परंतू त्यापेक्षा 10 पट जास्त जागांवर मुस्लिम आणि हिंदुंनी अत्यंत सामंजस्याने आणि आनंदाने धुळवळ आणि जुम्मा नमाज पार पाडले. त्या आनंदाला काही पर्याय नाही. या दरम्यान फिरोजाबाद मध्यल्या भारतीय शस्त्र कारखान्यामध्ये एका व्यक्तीला अटक झाली. तो आपल्या शस्त्रागाराची माहिती पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेला एका महिलेच्या माध्यमातून पुरवित होता. वाचकांनो विचार करा. फिरोजाबादच्या शस्त्रागारमध्ये पकडला गेलेला व्यक्ती सलमान खान, शाहरुख खान, अमिर खान, सोहेल खान असला असता तर आज भारतात काय हल्लकोळ माजला असता. त्या पकडल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव रविंद्र असे आहे.
भारतात धुळवड आणि रमजान महिन्यातील जुम्मा एकत्र आज पहिल्यांदा आला नाही. पण यावेळेस त्याचा बाऊ बनविला गेला. तरी पण हिंदु आणि मुस्लिम समाजाने आपसात समन्वय आणि आनंद घेवून हे सण साजरे केले.
उत्तर प्रदेशमधील सिलमपुर भागात हिंदु ंसाठी मुस्लिम समाजाने फुले जमा करून वर्षाव केला. नमाजला जाणाऱ्या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीवर होळी खेळणाऱ्या हिंदु समाजाच्या लोकांनी रंगांच्या ऐवजी रंगीत फुले उधळून होळी साजरी केली. काही ठिकाणी मुस्लिम समाजाचा व्यक्तील आपल्या हातात रंगांची थाळी घेवून इतरांना रंग लावतांना दिसत आहेत. विष प्रसारण करणाऱ्यांनी काही ठिकाणी याचा बाऊ केलाच. गडबडही झाली त्याचा आलेख विचार करायचा असेल तर 8 ठिकाणी गडबड झाली आणि 80 ठिकाणी हिंदु-मुस्लिमांनी सोबत होळी सण साजरा केला. त्यामुळे आम्ही भारतातील प्रत्येक व्यक्तीचे या प्रेम भावनेसाठी अभिनंदन करत आहोत. पोलीस प्रशासनाने सुध्दा जागो जागी घेतलेल्या योग्य हाताळणीच्या क्षणांना सुध्दा तेवढेच महत्व द्यावे लागेल. पोलीसांचे सुध्दा यानिमित्तने कौतुक करत आहोत.
दरम्यान याच गडबडीमध्ये फिरोजाबाद(उत्तरप्रदेश) येथे एटीएस पथकाने रविंद्र नावाचा व्यक्ती ताब्यात घेतला. वाचकांनो विचार करा या माणसाचे नाव सलमान खान, शाहरुख खान, अमिर खान, सोहेल खान असले असते तर..एटीएसच्या सांगण्याप्रमाणे रविंद्र हा नेहा शर्मा नावाच्या एका महिलेशी सामाजिक संकेतस्थळावर संपर्कात आला. मग काही दिवसांची भेट, चर्चा, पुढे काय-काय देव जाणे. हे सर्व घडले. त्यानंतर नेहा शर्माने रविंद्रला ऑफर केली. मी पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेसाठी काम करते. तु ज्या शस्त्रागारात काम करतोस तेथील माहिती दिली तर तुला भरपूर पैसे मिळतील. त्यानंतर रविंद्र नेहा शर्मा मार्फत फिरोजाबाद शस्त्रागारात कोणते शस्त्र तयार होतात. याची संपूर्ण माहिती दिली. नेहा शर्मा हे नाव सुध्दा खरे नसेल पण तो हनी ट्रॅपमध्ये फसलाच पण पैसे पण मिळवले. म्हणजे देशासोबत गद्दारीच केली. हा विषय आजचा एक नाही.
