घालमोडे दादाचे संमेलन असा ज्योतिबांनी वापरलेला शब्द उच्चारून डॉक्टर भवाळकर यांनी मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात धडाकेबाज केली. काळा सावळा विठ्ठल याचे प्रतीक सांगत त्यांनी हे संमेलन बहुजनांचे आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला. राजकारण्यांनी साहित्यिकांची जागा घेऊ नये असे जाहीर करून त्यांना गावकुसाबाहेर रोखण्याचा इरादा सांगितला. आणि सत्ताधीश पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत पसायदानाचा उल्लेख करत सध्याच्या प्रतिगामी राजकारणाबद्दल त्यांच्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला. एका साहित्यिक महिलेने राजकारणी व सत्ताधारी यांची शिकार केली असे चित्र सर्वत्र रंगविले गेले. यातील खरे काय? त्यांनी कुणाला वाचविण्यासाठी व मोठा करण्यासाठी तीर मारला?
मराठी साहित्य मी बऱ्यापैकी वाचलेले आहे. सात आठ पुस्तके लिहिली असल्याने
अकोला येथे झालेल्या शासकीय कर्मचारी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची मला संधी मिळाली होती. तिथे मी मांडलेले मत अनेक वर्तमानपत्रांना पाठविले होते पण त्यात छापण्यासारखं काही नसावे किंवा आपले प्रकाशन बंद पडेल असे वाटल्याने आत्तापर्यंत संपादकांच्या केराच्या टोपलीत ते कुजले असावे.
साहित्याचे प्रयोजन/ हेतू काय? समाजाला गरज काय? याबद्दल समीक्षकांनी खूप लिहिलेले आहे. त्यातील मला सगळ्यात भावणारे उत्तर म्हणजे साहित्याची उपयुक्तता (utility). उपयुक्तता वाद (utilitarianism)!
डॉक्टर भवाळकर यांनी मानवी गरजा सांगताना इतर बाबीसह मैथुन ही गरज सांगितली पण ती गरज need नव्हे तर प्रेरणा Instinct समजली जाते. अब्राहम मासलो या विचारवंताने मांडलेल्या पाच गरजा ज्या थोड्याफार फरकाने जगभर मान्य केल्या त्या आम्हा मराठी भाषिकांना लागू पडतात.
त्यातील अन्न वस्त्र निवारा ही भौतिक मानवी पहिली गरज. ती पूर्ण झाली की त्याला सर्व प्रकारची सुरक्षितता हवी असते . सुरक्षितता मिळाली की एकमेकांशी जोडले जाणे, एकत्रित राहणे ही तिसरी गरज होय. या सगळ्या प्राणी गरजा आहेत.मानवी गरजा आणखी पुढे आहेत. आत्मसन्मान ही चौथी आणि जगण्याचा अर्थ शोधणे ही पाचवी गरज आहे.
मराठी साहित्यातील ज्ञानपीठ अवार्ड मिळविलेल्या साहित्यिकांनी मराठी माणसाच्या कोणत्या गरजा भागवण्याचे काम केले? वि स खांडेकर यांना आमच्या मायबोलीतील पहिले ज्ञानपीठ अवॉर्ड 1974 साली ययाती या कादंबरीबद्दल मिळाले.
त्याकाळी आम्हा मराठी भाषिकांची गरज काय होती? उपासमार थांबविणे . माझ्यासह सगळे मराठी भाषिक 72 च्या दुष्काळात कामावर होतो. मिलो, सत्तू खाऊन जगत होतो. अनेक माणसे उपासमारीने मेलेली आम्ही पाहिली. या विद्वान माणसाच्या ययाती कादंबरीने आमची कोणती गरज भागवली? ही कादंबरी फक्त विवाहबाह्य संबंधावर भाष्य करते!
