ट्रॅव्हल्सवाल्यांना 1 लाख 41 हजार रुपये दंड लावून ग्राहक तक्रार निवारण मंचाने शिकवला धडा

नांदेड(प्रतिनिधी)-ग्राहकांनी जागरुक राहिले तर आपल्याला मिळालेल्या चुकीच्या, त्रुटींच्या सेवांसाठी सेवा देणाऱ्यांना धडा शिकवता येतो असेच एक प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड येथे घडले. एका वकीलांनी रेड बस आणि ट्रॅव्हल्स बुकींग करणाऱ्या संस्थांना आयोगात बोलावले होते. आयोगाने एकूण 1 लाख 41 हजार 18 रुपये त्रुटीच्या सेवेसाठी त्यांना देण्यास सांगितले आहे. त्यातील 50 हजार रुपये ही रक्कम ग्राह सहाय्यता निधीमध्ये भरण्यास सांगितले आहे. म्हणजे वकीलांना 91 हजार 18 रुपये मिळणार आहे.
नांदेड येथील ऍड.बालारामसिंह शिवासिंह बैस यांनी रेड बस या ऍपच्या माध्यमातून दि.4 जून 2019 रोजी तिकिट बुक केले. ती गाडी डॉल्फीन ट्रॅव्हल्स हाऊस मुंबई येथून निघणार होती. त्या गाडीचे नाव वैष्णवी असे होते. त्या गाडीचा क्रमंाक एम.एच.03 सी.पी.7978 असा होता. ऍड.बालारामसिंह बैस यांचे तिकिट क्रमांक 95049366 असे होते. ऍड. बैस यांना पुणे-नांदेड प्रवास करायचा होता. त्यासाठी त्यांनी 1018 रुपये भरले होते. ती गाडी पुणे येथे रात्री 11.35 वाजता पिंपरी चिंचवड येथील ऍक्सीस बॅंक जवळ येणार होती. या सर्व संदर्भाची मॅसेज देवाण-घेवाण सुध्दा ऍड. बैस यांच्यासोबत झाली होती. गाडीच्या वेळे प्रमाणे ते तेथे पोहचले पण गाडी 1 तास उशीरा आली आणि त्यातही त्यांना भुमकर चौकात येण्यास सांगितले. त्यामुळे त्यांना 200 रुपये अतिरिक्त खर्च करून ऍटोने तेथे जावे लागले. ती गाडी आली तेंव्हा तेथेच त्या गाडीचे पम्चर बनविण्यात आले. या गाडीच्या टायरचे फोटो ऍड. बैस यांनी घेतले. त्यानंतर गाडीत बसले तेंव्हा त्यांनी मोबाईल चॉर्जिंग लावला. पण सॉकेट बंद होते त्याची विचारणा केली असता. गाडीतील चालक आणि सेवकाने थातुर मातूर उत्तर दिले. एका जागी चहा पिण्यास गाडी थांबली असतांना त्यांनी ऍड.बैस यांनी चालकांना एवढ्या लांबच्या प्रवासासाठी अशा पध्दतीचे टायर वापरतात काय अशी विचार केली तेंव्हा ड्रायव्हरने आम्ही दररोजच चालवतो काही होत नाही असे उर्मट उत्तर दिले. त्या गाडीत एकूण 55 प्रवासी होते. त्या गाडीच्यावेळेप्रमाणे ती गाडी पुणे येथून रात्री 11.35 ला निघून सकाळी 8 वाजता नांदेडला पोहचले आवश्यक होते. परंतू ती गाडी 5 जूनच्या दुपारी 3 वाजता पोहचली. आपल्याला मिळालेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल ऍड.बैस यांनी रेडबस मुख्य कार्यालय बैंगलूरु, विभागीय कार्यालय पुणे आणि डॉल्फीन ट्रॅव्हल्स हाऊस मुंबई यांना प्रतिवादी करून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार क्रमांक 703/2019 दाखल केली. दरम्यान रेड बस या कंपनीने त्यांना तिकिटाचे 1018 रुपये परत देण्याची वाटाघाट केली होती. पण ती ऍड. बैस यांनी अमान्य केली.