19 फेबु्रवारी 2025 रोजी एनआयएने कोची नवदल मुख्यालयात तिन जणांना पकडले. ते पीआयओकडून पैसे घेत होते आणि आपल्या बंधरात येणाऱ्या जहाजांची इत्यंभूत माहिती पुरवत होते. 2017 मध्ये भोपाळचा धु्रव सक्सेना, मध्यप्रदेशातील बलराम यांना पकडले होते. यांच्यासोबत 13 जणांना अटक झाली होती. यातील धु्रव सक्सेना हा भारतीय जनता पार्टीचा सदस्य होता. धुव्र सक्सेना बीजेपीच्या आयटी विभागात कार्यरत होता आणि हे सर्व 13 जण आयएसआयला माहिती पुरवित होते. वंश परंपरागत पध्दतीने आरएसएसचे सदस्य असलेले आणि डीआरडीओमध्ये लॅब डायरेक्टर पदावर कार्यरत प्रदीप पुरोळकर हे वैज्ञानिक सुध्दा एका हॅनी ट्रॅपमध्ये फसले होते. त्यांना अटकही झाली होती. 20 मार्च 2024 रोजी गोवा नौसैनिक मुख्यालयात रामसिंग या कंत्राटी कामगाराला अटक झाली. त्याच्यासोबत लक्की जाट, मॅकी सिध्दू, अतुल दुबे, रवि शर्मा, सविता, दक्षीण नरेश, उपेंद्र गडकरी आणि रंजनकुमार पांडे यांना अटक झाली होती. हे सर्व फक्त 500 रुपयांमध्ये आपल्या नौसैनिक मुख्यालयाची माहिती पाकिस्तानला देत होते. आपल्या देशासोबत देशद्रोह करणाऱ्या या महान व्यक्तीमत्वांना कोणी पाकिस्तानी म्हणत नाही असे का घडत असेल हा विचारणीय प्रश्न आहे. कारण आजची गोदी मिडीया गुन्हेगाराचे नाव पाहुन त्याचे वृत्तांकन करतात. रविंद्रला पकडल्यानंतर त्याचे नाव न सांगता गोदी मिडीयाने फक्त त्याला पकडले अशा बातम्या प्रसिध्द केल्या. ही पत्रकारीतेच्या क्षेत्रातील अत्यंत दुर्देवी घटना आहे. 30 नोव्हेंबर 2024 रोजी गुजरात येथील तटरक्षक दल यांच्याकडे येणाऱ्या वाहनांची आवक-जावक माहिती आयएसआयला दिली म्हणून दिपेश गोहिल, भरूच येथील प्रविण मिश्रा यांना अटक झाली होती. पण या संदर्भाची सुध्दा बातमी हिंदु-मुस्लिम या विषयावर ज्या प्रमाणे प्रसिध्द होते. त्याप्रमाणे झाली नाही.
भारतात राहणारा हिंदु, मुस्लिम, सिख, क्रिश्चन आणि यांच्यासोबत सर्वच धर्मिय भारताचे देशभक्तच आहेत. काही पत्रकार सुध्दा देशभक्त आहेत. परंतू सर्वच जागी सडलेले व्यक्तीमत्व असतात. त्यातील काहींची उदाहरणे आम्ही वाचकांसाठी प्रसिध्द केली आहेत. जी आम्हाला कळली. ही सर्व माहिती गुगलवर उपलब्ध आहे. पण जी माहिती आम्हाला कळली नाही. त्यासंदर्भाचे काय? भारतात मुस्लिम व्यक्तीला पाकिस्तानी म्हणून हिणवण्यापेक्षा त्याच्या देशप्रेमाकडे सुध्दा पाहिले गेले पाहिजे. आमच्या मते भारताच्या सुरक्षा विभागात काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अत्यंत बारकाईने नजर ठेवण्यात यावी, त्यांचे सोशल मिडीया अकाऊंट तपासले गेले पाहिजे. तो कोणत्या जाती-धर्माचा आहे यापेक्षा भारताची सुरक्षा महत्वाची आहे यालाच महत्व दिले गेले पाहिजे. आपण आपल्या घराचे दार आणि कुलूपे मजबुत ठेवली पाहिजेत. तरच कोणी शत्रु आमच्याकडे पाहण्याची हिम्मत सुध्दा करणार नाही. पण आम्ही देशातच हिंदु-मुस्लिम या वादावरच फिरत राहिलो तर शत्रु त्याचा फायदा नक्कीच उचलतील हा विचार आम्हाला वाचकांसमोर मांडायचा आहे.