नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी आज पहाटे 3 वाजेच्यासुमारास बिना परवाना, बेकायदेशीरपणे वाळूची वाहतुक करणाऱ्या चार गाड्या पकडून चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणामध्ये 1 कोटी 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार हे 23 जानेवारीच्या रात्री ते 24 जानेवारीच्या पहाटे दरम्यान रात्रीची गस्त करत असतांना सोनखेड ते दगडगाव रस्त्यावर त्यांनी संतोष रामराव चव्हाण हा व्यक्तील चालवत असलेली हायवा गाडी क्रमंाक एम.एच.26 बी.डी.1817 तपासली. त्यात बेकायदेशीर रित्या 25 हजार रुपये किंमतीची वाळू भरलेली होती. गाडी 25 लाखांची असा एकूण 25 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संतोष रामराव चव्हाण (38) रा.तेहरानगर नांदेड याविरुध्द पोलीस अंमलदार रमेश वाघमारे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 19/2025 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार हंबर्डे हे करीत आहेत.
दुसऱ्या एका प्रकरणात त्याच दगडगाव रस्त्यावर सोनखेड पोलीसांनी एम.एच.26 सी.एच.2098 ही गाडी तपासली. त्यातही चोरीची वाळू होती. या प्रकरणी दगडू शिवराम चव्हाण (32) रा.घोटका याच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 20/2025 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार हंबर्डे हे करीत आहेत. 25 हजारांची वाळू आणि 25 लाखांची गाडी असा 25 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी पुढे त्याच रस्त्यावर एम.एच.26 बी.ई.4714 ही गाडी तपासली त्यात सुध्दा चोरीची वाळू भरलेली होती. या बाबत गाडी चालक गणेश व्यंकटी कदम (32) रा.शेलगाव या विरुध्द पोलीस अंमलदार दिगंबर श्रीराम कवाळे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 21/2025 दाखल करण्यात आला आहे. 25 हजारांची वाळू आणि 25 लाखांची गाडी असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गिते हे करीत आहेत.
याच रस्त्यावर पोलीसांनी चौथी गाडी क्रमांक एम.एच.24 ए.यु.6031 पकडली. या गाडीचा चालक पुंडलिक माणिकराव जाधव (55) रा.आंबेसांगवी विरुध्द पोलीस अंमलदार दिगंबर कवाळे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 22/2025 दाखल करण्यात आला आहे. 25 हजारांची वाळू आणि 25 लाखांची गाडी असा 25 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोनखेड पोलीसांनी एकाच दिवशी सलग चार अवैध वाळू वाहुतक करणाऱ्या गाड्यांवर खटले दाखल करून 1 कोटी 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.