नांदेड(प्रतिनिधी)-पक्ष सोडून जाण्याची तयारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरपासून उपऱ्या एकनाथ पवाराने तयारी सुरू केली होती. जाता-जाता त्यांनी पक्षावर खापर फोडून गेले असले तरी यानंतर जर उपऱ्या एकनाथ पवाराने पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व शिवसेनेबद्दल अपशब्द वापरला तर त्याला लोहा-कंधारच काय नांदेड जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा जिल्हाप्रमुख बबन बारसे यांनी दिला आहे.
शिवसेनेच्यावतीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख बबन बारसे, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील डक, प्रकाश मारावार, नरहरी वाघ, व्यंकोबा येडे, मनोज यादव, पिंटू सुनपे, गौतम जैन यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बबन बारसे म्हणाले की, नवखा असतांना ही एकनाथ पवारवर राज्य संघटनेची जबाबदारी दिली होती. त्यांनी मात्र स्वत:च्याच मित्र मंडळाला खैरातीसारखे पदे वाटप केली होती. यावेळी निष्ठावंतावर त्यांनी अन्याय केला होता. तरी देखील विधानसभा निवडणुकीत सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी त्याला निवडूण आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. अशा उपऱ्या एकनाथ पवाराने शिवसेने बद्दल बोलल्या बद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो.
यावेळी भुजंग पाटील यांनीही एकनाथ पवार यांचा चांगला समाचार घेतला. एकनाथ पवार यांना पक्षाने काय दिल नाही. एक वर्षात पक्षात येवून त्यांना राज्य संघटन पद दिल. विधानसभेची उमेदवारी दिली. त्यांच्या म्हणण्यावर कार्यकर्त्यांना पदे दिली. 1990 पासून लोहा-कंधारमध्ये निष्ठेने काम करणाऱ्या शिवसैनिकावर अन्याय करून पवारांना सर्व काही दिल असतांना अशा उपऱ्या एकनाथ पवाराने ही भाषा बोलणे योग्य नाही. त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो.