नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था यांच्याकडे असलेले दिव्यांगांचे पाच टक्के राखीव असलेल्या निधीचा उपयोग दिव्यांगांना वेळेवर मिळत नाही म्हणून 25 जानेवारी रोजी, राष्ट्रीय मतदार दिनी सर्व दिव्यांग आपले मतदान कार्ड जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे जमा करून त्यांच्या मार्फत आयोगाकडे पाठविणार आहेत असे प्रसिध्दी पत्रक दिव्यांग संघटनेचे राहुल साळवे यांनी प्रसिध्दीसाठी पाठविले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था यांच्याकडे दिव्यांगासाठी त्यांच्या बजेटमध्ये 5 टक्के निधी हा राखीव असतो. परंतू तो दिव्यांगांचा निधी इतरत्र वापरला जातो. किंवा दिव्यांगांना वेळेत मिळत नाही. 4-4 महिने त्यांचे निराधार मानधन मिळत नाही. आमदार-खासदार यांच्याकडे असलेला दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करत नाहीत. दिव्यांग आपले मतदान देतांना भरभरून मतदान देतात. मतदानाचा फायदा घेतला जातो. पण दिव्यांगांच्या कल्याणाचा विचार होत नाही. या निषेधार्थ दिव्यांग कल्याण कृती समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी 25 जानेवारी रोजी अर्थात राष्ट्रीय मतदार दिनी आपले मतदान कार्ड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणुक आयोगाला परत करणार असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकात लिहिली आहे.