दुसरे ज्ञानपीठ अवार्ड विजेते वी वा शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज. विशाखा हे कवितेचे पुस्तक लिहिण्याबद्दल त्यांचा सन्मान झाला. त्या काळात राम मंदिरासाठी आडवाणींची रथयात्रा फिरत होती. देशातील धार्मिक वातावरण गढूळ होत होते. शेतमालाला भाव नव्हता, बेरोजगारी,…, असे प्रश्न होते. कुसुमाग्रजांनी आम्हा मराठी भाषिकांना कवितेतून काय दिले? त्यांनी सांगितले की साहित्याचा हेतू हा लेखकाचा अहंकार ,अनुभव व आविष्कार व्यक्त करण्यासाठी असतो. खरंतर मराठी भूमीतील संताची भूमिका अहंकारावर विजय मिळवण्याची होती. स्वतःचा अहंकार कुरवाळणाऱ्या या साहित्यिकाने आम्हा बहुजनांचे मार्गदर्शक ज्योतिबा फुले यांच्यावर टीका करत त्यांना काजव्याची उपमा दिलेली आहे. तर राष्ट्रपिता गांधीजी यांच्यावर टीका करत त्याच्या पुतळ्या जवळ चपलांचे दुकान असायला पाहिजे यासाठी आपली प्रतिभा वापरली. असे असूनही त्यांचा जन्म दिवस मराठी दिवस म्हणून आम्ही पाळतो. हा ऐतिहासिक निर्णय मनोहर जोशी यांच्या काळात झालेला दिसतो. थोड्याफार फरकाने हीच अवस्था इतर संमेलनांची व अध्यक्षांची दिसते.
70 टक्के शेतीवर पोट भरणाऱ्या 20% असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी भाषिकांना यांच्या लिखाणाने काय दिले? आमची संस्कृती, परंपरा श्रेष्ठ आहेत असा आभास केला. या साहित्यिकांनी आम्हा मराठी भाषकांच्या मूळ प्रश्न , समस्यावरून आमचे लक्ष दुसरीकडे वळविले! हेच त्यांचे मोठे योगदान!
अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण या सह असंख्य दलीत आत्म चरित्रातून आम्हाला शोषितांची दाहकता समजली. या ब्राह्मणी व्यवस्थेचे भान यायला शरद पाटील यांच्या साहित्याची मदत झाली. आपल्या धडावर आपलेच डोके ठेवा असे सांगणाऱ्या आ ह साळुंखे यांच्या लिखाणातून दिशा मिळाली. यांना कुठेच असे अवार्ड अगर शासकीय मान्यता मिळाल्याचे ऐकिवात नाही.
देशभर फिरत डॉ भवाळकर यांनी भाषेतील जात्यावरील ओव्या व इतर लोकगीते जमा केली. मौखिक भाषेचे डॉक्युमेंटेशन झाले ती त्यांची मराठी साहित्यासाठी मोठी देणगी आहे. पण त्यातून मराठी भाषा बोलणाऱ्या महिलांची काय प्रगती झाली? त्यांना असं कोणतं मोठं सामाजिक, धार्मिक ,राजकीय शहाणपण आलं? वास्तव काय?
माझ्या लहानपणी पिठाच्या गिरणी नव्हत्या. लहानपणी आईला व मोठ्या बहिणीला अगदी शेवटच्या टप्प्यात जात्यावर दळायला मी ही बसलेलो आहे. पुढे मुली शिकल्या पण त्या पुन्हा स्वामी व समर्थाच्या बैठकीत अडकल्या. दीड हजार घेवून लाडक्या बहीनी बनल्या. सगळ्याच वस्तूचे भाव वाढल्यावर त्यांना दोडका भावु कळाला. तारा आक्कांच्या बहिणी व आम्हा बहुजनांच्या बहिणी यांच्या विचारसरणीत महत्वकांक्षा यात जमीन आसमानाचे अंतर आहे.
यातून भवाळकर आक्कानी आमची ‘प्राचीन परंपरा ‘ कशी श्रेष्ठ होती हे सिद्ध केले. अगदी माझ्या आईच्या कपाळावरील कुंकवाच्या ठसठसित मळवटा सारखे !