तक्रार निवारण मंचात रेड बसचे मुख्य कार्यालय यांच्यावतीने कोणी हजर झाले नाही. पण पुणे रेडेबस व्यवस्थापक आणि डॉल्फीन ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक हजर झाले. आपल्या याचिकेत ऍड. बैस यांनी 5 जून 2019 रोजी आपले मित्र सिध्दांत अशोक शेळके यांच्या लग्नात जाण्याचे निमंत्रण आणि त्यांचे शपथपत्र दाखल केले. त्या दिवशी न्यायालयीन कामकाजासाठी बोलाविलेल्या पक्षकारांचा झालेला वैताग न्यायालयासमोर मांडला आणि या सर्वांसाठी त्यांनी बेजबाबदार पणा आणि निष्काळजीपणे दिलेल्या चुकीच्या आणि त्रुटीच्या सेवेसाठी 1 लाख रुपये. मानसिक, शारिरीक आणि आर्थिक त्रासापोटी 2 लाख रुपये आणि तक्रार दाखल करण्याचा खर्च 15 हजार रुपये अशी रक्कम मिळावी अशी विनंती तक्रार निवारण आयोगाला केली.
तक्रार निवारण आयोगाने ऍड.बैस हे प्रतिवादींचे ग्राहक आहेत काय?, ऍड.बैस यांना त्रुटी युक्त सेवा मिळाल्या आहेत काय? या दोन मुद्यांवर सखोल विश्लेषण करून आदेश दिले आहेत की, तिन्ही प्रतिवादींनी मिळून ऍड. बैस यांचे तिकिटाचे पैसे 1018 रुपये परत करावेत, अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्या कारणासाठी 50 हजार रुपये रोख दंड आणि हा दंड प्रतिवादींनी ग्राहक सहाय्यता निधीमध्ये जमा करायचा आहे. तसेच ऍड. बैस यांना झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी 25 हजार रुपये, दंड म्हणून 50 हजार रुपये, तक्राराच्या खर्चासाठी 15 हजार रुपये असा एकूण 1 लाख 41 हजार 18 रुपयांचा दंड ठोठावला. त्यातील 91 हजार 18 रुपये ऍड. बालारामसिंह बैस यांना मिळणार आहेत.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेडचे अध्यक्ष राहुल पाटील, सदस्य ज्ञानेश्र्वर पवार आणि शलाका ढमडेरे यांनी हा निकाल दिला आहे. या प्रकरणात ऍड. बालारामसिंह बैस यांच्यावतीने ऍड. एन.के.कल्याणकर यांनी बाजू मांडली तर रेड बसच्यावतीने ऍड. अनुप पांडे यांनी काम पाहिले.
जागरुक ग्राहकांनी आपल्याला मिळणाऱ्या त्रुटीपुर्ण सेवांसाठी किंवा अनुचित व्यापार प्रथांसाठी तक्रार निवारण आयोगाकडे यायला हवे. तर अशा पध्दतीचे निकाल येतात आणि त्रुटीपुर्ण सेवा देणाऱ्यांना चांगलीच चपराक बसते. विशेष करून ट्रॅव्हल्स गाड्यांमध्ये बसल्यानंतर प्रवाशांसोबत होणारा व्यवहार हा काही चांगला नसतोच. खुप कमी ट्रॅव्हल्स गाड्यांचे चालक आणि त्यातील सेवक अत्यंत नम्रपणे प्रवाशांशी बोलतात. त्यांना चांगल्यात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात पण अशी मंडळी कमीच आहे. ट्रॅव्हल्स कंपनीला बसलेला हा दंड पाहुन इतर ट्रॅव्हल्स कंपन्या आपल्या प्रवाशी ग्राहकांच्या सेवेसाठी उत्कृष्ट काम करतील अशी अपेक्षा करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!