नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड गुरुद्वारा येथील सोने वितळणे या प्रकरणाचा अहवाल 31 मार्चपर्यंत सादर करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायमुर्ती एस.जी. मेहरे आणि न्यायमुर्ती शैलेश ब्रम्हे यांनी दिले आहेत.
नांदेड येथील सरदार रणजितसिंघ आणि सरदार राजेंद्रसिंघ पुजारी यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक 12467/2024 दाखल करून सचखंड गुरुद्वाराने कोणतीही योग्य प्रक्रिया न पार पाडता गुरुद्वारा बोर्डाकडे असलेले 2 खंडीपेक्षा जास्त सोन्याची वितळणी करून घेतली. यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. सिख धर्मीयांसाठी दक्षीण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचखंड श्री हजुर साहिब येथे दर्शनासाठी येणारे भाविक आपल्या श्रध्देनुसार हिरे-मोती, सोने-चांदीचे दागिणे भेट करत असतात. 1970 ते 2020 दरम्यान प्राप्त झालेल्या सोन्या-चांदीचे वितळण करून अशुध्द आणि कमी वजनाचे सोने परत जमा करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांचा आहे.
या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एक सात सदस्यी चौकशी समिती नेमली होती. पी.एन.जी. ज्वेलर्स शाखा नागपूर व पुणे यांच्यासह महानगरपालिकेचे लेखाधिकारी, दोन पंचप्यारे साहिबान, वैध मापन शास्त्र कार्यालयातील उपनियंत्रक व जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिलहाधिकारी सामान्य यांचा या चौकशी समितीत समावेश करण्यात आला होता. या याचिकेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी 31 मार्च 2025 पर्यंत चौकशी अहवाल अंतिम होणार असल्याचे सांगितले. त्यानुसारच न्यायमुर्तींनी या याचिकेमधील पुढची पायरी चौकशी अहवाल आल्यानंतर होणार आहे असे आदेश 15 जानेवारी 2024 रोजी केले आहे. या खटल्यात याचिकाकर्त्यांच्यावतीने शेख वसीफ सलीम हे बाजू मांडत आहेत.