नांदेड(प्रतिनिधी)-लव्ह जिहाद व फसवणूक करून किंवा बलपुर्वक केलेले धर्मांतर रोखण्याच्या अनुशंगाने राज्य शासनाच्या गृहविभागाने एका समितीची स्थापना केली आहे. त्यात पोलीस महासंचालक या समितीचे अध्यक्ष असतील.
राज्य शासनाच्या गृहविभागातील उपसचिव हेमंत महाजन यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अनेक आजी व माजी लोकप्रतिनिधींनी, राज्यातील विविध संघटना व काही नागरीकांनी लव्ह जिहाद व फसवणूक करून किंवा बलपुर्वक केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्याची निवेदने दिले होते. भारतातील इतर काही राज्यांनी लव्ह जिहाद व फसवणूक करून बलपुर्वक केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदे तयार केले आहेत. महाराष्ट्रातील विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहाद व फसवणूक करून बलपुर्वक केले धर्मांतरण रोखण्यासाठी आलेल्या तक्रारींबाबत उपाय योजना सुचवणे, इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करणे, कायद्याचा मसुदा तयार करणे आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी एका विशेष समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीचे अध्यक्ष पोलीस महासंचालक महाराष्ट्र असतील. सहसचिव/ उपसचिव (विशा-1ब) गृहविभाग हे सदस्य सचिव असतील. सचिव महिला व बाल विकास, सचिव अल्पसंख्यांक विकास विभाग, सचिव विधी व न्याय विभाग, सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग आणि सहसचिव/ उपसचिव(विधी) गृह विभाग असे सहा सदस्य असतील.
लव्ह जिहाद संदर्भाने कायद्याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना
