नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय कायद्यांना जनतेने प्रतिसाद देण्यासाठीच विविध वेळी कायदेविषयक शिबिरांचे आयोजन होत असते. आजच्या शिबिरात श्रोता असलेला प्रत्येक व्यक्ती हा कायद्याचा प्रचारक होणे आवश्यक आहे. तरच कायद्याबद्दलची जागरुकता समाजात वाढेल असे प्रतिपादन तहसीलदार सुहास वारकड यांनी केले.
आज पोलीस ठाणे वजिराबाद येथे कायदे विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नव्याने तयार झालेले कायदे बीएनएस(भारतीय न्याय संहिता), बीएनएसएस(भारतीय नागरीक सुरक्षा संहिता) आणि बीएसए(भारतीय साक्ष अधिनियम) यावर अनेक मान्यवरांनी आपले मत मांडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सुहास वारकड हे होते. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती उपमुख्य न्याय रक्षक ऍड. ऋषीकेश संतान, सहाय्यक सरकारी वकील ऍड.सिमा जोहिरे, ऍड.सुरभी जयस्वाल, ऍड.नावेद पठाण यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना सुहास वारकड म्हणाले आम्ही फक्त कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून अधिकारी झालो आहोत. परंतू समाजाने, नागरीकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही तर आम्ही ती अंमलबजावणी योग्यरित्या करू शकणार नाही. आज या ठिकाणी उपस्थितीत असलेले श्रोते यांनी येथे ऐकलेल्या कायदेविषयक गोष्टींना समाजात प्रचारीत करणे आवश्यक आहे. येथून प्रसारीत होणाऱ्या कायदेविषयक बाबींना नागरीकांनी दिलेला प्रतिसाद या कायद्याची यशस्वीता ठरवेल असे वारकड म्हणाले.
या प्रसंगी बोलतांना ऍड.ऋषीकेश संतान म्हणाले भारतीय विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत सर्वसामान्य माणसाला कायद्याचे ज्ञान पोहचविणे, कायद्यातील अडचणी समजून सांगणे, सर्व सामान्य माणसासाठी काय-काय सुविधा विधी सेवा प्राधिकरण देते, त्या सुविधांचा उपयोग कसा घेता येतो या संदर्भाने सविस्तर बोलतांना सांगितले की, आपल्या जीवनात कोणत्याही घडामोडींना चुकीचे वळण लागू नये म्हणून आपल्या जीवनात कायद्याचा प्रभाव अत्यंत आवश्यक आहे. जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात राहणारी सर्व मंडळी सभ्य आहे. या तत्वाला आधारीत कायद्याची रचना होत असते आणि त्या कायद्यांचा आदर करणे, त्या कायद्यांच्या नियमांना प्रतिसाद देणे हे प्रत्येक सुजाण नागरीकाची जबाबदारी आहे. सुजाण नागरीकांनी कायद्याच्या प्रभावात राहणे पसंद केले तरच लोकशाहीची यशस्वीता पुर्ण होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम म्हणाले कायदा हा नेहमी प्रवाहित असला पाहिजे. ज्या प्रमाणे नदी वाहते त्या प्रमाणे कायदा सुध्दा समाजात प्रवाहित राहिला तर त्या कायद्याच्या तरतुदींना प्रतिसाद मिळेल. नवीन कायदे आणून शासनाने कायद्यातील सुसूत्रता आणली. पुर्वीच्या कायद्यांमध्ये एका विषयाचे कायदे वेगवेगळ्या भागांमध्ये होते. आता त्या कायद्यांना एका विषयानुरूप एका क्रमात आणले गेले आहे. ज्यामुळे कायदा सहज शोधता येतो.
या प्रसंगी बोलतांना ऍड. सिमा जोहिरे यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहितेमध्ये भारताच्या नागरीकासाठी काय-काय सुविधा देण्यात आल्या आहेत. याचे विश्लेषण करून सांगितले. ज्यांच्या आधारे कायद्याची भिती बाळगण्यापेक्षा कायद्याचा उपयोग कसा करावा या संदर्भाने मार्गदर्शन केले. सिमा जोहिरे म्हणाल्या. कायदा हा दुधारी तलवार आहे. पण त्याचा उपयोग करतांना तलवारीच्या ऐवजी ढालीसारखा करावा. जेणे करून चुकीच्या घटनांमध्ये आपली सुरक्षा होईल. आपल्याला कायद्याच्या माध्यमातून कोणावर वार करण्याची गरज नाही.
याप्रसंगी बोलतांना ऍड.नावेद पठाण यांनी नव्याने आलेल्या कायद्यातील वेगवेगळ्या मुद्यांना हाताळून त्याचे विश्लेषण करतांना त्या कायद्याची आज कशी गरज आहे हे सांगितले. कायदा नवीन का केला गेला, त्याचे नाव का बदलले गेले याचे सविस्तर विश्लेषण करून सर्वसामान्य व्यक्तीला बीएनएस, बीएनएसएस आणि बीएसए बद्दलची माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक सिमा बोईने, संतोष सानप, लोंढे, पोलीस उपनिरिक्षक बालाजी किरवले, पोलीस अंमलदार शंकर बिरमवार, चंद्रप्रकाश नागरगोजे, शामसुंदर छत्रकर, रमेश सुर्यवंशी, अंकुश पवार, जितेंद्र तरटे, श्रीमंगले, विष्णु पंदरे, शुभांगी कोरेगावे, आशा सोनसळे, सिमा गंदेवार, अर्चना लांडगे, अश्र्विनी मोटे, सोनी कांबळे, अर्चना गोडबोले यांनी केले. या कार्यक्रमात प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य गंगाखेडकर, मुख्याध्यापक शर्मा, हरेश ठक्कर, अवतारसिंघ पहरेदार, दिलीपसिंघ सोढी, अंबादास जोशी यांच्यासह अनेक महिला, पुरूष उपस्थित होते. या कायदे विषयक शिबिराची सांगता राष्ट्रगिताने झाली.