माळाकोळी पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी 48 तासात बालिकेला शोधले
नांदेड(प्रतिनिधी)-लिंबोटी येथून गायब झालेल्या 8 वर्षीय बालिकेला माळाकोळी पोलीसांनी 48 तासात शोधून काढले आहे आणि या प्रकरणी तीन जणांना अटकपण केली आहे. गायब करण्यात आलेली 8 वर्षीय बालिका नरबळी देण्यासाठी गायब करण्यात आली होती.न्यायालयाने या प्रकरणी अटक केलेल्या तिघांना पोलीस कोठडीत पाठविले आहे.
मोहिजा परांडा या गावातील एक 8 वर्षीय बालिका लिंबोटी येथे आपल्या मामाच्या घरी आली होती. दि.20 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास ती मामाचे गाव मोहिजा परांडा येथून गायब झाली. या प्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) नुसार गुन्हा क्रमांक 15/2025 अज्ञात आरोपीविरुध्द दाखल करण्यात आला. पोलीसांनी काढलेल्या माहितीनुसार आणि विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर मोहिजा परांडा गावातील शेषराव गणपती गायकवाड याच्या घरी ती 8 वर्षीय बालिका असल्याची माहिती प्राप्त केली. त्यानंतर पोलीसांनी शेषराव गणपती गायकवाड (60), त्यांची पत्नी शोभाबाई शेषराव गायकवाड (55) या दोघांचा मुलगा चंद्रकांत शेषराव गायकवाड अशा तिघांना अटक केली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या बालिकेचे अपहरण नरबळी देण्यासाठी करण्यात आले होते. हा भयंकर प्रकार आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस उपनिरिक्षक राणी भोंडवे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी ही कार्यवाही पुर्ण केली. या गुन्हा क्रमांक 15 चा तपास पोलीस उपनिररिक्षक राणी भोंडवे या करीत आहेत.
आज न्यायालयाने या तिघांना पोलीस कोठडीत पाठविले आहे. एखाद्या अल्पवयीन आणि निरागस बालिकेचा नरबळी का देण्यात येणार होता याचा शोध तपासात होईलच. परंतू आजही अशा मुर्खपणांच्या अंधश्रध्दांवर लोकांचा विश्र्वास आहे ही बाब अत्यंत दुर्देवी आहे. प्राप्त माहितीनुसार पौष अमावस्या दिवशी अर्थात कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या दिवशी हा नरबळी देण्यात येणार होता. येणारी आमावस्या 29 जानेवारी 2025 रोजी आहे.