नांदेड(प्रतिनिधी)-अनेक दिवसानंतर आज पुन्हा एकदा बंदुकीच्या आवाजाने नांदेड शहर हादरले आहे. गुरुद्वारा गेट नंबर 6 जवळच्या वाहनतळाजवळ हा गोळीबाराचा प्रकार घडला. हल्लेखोराने एकूण 10 गोळ्या झाडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्या ठिकाणी तीन रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. हा हल्ला पॅरोलवर आलेल्या एका कैदीवर झालेला आहे. त्याच्यासोबत त्याचा मित्रही होता. तो सुध्दा जखमी आहे. हल्लेखोर हल्ला करून दुचाकीवर फरार झाला आहे. पोलीस विभाग हल्लेखोरला शोधण्यासाठी विविध ठिकाणी रवाना झाले आहेत.
आज सकाळी 9 ते 9.15 वाजेदरम्यान गुरुद्वारा गेट क्रमांक 6 जवळ असलेल्या वाहनतळासमोर गोळीबार झाला. एका चार चाकी वाहनात गुरमितसिंघ जगिंदरसिंघ सेवादार आणि त्याचा मित्र रविंद्रसिंघ दयासिंघ राठोड हे दोघे जात असतांना त्यांच्यावर हा गोळीबार झाला. गुरमितसिंघ सेवादारला सन 2015-2016 मध्ये घडलेल्या एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. तो मागील 15 दिवसांपुर्वी नांदेडला आला होता. जन्मठेप भोगणाऱ्या कैदांना कायद्याप्रमाणे काही दिवसांची संचित रजा(पॅरोल) मिळत असते. त्यानुसार ती सुट्टी 30 दिवसांची असते आणि सुट्टी संपल्यावर कैदांनी परत स्वत: तुरूंगात जायचे असते. गुरमितसिंघ सेवादारला रिंदाचा भाऊ सत्येंद्रसिंघ उर्फ सत्या याची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सत्येंद्रसिंघ उर्फ सत्या हा आज बब्बर खालसा या अतिरेकी संघटनेचा सदस्य असलेला हरविंदरसिंघ उर्फ रिंदाचा भाऊ होता. त्या खून खटल्यात पोलीसांनीजवळपास 6 ते 8 जणांविरुध्द दोषारोपपत्र सादर केले होते. मात्र शिक्षा फक्त गुरमितसिंघ सेवादारला झाली होती.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुरमितसिंघ आणि रविंद्रसिंघ राठोड हे सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयातील सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे गुरमितसिंघला 8 गोळ्या लागल्या आहेत आणि रविंद्रसिंघ राठोडला 2 गोळ्या लागल्या आहेत. वाहनतळात उभ्या असलेल्या एका भाविकांच्या गाडीतून सुध्दा एक गोळी आरपार झाली आहे. पोलीसांना तेथे तिन रिकाम्या पुंगळ्या सुध्दा सापडल्या आहेत. हल्लेखोर एका दुचाकीवर पळून गेला. त्या दुचाकीचा क्रमांक नांदेडचा असल्याचे काही जण सांगत होते. यावरुन स्थानिक लोकांच्या मदतीने गुरमितसिंघवर हल्ला झाला असेल असे म्हणतात येईल. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्यासह गुरुद्वारा सुरक्षा पथकाचे अत्यंत जबरदस्त पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर चव्हाण आणि अनेक पोलीस अंमलदार त्या ठिकाणी हजर होते. वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करून सर्व शक्यतांवर आम्ही या घटनेचा तपास करत आहोत असे अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी सांगितले. हल्लेखोराला शोधण्यासाठी पोलीसांची अनेक पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.
उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
वास्तव न्युज लाईव्हने गोळीबाराची बातमी प्रसिध्द केल्यानंतर काही वेळातच दवाखान्यातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील जखमी रविंद्रसिंघ दयासिंघ राठोड याचा मृत्यू झाला आहे. खात्रीलायक सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे गोळीबार हा चार चाकी गाडीच्या मागच्या काचेतून झाला आहे. गुरमितला लागलेल्याच काही गोळ्या त्याच्या शरिराच्या आरपार होवून समोर बसलेल्या जखमी रविंद्रसिंघ राठोडला लागल्या आहेत.गोळीबाराने हादरलेल्या नांदेडमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
मारेकर्याचा फोटो आणि व्हिडिओ