या श्रेष्ठ परंपरेची नक्की गरज कुणाला हे आम्हा बहुजनांना अद्याप समजले नाही. हेच ते मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वितेचे गुपित.
संमेलन कार्यक्रमात स्टेजवर तीन प्रमुख सत्ताधारी व्यक्ती होत्या. पहिले होते देशाचे पंत प्रधान.घांसी तेली जातीचे.ते जाहीरपणे स्वतःला शूद्र म्हणवून घेतात. देशातील राजकारण, माणूसपण बिघडत चालले असे आशयाचे उद्गार काढत तारा आक्काने मोदींच्या कडे बोट दाखविले.
त्यातील दूसरे शाहू,फुले, .. यांचे नाव घेत क्षत्रिय म्हणून सत्ताकारण करत आहेत.त्यांचा उल्लेख जाणता राजा असा करण्यात आला. एका आधुनिक पेशव्याच्या उपस्थितीत केलेल्या या विधानात आदर किती व तिरकसपणा किती हे समजायला मार्ग नाही.
तिसरा व्हीआयपी हा स्वतःला जाहीरपणे आर्य ब्राह्मण म्हणवीतो . विधानसभेत सनातन धर्म की जय असा नारा देतो. अर्धी फुल चड्डी घालून दसरा मेळाव्यात हजर राहतो. ‘राज सत्तेवर धर्म सत्तेचा अंकुश असला पाहिजे’ असे म्हणत राजकारण करणारा असा हा उच्च वर्णीय आर्य ब्राह्मण आहे. भवाळकर आक्का त्यांच्याबद्दल काहीच बोलल्या नाहीत.
राजकारण समाजकारण धर्मकारण याची ही आजची परिस्थिती ही दहा वर्षापासून सुरू झाली हे खरे नव्हे. गेली 2000 वर्ष सुरू आहे व तारा आक्काच्या व देवेंद्रजींच्या पूर्वजांनी शंभर वर्षांपूर्वी आरएसएस या संस्थेच्या नावाखाली सुरू केलेली आहे. तारा आक्का चित्राव शास्त्रींच्या घरात राहिल्या.पुढे लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्याबरोबर विश्वकोशात संशोधन करीत होत्या. मी देखील काही काळ विश्वकोश मंडळाच्या कार्यालयात शासकीय सदस्य म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे त्या कामाची खोली आणि व्याप्ती मोठी आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. असे असताना तारा आक्का यांनी दहा वर्षे सत्ता भोगणाऱ्या मोदींकडे बोट दाखवले. पण आईच्या उदरात असल्यापासून हेच कार्य शिकलेल्या, बहुरूपी बनून कोलांट उड्या मारलेल्या देवेंद्रजी व त्यांच्या सहकार्यांकडे बोट दाखविले नाही. हा आक्कांचा भाबडेपणा नव्हे तर धूर्तपणा आहे. कसा ते त्यांनी दिलेल्या उदाहरणावरून स्पष्ट होते.
भवाळकर आक्कानी वेदातील एक कथा सांगितली. आपली ‘सवत’ मरावी असे वाटणारी एक महिला एका ऋषिकडे जाते. तो ऋषी तिला आपली सवत मरावी याचे मंत्र सांगतो ते मंत्र वेदात दिलेत. इकडे आम्हाला सांगितले जाते की वेद हे अपौरुषेय आहेत म्हणजे माणसाने नव्हे तर ते देवाने निर्माण केलेत.
