जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना शिक्षणाचा कायदा या पध्दतीने तरी त्याचा प्रवेश मिळवून द्यावा
नांदेड(प्रतिनिधी)-भारतात सर्वांना शिक्षणाचा अधिकार कायदा अंमलात असतांना सध्या एक 7 ते 8 वर्षाचा बालक शिक्षणापासून वंचित आहे. याचे कारण शोधले असता या बालकाचा जन्म बलात्कारातून झालेला आहे. पण भारताच्या कायद्यात नक्कीच अशी काही तरी व्यवस्था असेलच की, त्या बालकाचे वय शिक्षणाचे झाले असतांना त्याला शिक्षण मिळाले पाहिजे. जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ब्रम्हदेवाचे स्वरुप म्हणतात. अर्थात सर्वांच्या जगण्याचा अधिकार कायम राहावा याची देखरेख करणे त्यांचे काम आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी सुध्दा या बलात्कारातील घटनेनंतर जन्मलेल्या बालकाच्या शिक्षणाची सोय करतील अशी अपेक्षा आहे.
पोलीस ठाणे सिंदखेडच्या हद्दीत राहणाऱ्या एका 22 वर्षीय युवतीने 27 एप्रिल 2017 रोजी सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, दि.26 एप्र्रिल 2016 रोजी तिचे लग्न झाले होते. त्याअगोदर अनेक वर्षांपासून तिचे संजय वसराम राठोड या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. प्रेम संबंधादरम्यान अनेकवेळेस शारिरीक संबंध पण झाले. लग्न झाल्यावर संजय वसराम राठोडने माझ्या सासरवाडी येवून मला बळजबरीने तेथून आणले आणि आपल्या घरात ठेवले. नंतर त्याने आपल्या कुटूंबियांच्या सांगण्यावरुन स्वत:चे लग्न केले. तरी पण माझ्यासोबत शारिरीक संबंध कायम होते. 20 एप्रिल 2017 रोजी माझ्या पाठपुराव्यानंतर माझ्याशी लग्न केले. पण नंतर त्याने मला पत्नी म्हणून वावर करण्यास नकार दिला. 25 एप्रिल 2016 रोजी हे प्रकरण तंटामुक्ती समितीकडे गेले. तेथे तंटामुक्ती समितीसमोर सुध्दा त्याने मला पत्नी म्हणून आपल्यासोबत नकार दिल्यानंतर तक्रार दिली. ही तक्रार सिंदखेड पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 323, 506, 34 नुसार गुन्हा क्रमांक 49/2017 प्रमाणे दाखल केली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक चव्हाण यांच्याकडे देण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्या 22 वर्षीय युवतीची वैद्यकीय तपासणी झाली आणि त्यात युपीटी टेस्ट सकारात्मक आली. अर्थात त्यावेळेस ती युवती गर्भवती होती. पण पोलीसांनी त्या गर्भाची तपासणी केली नाही किंबहुना त्याची टीएनए टेस्ट करून घेतली नाही आणि पोलीसांनी 25 नोव्हेंबर 2017 रोजी संजय वसराम राठोड विरुध्द या प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल केले. आज हा खटला सत्र खटला क्रमांक 105/2017 प्रमाणे नांदेड न्यायालयात सुरू आहे. सध्या संजय वसराम राठोड तुरूंगात आहे.
पोलीसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर युवतीने एका पुत्राला जन्म दिला. जन्म देतांना कोणीच त्या बाबत विचारणा केली नाही. परंतू त्या बालकाचे जन्म प्रमाणपत्र देतांना बापाचे नाव विचारण्यात आले. पण हा बालक बलात्कारातून जन्म असल्यामुळे तुरूंगात असणाऱ्या त्या बलात्काऱ्याचे कागदपत्र उपलब्ध झाले नाही म्हणून तो बालक आज बिना जन्मप्रमाणपत्राचा सात ते आठ वर्षाचा झाला आहे. भारतात सर्वांना शिक्षणाचा कायदा अस्तित्वात आहे. प्राप्त माहितीनुसार तो कोणत्या तरी शाळेत जातो. त्याला शिक्षक शिकवतात पण तरी ही कायदेशीर रित्या त्याचा शाळेत प्रवेश झालेला नाही. कारण त्या बालकाकडे जन्मप्रमाणपत्र, आधारकार्ड नाही. आता या परिस्थितीत भारतातील शिक्षणाच्या कायद्यानुसार त्याची काही तरी सोय व्हायला हवी. काही दिवसांपुर्वीच राज्य शासनाने बालकांच्या प्रत्येक कागदपत्रावर आईचे नाव आवश्यक केले आहे. त्याचे आईचे नाव लावून तरी त्याला शाळेत प्रवेश मिळायला हवा. पण असे काही घडलेले नाही. अशा दुरधर परिस्थितीत आज 34 वर्षाची त्याची आई आपल्या बालकाला अनाथाचे जीवन जगवत आहे.
प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना ब्रम्हदेवाचा दर्जा आहे. ब्रम्हदेव जन्मदेतो, जगवतो, खायला देतो आणि पाळतो अशी धारणा आहे. पण या बालकाचा ब्रम्हदेव कोण होईल हा प्र्रश्न फक्त आम्ही लिहुन सुटणार नाही तर त्यासाठी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या बालकाला कायदेशीर रित्या शाळेत प्रवेश मिळवून द्यावा एवढ्यासाठीच आमची मेहनत आहे.