बालिकेचा नरबळी दिला तर आपली 7 वर्षापुर्वी मरण पावलेली मुलगी जीवंत होते; या स्वप्नातून घडणार होता नरबळी

नांदेड(प्रतिनिधी)-आठ वर्षाच्या बालिकेचा नर बळी दिला तर आपल्या मरण पावलेल्या मुलीला परत जिवन मिळेल या अंधश्रध्देतून माळाकोळी येथील अल्पवयीन बालिककेचे अपहरण घडले होते आणि त्यासाठी कुंभमेळ्यासाठी प्रसिध्द असलेल्या पौषआमावस्येचा मुहूर्त ठरला होता. माळाकोळी पोलीसांनी घेतलेली मेहनतच पुन्हा जीवन देवून गेली. नाही तर आमावस्येनंतर काय भेटले असते याची कल्पना केली तर अंगावर काटा येत आहे.
दि.20 जानेवारी रोजी मोहिजा परांडा ता.लोहा येथील 8 वर्षीय बालिका लिंबोटी गावातून गायब झाली. ती आपल्या मामाकडे आली होती. या संदर्भाने माळाकोळी पोलीसांनी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणासाठी बालिकेचे अपहरण केल्याचा गुन्हा क्रमांक 15 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक राणी भोंडवे यांच्याकडे आहे. माळाकोळी पोलीसांनी भरपूर मेहनत करून 8 वर्षीय बालिकेला पळवून नेणाऱ्या शेषराव गणपती गायकवाड(60), त्यांची पत्नी शोभाबाई शेषराव गायकवाड(55) आणि चंद्रकांत शेषराव गायकवाड या तिघांना पकडले. न्यायालयाने या तिघांना 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविलेले आहे. न्यायालयात नेण्यापुर्वी अंधश्रध्दा कायदा आणि नरबळी कायदा या प्रकरणात जोडण्यात आला होता.
या संदर्भाने माहिती घेतली असता शोभाबाई शेषराव गायकवाड यांच्या एका लग्न झालेली मुलगी पुन्हा जीवंत होणार आहे. तिचा मृत्यू सात वर्षापूर्वी झालेला आहे. एवढेच नव्हे त्यांचा मुलगा चंद्रकांतचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या दोन पत्नी त्यांना सोडून गेल्या. आपल्या घरात शांती नाही आणि त्यासाठी आपल्याला लहान बालिकेला नरबळी द्यावा लागेल अशी स्वप्ने शोभाबाईला पडू लागली. त्या तयारीतच त्यांनी त्या 8 वर्षीय बालिकेचे अपहरण केले आणि कुंभमेळ्याच्या शाहीस्नान दिवशी अर्थात पौषआमावस्या म्हणजेच 29 जानेवारी 2025 रोजी तिचा नरबळी दिला जाणार होता. या बालिकेला घरात ठेवल्यानंतर तिला बाहेर जावू दिले जात नव्हते. कोणी तरी तुला उचलून नेईल असे सांगितले जात होते.
आजच्या विज्ञान युगात सुध्दा सात वर्षांपूर्वी मरण पावलेली मुलगी नरबळी दिल्यानंतर जीवंत होते अशा भ्रामक कल्पनेत जगणाऱ्या शोभाबाईला पडणारी स्वप्ने एका बालिकेच्या जीवावर आली होती. शोभाबाई वय 55 वर्ष आहे. म्हणजे त्यांना आज तयार झालेल्या धावत्या युगाची माहिती नसेल असे सुध्दा मानता येणार नाही. पण कोणी भ्रामक कल्पनामध्ये जगण्याची मानसिकता बनवतो. त्यावेळी तो अशाच कृत्यांकडे वळतो. समाजात त्याचे वाईट परिणाम दिसतात. आपल्याला काही कळत नसेल तर इतरांना विचारून मार्ग शोधायचा असतो अशी साधी जीवन पध्दती आहे. पण शोभाबाई, त्यांचे पती, त्यांच्या मुलाला हे विचारण्याची सुध्दा गरज वाटली नाही. ही दुर्देवीच बाब आहे. स्वप्न पडणे आणि ती सत्यात उतरविणे ही सुध्दा कल्पनाच आहे. अनेकांना ज्या स्वप्नांचा उलगडा होत नाही ते पुढे 12 वेड्याचा कायदा या व्याख्येत येतात. पण शोभाबाईने आपले स्वप्न कोणाला सांगितले नाही आणि त्या स्वप्नांना सत्यता आणण्याचे कल्पनेत ती जगत राहिली आणि हा दुर्देवी प्रकार घडविणार होती. पण माळाकोळी पोलीसांनी केलेल्या मेहनतीला यश आले आणि अल्पवयीन बालिकेचे जीवन वाचले. नसता काय मिळाले असते हे लिहितांना अंगावर काटा येत आहे.
संबंधीत बातमी…

पळवून नेलेल्या 8 वर्षीय बालिकेचा नरबळी दिला जाणार होता

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!