आपली सवत मारावी याबद्दलची एक कादंबरी बंगाली भाषेत आहे. तर महाराष्ट्रातही बायका जात्यावरील गाणी म्हणताना आपली सवत मरावी तिचे वाटोळे व्हावे अशी इच्छा मनात धरून त्यावर काव्य करतात. जात्यावर दळत बसलेली स्त्री, पूर्वीची बंगाली साहित्य लिहिणारी स्त्री व आपले वेद हे समान तत्त्व सांगतात. आपल्यात एकसारखा similar धागा आहे. आपण समान equal नाही. पण एकसारखे आहोत.यालाच तारा अक्काचे नागपूरच्या रेशीम बागेतील सख्खे भाऊ ‘ समरसता ‘ असे म्हणतात. रेशीम बागे नुसार स्टेजवर बसलेले देवेन्द्रजी ब्राह्मण हे सत्वगुणी भूतलावरील देव, पवार साहेब क्षत्रिय हे रजो गुनी राक्षस, मोदिसाहेब शूद्र हे तमोगुणी पिशाच्च दर्जाचे असल्याने समान नाहीत. एवढेच कशाला ब्राह्मण घरात जन्मलेल्या अत्यंत विद्वान ब्राह्मणांच्या सहवासात वाढलेल्या, आमच्या तारा आक्का सुद्धा शूद्र आहेत. शूद्र नारी गवार यांचे…करावे असे ग्रंथात नमूद आहे. यावर तारा आक्का काहीच बोलल्या नाहीत.
पण जात्यावर दळणारी शूद्र स्त्री ,बंगाली मध्ये कादंबरी लिहिणारी क्षत्रिय स्त्री व वेदांमध्ये मंत्र सांगणारा ब्राह्मण ऋषी हे एकसारखं सांगतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र म्हणून आपण आपापल्या पायरीने, दर्जाने पण एकजुटीने राहू. जगू .एकमेकांशी समरस होवू. पण समान नाही. यालाच ते ‘समरसता’ म्हणतात.
मराठी माणूस पुन्हा दिल्ली काबीज करेल असे देवेन्द्रजी यानी जाहीर केल्याचे ऐकले.राम मंदिराचा शिलाण्यास करताना मोहन भागवत यांनी ब्राह्मण हे या देशाचे सर्व बाबतीत नेतृत्व करतील असे जाहीर केले होते.राज सत्तेवर ब्राह्मणी धर्म सत्तेचा अंकुश राहावा यासाठी काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मणांच्या नेत्याला मदत करण्यासाठी भाबडेपणाचा भाव आणणाऱ्या परंतु धूर्त डॉक्टर भवाळकर सरसावलेल्या आहेत.
मराठी साहित्य संमेलने मराठी माणसांच्या खऱ्या गरजा भागविण्या ऐवजी ब्राह्मणी धर्मसत्ता आणखी बळकट करण्यासाठी वापरली जात आहेत. हे आज माझ्या सारख्या मोजक्या लोकांना दिसते. उद्या ते अनेकांना दिसेल. अनेक बहुजन लेखक आधुनिक ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स/ कृत्रिम बुद्धिमत्ता’ ची मदत घेऊन प्रभावी व परिणामकारक ग्रंथ निर्मिती करतील . वि स खांडेकर, कुसुमाग्रज यासारख्यांची बुरसटलेली व कालबाह्य परंपरा जपणारे ग्रंथ मलूल, निस्तेज करून टाकतील. गुगलचा जन्म झाल्याने स्वतःला भूतलावरील सत्वगुनी ब्राह्मण म्हणवून घेणाऱ्या स्वार्थी लोकांचे बोट धरण्याची गरज नाही. इथल्या मातीतील महामानव,संत, समाज सुधारक यांना समोर ठेवतील . त्यांनी सांगितलेले विचार व दिशा समजून घेतील . म्हणजेच त्यांच्या खांद्यावर बसून आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स/AI/ कृत्रिम बुद्धिमत्ता यांची मदत घेऊन ते चर्चा brain storming करतील. सर्वांच्या सहभागाने एक आधुनिक मॉडेल निर्माण करतील. प्रत्येकाचा विकास करीत हा देश खरी महासत्ता बनविण्याच्या कामाला लागतील.
यावर आमचा विश्वास आहे!
सुरेश खोपडे
आयपीएस निवृत्त